‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
जागर ‘स्त्रीशक्ती’चा: वेबसिरीजेस गाजवणाऱ्या खास व्यक्तिरेखा
आज जागतिक महिला दिन! स्त्रीशक्तीला अभिवादन करण्यासाठी नेमून दिलेला एक दिवस, इतकंच त्याचं महत्त्व उरलंय का? तर नाही. हा दिवस स्त्रियांनी स्वतःचं आस्तित्व निर्माण करण्यासाठी, आपला न्याय्य हक्क, अधिकार आणि सन्मान मिळवण्यासाठी पुरुषप्रधान संस्कृतीला आव्हान देणाऱ्या लढाईत मिळवलेल्या विजयाच्या स्मृतीप्रित्यर्थ जगभर साजरा केला जातो. स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीचा दर्जा मिळावा, समान संधी मिळाव्यात यासाठी संघर्ष करणाऱ्या स्त्रियांना हा दिवस समर्पित केला गेलेला आहे. दरवर्षी या दिनाचे औचित्य साधून, आपल्या कर्तृत्ववान जीवनशैलीतून आपल्या घराला, समाजाला आणि पर्यायी देशाला नवी दिशा देण्याचे सत्कार्य करणाऱ्या स्त्रियांना गौरविण्यात येते.
शक्तीशिवाय तर शिवही शवाप्रमाण मानला जातो. आपल्या जीवनात आई, आज्जी, बहिण, प्रेयसी, पत्नी, मुलगी अश्या विविध स्वरूपांत ही स्त्रीशक्ती वावरत असते आणि जीवन समृद्ध करत असते. अगदी पुराणांपासून ते आत्ताच्या कथा-कादंबऱ्यांपर्यंत स्त्रीशक्तीचे पोवाडे गाणाऱ्या अनेक रचना साहित्यकृतींमध्ये आढळून येतात. स्त्री सबलीकरणाच्या या चळवळीत चित्रपट आणि वेबसिरीजेसचेही अमूल्य योगदान दिसून येते. आज आपण अश्याच काही खास व्यक्तिरेखांचा आढावा घेणार आहोत, ज्यांनी निरनिराळ्या वेबसिरीजेसमधल्या भूमिकांमधून स्त्रियांच्या सामर्थ्याचे प्रदर्शन करत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.
आर्या सरीन (आर्या): नव्वदीच्या दशकातील ग्लॅमडॉल सुश्मिता सेन (Sushmita Sen) ‘आर्या’मधून प्रदीर्घ कालावधीनंतर पुनरागमन करती झाली. तिच्या नवऱ्याच्या अकाली अपघातामुळे आर्याला एकाचवेळी तिचा बहरलेला संसार आणि ड्रग्जचा व्यवसाय सांभाळणे ही तारेवरची कसरत करावी लागली. वयात आलेली मुलं, म्हातारे आईवडील यांना वेळ देत एक असा व्यवसाय सांभाळणे ज्याचा ती कित्येक वर्षांपासून फक्त तिरस्कारच करत आलेली आहे, हे आर्यासारख्या शांत, सुस्वभावी गृहिणीसाठी एक दिव्यच होतं. ड्रग्जच्या नावाने नाक मुरडणारी आर्या परिस्थितीची गुलाम न बनता, आपल्या विश्वासघातकी नातेवाईकांवर मात करत, वेळप्रसंगी कुटुंबाचे रक्षण करत एक ड्रगलॉर्ड बनते तेव्हा तिच्यातील वाघीण “पहले धंदा मर्द संभालते थे। अब बचे नही।” हे सत्य पचवून कशी उभी राहते, यासाठी प्रत्येक महिलेने ही सिरीज नक्कीच बघायला हवी.
माधुरी यादव-त्रिपाठी (मिर्झापूर): पेअर्स साबणाच्या जाहिरातीने घराघरात पोहोचलेली ईशा तलवार (Isha Talwar) ‘मिर्झापूर’मध्ये एका वेगळ्या भूमिकेत दिसली. अकाली वैधव्य आलेली मुख्यमंत्र्याची मुलगी ते त्रिपाठी खानदानाची सून हा तिच्या व्यक्तिरेखेचा प्रवास अधिकच रंजक बनला जेव्हा तिने बापाच्या मृत्यूनंतर मुख्यमंत्रीपदाची धुरा तिच्या महत्त्वाकांक्षी पण धूर्त सासऱ्याकडे जाऊ न देता आपल्या हातात घेतली. दर दोन मिनिटांनी शिवीगाळ करत बंदुकीचे बार उडवणाऱ्या आपल्या नवऱ्याची म्हणजेच मुन्नाभैय्याची हळवी बाजू तिने प्रेक्षकांसमोर आणली. नवऱ्यावर अतोनात प्रेम करत असली तरीही तिने स्वतःच्या आत्मसन्मानाला त्रिपाठींच्या पितृसत्ताक कुटुंबपद्धतीमुळे कधीही ठेच पोहोचू दिली नाही. योग्य असूनही सत्तेपासून वंचित राहिलेल्या मुन्नाच्या दुःखावर हळूवार फुंकर घालत तिने शिताफीने राजकीय डाव खेळत मुख्यमंत्रीपद आपल्या पदरात पाडून घेतले. सत्यवानाच्या सावित्रीने यमाकडून सौभाग्य रक्षणासाठी असा वर मागितला, ज्यात तिने स्वतःसोबतच कुटुंबाच्या आणि राज्यातील प्रजेच्याही सुखाचा विचार केला होता, तसाच वापर माधुरीने या मुख्यमंत्रीपदाचा केला, असे म्हणता येईल.
डॉली मेहरा (पाताल लोक): स्वस्तिका मुखर्जीने साकारलेलं डॉली मेहराचं पात्र ही ‘पाताल लोक’ची एक जमेची बाजू होती. एका नामांकित वृत्तसंस्थेचा मालक असलेला नवरा, गडगंज श्रीमंती, नोकर-चाकर असूनही एकटी पडलेली डॉली तिच्या निरागस, भोळसर स्वभावामुळे प्रेक्षकांना जास्त भावते. सतत चिंतेच्या घेऱ्यात अडकलेली डॉली प्रसिद्धीपासून चार हात लांबच राहायचा प्रयत्न करते, तर तिचा नवरा संजीव मेहरा हा कायमच प्रकाशझोतात राहणारा, पार्ट्यांमध्ये रमणारा माणूस आहे. आपल्या नवऱ्याचं त्याच्या कलीगसोबत अफेअर आहे, हे कळल्यावर डॉली उन्मळून पडते. पण नंतर हे कटू सत्य पचवून असे काही निर्णय घेते, जे इतरांना सामान्य वाटत असले तरी तिच्या दृष्टीने मात्र फारच धाडसी आणि टोकाचे असतात. स्वतः आई होऊ न शकल्याने गर्भार कुत्रीला बाळंतपणात मदत करून ती अंशतः का होईना, पण मातृत्वाची अनुभूती मिळवते. अँक्झायटीची पेशंट असलेली डॉली हायपर झाल्यावरही कसलाही आक्रस्ताळेपणा न दाखवता तिच्या शांत व सभ्य स्वभावधर्मानुसार वागते. भारतीय स्त्रीच्या सोशिकतेचं डॉली उत्तम उदाहरण असली, तरी ती सर्व काही सहन करण्याइतपत दुर्बल नाही हा तिचा कणखरपणा तिला या वेबसिरीजमधील सर्वच पात्रांपेक्षा उजवा ठरवतो.
नैरोबी (मनी हाईस्ट): स्त्रीवाद आणि मातृसत्ताकाचं प्रतिक म्हणून आल्बा फ्लोरेस (Alba Flores) या स्पॅनिश अभिनेत्रीने साकारलेली ‘नैरोबी हे एक उत्तम उदाहरण आहे. मनाने एक संवेदनशील आई असलेली नैरोबी, डोक्याने तितकीच हुशार आणि महत्त्वाकांक्षी असून, तिची धीरोदात्त बॉसगिरी प्रेक्षकांना तिच्या प्रेमात पडायला भाग पाडते. ‘मनी हाईस्ट’मधील प्रमुख पात्रांचा अर्थात चोरांच्या टोळीचा म्होरक्या एक पुरुष जरी असला तरी महत्त्वाच्या प्रसंगांत नैरोबी, टोकियो, स्टॉकहोम आणि लिस्बनसारखी स्त्रीपात्रे नेमून दिलेल्या कार्याची धुरा समर्थपणे सांभाळताना दिसून येतात. रॉयल मिंटच्या टास्कमध्ये नैरोबी बर्लिनला दूर सारून टास्कचं प्रतिनिधित्व करताना प्रोफेसरला फोनवर सुनावते, “Empieza el matriarcado!” (Let The Matriarchy Begin!) आणि तिथूनच टोळीमध्ये स्त्रीवाद आणि मातृसत्ताकाचं बीज रोवलं जातं. नेटकऱ्यांनी उचलून धरलेला ‘#EmplezaEIMatriarcado’ हा ट्रेंडच नैरोबीच्या पात्राचं कौतुक करण्यासाठी पुरेसा आहे.
सुचेता दलाल (स्कॅम १९९२: द हर्षद मेहता स्टोरी): श्रेया धन्वंतरीने (Shreya Dhanwanthary) साकारलेली सुचेता दलाल स्कॅम एका वेगळ्याच उंचीवर घेऊन गेली. टाईम्स ऑफ इंडियामध्ये काम करण्यापूर्वी सुचेताने फॉर्च्युन इंडिया, द इकॉनॉमिक टाईम्स आणि बिझनेस स्टँडर्डसारख्या वृत्तसंस्थांसोबत काम केलेलं असल्याने शेअर बाजारासोबतच देशाच्या आर्थिक घडामोडींशी कमी वयातच तिचा जवळून संबंध आला होता. करिअर ऐन भरात असताना सुचेताने १९९२चा शेअर बाजार घोटाळा उघडकीस आणला. एकेक धागा पकडून तिने या संपूर्ण घोटाळ्याचा व्यवस्थित अभ्यास केला आणि भारताच्या अर्थव्यवस्थेला पडलेलं भगदाड सामान्य नागरिकांच्या निदर्शनास आणून दिलं. या घोटाळ्याचा सूत्रधार हर्षद मेहता हा त्यावेळी भारतातील महत्त्वपूर्ण व्यक्तींपैकी एक मानला जात असल्याने, सुरुवातीला टाईम्स ऑफ इंडियाने केवळ फॅक्ट्सच्या आधारावर तयार झालेल्या सुचेताच्या या स्टोरीला नाकारले, पण आपलं करिअर पणाला लावून सुचेताने या प्रकरणाचा छडा लावलाच. कित्येकदा तिचे प्रस्ताव झिडकारण्यात आले, भावनिकदृष्ट्या खच्चीकरण करून तिची पत्रकारिता विकत घेण्याचाही प्रयत्न केला गेला, पण लोकहितासाठी आणि सत्यासाठी कायम आग्रही राहिलेल्या सुचेताने माघार घेतली नाही.
स्त्रीशक्तीला गौरवान्वित करणाऱ्या व्यक्तिरेखांची आणि वेबसिरीजेसची यादी इथेच संपत नाही. तसं पाहायला गेल्यास गेल्या काही वर्षांत आलेल्या अगणित वेबसिरीजेसमध्ये अनेक दर्जेदार अभिनेत्रींनी आपल्या अभिनयातून अशा व्यक्तिरेखा उभ्या केल्या, ज्यांच्याकडे आज समस्त स्त्रीवर्ग एक आदर्श म्हणून बघू शकतो. मग यात ‘आश्रम’मधील अत्याचाराविरोधात आवाज उठवणारी आदिती पोहनकरने साकारलेली पम्मी असेल, ‘क्रिमिनल जस्टीस’मध्ये अनुप्रिया गोयंकाने साकारलेली कणखर आणि सत्यवादी निखत हुसेन किंवा कीर्ती कुल्हारीची घरगुती हिंसाचार आणि वैवाहिक बलात्काराविरोधात कठोर पाऊल उचलणारी अनुराधा चंद्रा असेल, बदलत्या काळासोबत जाचणाऱ्या रूढी आणि परंपरांचं जोखड उलथून टाकण्याची हिंमत या व्यक्तिरेखा स्त्रियांमध्ये निर्माण करतात. महिला सबलीकरणासचं उत्तम उदाहरण म्हणून उत्तरोत्तर अश्याच वेबसिरीजेस बनत राहोत आणि त्यातून आणखी सशक्त व्यक्तिरेखा समाजासमोर आदर्श म्हणून उभ्या राहोत, हीच या महिलादिनी सदिच्छा! स्वतःसाठी, कुटुंबासाठी आणि समाजासाठी अहोरात्र कष्ट करून जगासमोर आशादायी चित्र उभ्या करणाऱ्या समस्त महिलावर्गाला कलाकृती मिडीयाचा सलाम!!