सृजनशील सृजन
सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ (Mulgi Zali Ho) ही मालिका अधिकाधिक लोकप्रिय होत चालली आहे. या मालिकेत रोहन पाटील ही भूमिका साकारणारा कलाकार म्हणजे सृजन राजेश देशपांडे. सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, अभिनेता राजेश देशपांडे यांचा मुलगा सृजन.
तो लहान म्हणजे दीड वर्षाचा असताना कॅमेऱ्याला सामोरे गेला होता. मालिका होती ‘गंगुबाई नॉनमॅट्रिक’. पुढे मग बाबांचे काम पाहून सृजनला हळूहळू या क्षेत्रात काहीतरी वेगळं आहे, हे जाणवू लागलं होतं. सहावीत असताना त्याने ‘गंगुबाई नॉनमॅट्रिक’ सिनेमातही छोटी भूमिका केली. एकदा सृजनच्या एका मित्राला ‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिकेचं शूटिंग पाहायचं होतं. रीतसर परवानगी घेऊन सेटवर तर सृजन गेलाच होता, पण ‘दिल दोस्ती दुनियादारी’ मध्येच एका एपिसोड मध्ये एक भूमिका देखील करून आला.
सृजन कांदिवली येथील ‘पवार पब्लिक स्कुल’ चा विद्यार्थी. त्याने ‘तीनसान’ नावाच्या मालवणी एकांकिकेत सुद्धा काम केलं होतं. त्याला
मिमिक्री करण्याची सुद्धा आवड आहे. अकरावीत त्याने रुपारेल मध्ये प्रवेश घेतला. तिथे आय एन टी साठी ‘गॅलक्सी १६०२’ एकांकिकेसाठी बॅकस्टेज साठी जी मेहनत असते, ती मनापासून केली. नाटक हे क्षेत्र वाटते तेवढे सोपे नाही, यात प्रचंड मेहनत आहे, हे सृजन अनुभवत होता. मग इप्टा एकांकिका स्पर्धेत सुद्धा ‘बेनेफिट ऑफ डाऊट’ साठी बॅकस्टेज केलं. नाटकांसाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी तो शिकत होता आणि मग लॉकडाऊन चा काळ सुरु झाला.
सृजनने या काळात ‘लाईफ इन लॉकडाऊन’ ही शॉर्ट फिल्म केली. ती लेखिका रोहिणी निनावे (Rohini Ninawe) आणि अनेक कलाकारांना खूप आवडली . रोहिणी निनावे यांनी राजेश देशपांडे यांना सांगितले की स्टार प्रवाह वर ‘मुलगी झाली हो’ (Mulgi zali ho) अशी एक मालिका येणार आहे, त्यासाठी सृजनला ऑडिशन द्यायला सांग. सृजनने ऑडिशन दिली आणि त्याची निवड या मालिकेतील ‘रोहन पाटील’ साठी झाली. तो म्हणतो, “या मालिकेत काम करणे हा माझ्यासाठी एक टर्निंग पॉईंट ठरला आहे. माझ्या भूमिकेला यात खूप शेड्स आहेत. पैशाचा लोभी असणारा अशीही शेड यात आहे.” दिग्दर्शक सचिन देव आणि मालिकेची संपूर्ण टीम यांच्याकडून सृजन खूप काही शिकत आहे.
पहिल्याच मालिकेच्या निमित्ताने मुंबईबाहेर राहायचे, ते सुद्धा घरापासून दूर, हे सृजनला सुरुवातीला खूप जड गेलं. घरच्यांची आठवण आल्याने आणि विशेष करून बाबांची आठवण येऊन सृजन खूप रडायचा सुद्धा ! मग राजेश व्हिडीओ कॉलवर बोलला की त्याला बरे वाटायचे. त्याने ‘व्हायरस मराठी’ या यु ट्यूब वाहिनी साठी सुद्धा ‘तर ती तो’ या मालिकेत काम केलं आहे. त्याला क्रिकेट आणि बॅडमिंटन या खेळांची आवड असून कविता करण्याचा सुद्धा त्याला छंद आहे. सध्या तो बारावीत आहे.
त्यामुळे मालिकेच्या सेटवर सुद्धा वेळ मिळेल तेव्हा तो अभ्यास करतो. अजून आपल्याला खूप शिकायचं आहे, असं तो नम्रतेने सांगतो.