
स्टार प्रवाहवरील ‘ही’ मालिका काही महिन्यातच होणार बंद? अपेक्षित TRIP न मिळू शकल्याने निर्णय घेतल्याची शक्यता
Star Pravah वाहिनीवर नुकतीच सुरू झालेली एक मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेण्याच्या तयारीत आहे. वाहिनीच्या इतर मालिकांनी टीआरपीच्या शर्यतीत चांगली कामगिरी करत असतानाच, केवळ दोन महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या ‘काजळमाया’ (Kajalmaya) या मालिकेचा लवकरच अंतिम भाग प्रसारित होणार आहे. स्टार प्रवाहने नुकताच या मालिकेच्या शेवटच्या भागाचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला असून, त्यावरून मालिकेचा शेवट जवळ आल्याचं स्पष्ट झालं आहे. मराठी प्रेक्षकांना भयपट आणि रहस्यमय कथा आवडत असल्या तरी, ‘काजळमाया’ला अपेक्षित टीआरपी मिळू शकली नाही. त्यामुळे वाहिनीने ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेतल्याचं समजत आहे.(Kajalmaya serial)

२७ ऑक्टोबर रोजी या मालिकेचं प्रसारण रात्री १०.३० वाजताच्या स्लॉटमध्ये सुरू झालं होतं. मात्र नंतर प्रेक्षकसंख्या वाढावी यासाठी मालिकेची वेळ बदलून ती रात्री ११ वाजता करण्यात आली. तरीही टीआरपीत फारसा फरक न पडल्याने अखेर मालिकेचा पडदा लवकरच पडणार आहे. अंतिम भागाच्या प्रोमोसोबत “आता कनकदत्ता आणि पर्णिकेचा शेवट” असं कॅप्शन देण्यात आलं आहे. हा प्रोमो समोर येताच सोशल मीडियावर प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. काही प्रेक्षकांनी “आत्ताच ही मालिका पाहायला सुरुवात केली होती आणि लगेचच ती बंद होत आहे” अशी नाराजी व्यक्त केली आहे. तर काहींनी कलाकार बिग बॉसमध्ये सहभागी होणार असल्यामुळेच मालिका संपवली जात आहे का, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

या मालिकेत अक्षय केळकर, वैष्णवी कल्याणकर आणि रुची जाईल हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. विशेषतः चेटकीण पर्णिकेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री रुची जाईल हिच्या अभिनयाचं प्रेक्षकांकडून कौतुक झालं होतं. दरम्यान, स्टार प्रवाहवर १९ तारखेपासून एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. (Kajalmaya serial)
===============================
===============================
‘तुझ्या सोबतीने’ या मालिकेत अभिनेत्री एतशा झंझगिरी आणि अभिनेता अजिंक्य ननावरे यांची जोडी पहायला मिळणार असून, ही मालिका रात्री ९ वाजताच्या स्लॉटमध्ये प्रसारित होणार आहे. त्यामुळे ‘नशिबवान’ या मालिकेच्या वेळेत बदल होण्याच्या चर्चा सध्या रंगू लागल्या आहेत. मात्र, याबाबतची अधिकृत माहिती स्टार प्रवाह वाहिनीने अद्याप जाहीर केलेली नाही.