बाळासाहेबांनी केलेलं कौतुक मला तमाम पुरस्कारांपेक्षा श्रेष्ठ आहे! – मिलिंद गुणाजी
मिलिंद गुणाजी – निसर्ग हाच माझा सखा -सोबती !
विध्यात्याचीच खरं म्हटलं तर, कमाल म्हटली पाहिजे. जगात तो काहींना इतकं काही सर्वगुण संपन्न घडवतो की, असं कसं शक्य आहे, अशी भावना कुणाच्याही मनात निर्माण व्हावी आणि अशा सर्वगुण संपन्न व्यक्तिबद्दल हेवा वाटावा असंही घडतं. मराठी भाषिक पण गोव्याचा असलेल्या मिलिंद गुणाजी या देखण्या अभिनेत्याची ओळख प्रारंभी मॉडेल म्हणून होत असतानाच तेव्हा सुप्त वाटणारे त्याच्यातील गुण चांगलेच रुळलेत आणि अवघा महाराष्ट्र, अनेक पर्यटन स्थळं, विशेषतः दुर्ग, गड, किल्ले यांची मनसोक्त भटकंती करणारा मिलिंद गुणाजी उत्तम लेखक म्हणून कधी घडला, हे ही समजलं नाही.
मिलिंदची अनेक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत आणि त्यांना पुरस्कारही लाभले आहेत. सध्या मिलिंद बॉलिवूडच्या अनेक फिल्म्स आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर व्यस्त आहे. नुकत्याच मिलिंदच्या लाडक्या लेकाचे शुभमंगल मालवणला ‘डेस्टिनेशन वेडिंग’ झाले. अनेक मुद्द्यांवर मिलिंद गुणाजीशी मुंबईतील एम आय जी क्लबमध्ये बातचीत झाली…
मिलिंद, गेल्यावर्षी तुला आणि तुझ्या कुटुंबाला अनेक संकटांशी झुंझावं लागलं, हे खरं ना ?
मिलिंद – गेल्यावर्षी म्हणजेच २०२० मध्ये माझा एक महत्वकांक्षी हिंदी सिनेमा ‘भूल भूलय्या २’ सुरु होणार होता. याखेरीज अन्य २ फिल्मही सुरु व्हायच्या होत्या. पण २०२० मध्ये जगाने आणि देशाने प्रथमच कोरोना संकटाचा सामना केला. त्यामुळे भुलभुलय्या -२ फिल्म सुरु होऊ शकली नाही आणि अन्य फिल्म्स देखील रखडल्या आहेत.
सिनेमा शूटिंगसाठी दिलेल्या तारखा अर्थात व्यर्थ गेल्या. याच काळात माझा मुलगा अभिषेक बॅडमिंटन खेळताना पडला आणि त्याचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले. त्याच्यावर उपचार सुरु करतो न करतो तोच मला कोविड झाला आणि आमच्या दोघांची देखभालीची जवाबदारी पत्नी राणीवर (राणी बागूल –गुणाजी) पडली. तिची आबाळ होत असतानाच पुन्हा तिलाही कोरोनाने घेरले. यात भरीस भर म्हणजे अभिषेकचे फ्रॅक्चर भरून येतंय न येतंय. तोवर त्यालाही कोरोना झाला. संकटांची जंत्री थांबतच नव्हती. ४ ते ५ महिन्यांनी यथावकाश हळूहळू सगळं नॉर्मल झालं.
सध्या तुझ्याकडे फिल्म्स आणि ओटीटी प्लॅटफॉर्म्स असे नवे प्रोजेक्ट्स आहेत, त्याबद्दल सांग.
मिलिंद – भूलभूलय्या -२ चे शूटिंग जे २०२० मध्ये पोस्टपोन झाले होते ते २०२१ मध्ये देखील पुन्हा पुढे गेले कारण कार्तिक आर्यनला कोरोना झाला. असो सरतेशेवटी ‘भूलभुलय्या २’ पूर्ण झाला आणि आता लवकरच रिलीज होईल. राजकुमार राव, सानिया मल्होत्रा यांसोबत मी ‘फिल्म हिट’ करतोय, ‘विंग्ज ऑफ गोल्ड’ या फिल्ममधे देखील माझी एक महत्वपूर्ण भूमिका आहे. अजय देवगण सोबत त्याच्या आगामी फिल्ममधे माझी पॅरलल भूमिका आहे. आणखीही अन्य काही प्रोजेक्ट्स करतोय. पण नव्या नियमांनुसार भूमिका किंवा फिल्मविषयी डिटेल्स शेअर करता येणार नाहीत. या गोष्टी हल्ली कॉन्ट्रॅकट्टमध्ये नमूद केलेल्या असतात.
ओटीटी प्लॅटफॉर्मवर एका नव्या वेब सिरीजमध्ये बॉलिवूडच्या नामांकित स्टारसोबत मी मुख्य भूमिका करतोय. अन्य २ वेबसिरीज करत आहे. शिवाय काही मराठी चित्रपटही करतोय.
मिलिंद तुझे नाव पर्यावरण संरक्षक, दुर्गप्रेमी म्हणूनही ज्ञात आहे. छायाचित्रण, निसर्ग संवर्धन या सगळ्या कलांची आवड कशी निर्माण झाली?
मिलिंद -माझ्या निसर्गप्रेमाला मी हॉबी म्हणणार नाही कारण माझं निसर्ग प्रेम उपजतच आहे. मी कॉलेजमध्ये असल्यापासून बेफाम भटकंती करतोय. पर्यावरण, पशू -पक्षी, निसर्ग, वृक्ष माझे सोयरे- सहचर आहेत. त्यांच्या सहवासात मी मनापासून रमतो. त्यांचे मूड्स टिपतो, त्यांचे छायाचित्रण करतो. हा माझ्या आनंदाचा मौल्यवान ठेवा आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे यांच्यासोबत हेलिकॉप्टरमध्ये बसून आम्ही एरियल फोटोग्राफी केली आहे. ते देखील चित्तथरारक अनुभवांचे विश्व आहे. एरियल फोटोग्राफी करताना आमचे हेलिकॉप्टर एका उंचीवर पोहचले आणि हवामानात बदल झाल्याने हेलकावे खाऊ लागले. मोठ्या महत्प्रयासाने हेलिकॉप्टर एका लेव्हलला आले आणि अनर्थ टळला. ट्रेकिंगची आवड असल्याने मी कित्येक वर्षे महाराष्ट्रातील विविध दुर्ग, पर्यटन स्थळं, आवडीने फिरतोय. निसर्गाच्या सान्निध्यात रमताना पार तहानभूक विसरतो.
अलीबागच्या किल्ल्याजवळ छायाचित्रण करताना समुद्राला भरती आली आणि पाण्याची पातळी इतकी वाढली की, माझा जीव त्या दिवशी वाचणं शक्य नाही, इतका गंभीर प्रसंग ओढवला होता. असे अनुभवदेखील मला निसर्गाच्या सहवासापासून दूर करू शकत नाहीत. निसर्ग हाच माझा सखा सोबती असतो. यातूनच मी ट्रॅव्हल शोचे होस्टिंग केलं आणि माझ्या पर्यटनाच्या अनुभवांवर पुस्तकं लिहिली आहेत.
२३ जानेवारी रोजी बाळासाहेब ठाकरेंचा जन्मदिवस असतो, महाराष्ट्रातील तमाम जनतेला त्यांचे स्मरण होणे स्वाभाविक आहे. पण तुझी मात्र बाळासाहेबांशी निगडित खास आठवण आहे. बाळासाहेबांनी तुझ्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली होती, हे कसं काय शक्य झालं?
मिलिंद: याबाबतची आठवण म्हणजे, ‘चंदेरी -भटकंती’ पुस्तकाचे प्रकाशन माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते करावे आणि या कार्यक्रमाला महानायक अमिताभ बच्चनला आमंत्रित करावे, असा विचार मी केला होता. त्या काळात अमिताभ यांच्या प्रतीक्षा बंगल्यावर दरवर्षी होळी खेळण्यासाठी मला आमंत्रण असे. पण, उत्तम स्नेहसंबंध असूनही अमिताभ यांनी होकार दिला नव्हता. किंबहूना बाळासाहेबांनी देखील तोपर्यंत माझ्या पुस्तकासाठी प्रस्तावना लिहिली नव्हती. ते लिहीतील की नाही, ही शंका होतीच. बाळासाहेब पक्षाच्या कामात व्यस्त असत, त्यामुळे मला भावाप्रमाणे असलेल्या उद्धवजींना मी यासंदर्भात विचारलं होतं. पण मनाची घालमेल चालू असताना उद्धवजींचा फोन आला आणि त्यांनी ‘मातोश्री’ वर बोलावलं आणि म्हणाले, “मिलिंद, तुझ्या पुस्तकासाठी प्रस्तावना लिहून झाली आहे, येऊन पहा, कशी वाटते?”
मी अतिशय धडधडत्या अंतःकरणाने मी ‘मातोश्री ‘वर पोहचलो आणि साहेबांनी लिहिलेली माझ्या पुस्तकावरची प्रस्तावना वाचून डोळ्यांमधे आनंदाश्रूंचा महापूर दाटून आला. कुणालाही दरारा वाटेल असं बाळासाहेबांचं व्यक्तिमत्व होतं, पण त्यांच्या हृदयात इतके अमृत असू शकतं, याची मी कल्पनाच केली नव्हती. मला आयुष्यभर प्रोत्साहन मिळतील असे त्यांचे शब्द आणि माझं कौतुक मला कायम पुरून उरणारं आहे. मी त्यांना आणि उद्धवजींना मातोश्री बंगल्यावर भेटलो तेव्हा त्यांनी प्रत्यक्ष भेटीतही माझी पाठ थोपटली.
बाळासाहेबांशी असलेलं भावनिक नातं त्या क्षणानंतर हृदयावर कायमच कोरलं गेलं. स्वतःच्या असंख्य जवाबदाऱ्या, पक्षाचे व्याप सांभाळून अनेकांच्या आयुष्यात प्रोत्साहन आणि आनंदाचं कारंजं निर्माण करणारा बाळासाहेबांसारखा नेता खरंच दुर्मिळ! माझ्या ‘चंदेरी भटकंती’ या पुस्तकाला साहेबांनी लिहिलेली प्रस्तावना मी माझ्या खंडाळ्याच्या बंगल्यात दर्शनी भागात सजवून ठेवली आहे कारण बाळासाहेबांनी केलेलं कौतुक मला तमाम पुरस्कारांपेक्षा श्रेष्ठ आहे, हृदयाच्या समीप आहे आणि सदैव असेल. माझ्या जीवनातील तो परमोच्य आनंदाचा क्षण होता.
=====
हे देखील वाचा: ‘दाढी-मिशी’वर असलेल्या प्रेमापोटी मिलिंद गुणाजी याने यशराजच्या या चित्रपटाला नकार दिला…
=====
तुझ्या कारकिर्दीला ३० वर्षे झाली. या काळात सुमारे २५० चित्रपट तू केलेस. आपल्या करियरबद्दल तू समाधानी आहेस का?
मिलिंद – हो, मी अभिनेता आहे पण त्याचबरोबर भटकंती, छायाचित्रण, लिखाण अशा अनेक आनंद देणाऱ्या कलांमध्ये मी मनापासून रमलो. अभिनय आणि या सर्व कला या दोन्हींचा आनंद घेत मी जगलो, म्हणूनच मी संतुष्ट आहे, समाधानी आहे. येणारे चित्रपट, वेब शोज मला अभिनयाच्या अधिक समृद्ध संधी देतील याची मला खात्री वाटते.
कारकिर्दीच्या ३० वर्षांमध्ये तुझी एक ठरावीक इमेज बनली नाही, मिलिंद गुणाजी हे नाव कुठल्याही ठरावीक इमेजमध्ये अडकलं नाही. हे तुझ्यासाठी हितावह ठरले का? की इमेज नसणं नुकसानकारक ठरले ?
मिलिंद – बॉलिवूडमध्ये बहुतकेदा कलाकारांचे स्लॉट्स बनतात हे खरं आहे. खलनायकाची भूमिका असल्यास ठराविक ७-८ चेहरे फिल्ममेकर्स किंवा अलीकडे कास्टिंग डायरेक्टर्ससमोर येतात. खलनायकाची भूमिका म्हटलं की, अमरीश पुरी प्रसिद्ध होते. पण त्यांनी अनेक पॉझिटिव्ह भूमिकाही सहज केल्या आहेत. उत्तम कलाकारांना एकाच साच्यात कैद करणं, कलाकारासाठी अन्यायकारक असतं, पण त्याला इलाज नसतो. याबाबतीत मी स्वतःला सुदैवी म्हणेन कारण कुठल्याही एका इमेजमध्ये मी अडकलो गेलो नाही. येणाऱ्या फिल्म्समध्ये, वेब शोज मध्ये मला विविधांगी व्यक्तिरेखा मिळाल्या आहेत. देवदास, विरासत, फिर हेरा फेरी, जोर, जुलमी या हिंदी चित्रपटातील भूमिका मला अधिक गहिरी ओळख देतात .