
स्टार प्रवाहच्या ‘तुझ्या सोबतीने’ मालिकेला सुरु होण्याआधीच ब्रेक; १२ ऐवजी ‘या’ दिवशी दाखवला जाणार पहिला एपिसोड
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच स्टार प्रवाह आपल्या प्रेक्षकांसाठी एक नवी भावनिक कथा घेऊन येण्याच्या तयारीत आहे. ‘तुझ्या सोबतीने’ ( Tujhya Sobtine) ही बहुप्रतिक्षित मालिका लवकरच छोट्या पडद्यावर दाखल होणार असली, तरी तिच्या प्रसारणाबाबत एक महत्त्वाचा बदल समोर आला आहे. वाहिनीकडून याआधी या मालिकेचा पहिला भाग १२ जानेवारीपासून दाखवण्यात येईल, अशी अधिकृत घोषणा करण्यात आली होती. मात्र, मालिकेच्या लॉन्चच्या अगदी काही दिवस आधी स्टार प्रवाहने प्रसारणाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आता ‘तुझ्या सोबतीने’ ही मालिका १२ ऐवजी १९ जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Tujhya Sobtine New Serial)

ही मालिका सोमवार ते शुक्रवार रात्री ९ वाजता प्रसारित केली जाणार असल्याचं वाहिनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. या नव्या मालिकेमुळे स्टार प्रवाहच्या प्राइम स्लॉटमध्ये कोणता बदल होणार, याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. सध्या रात्री ९ वाजता आदिनाथ कोठारेची प्रमुख भूमिका असलेली ‘नशीबवान’ (Nashibvaan) ही मालिका प्रसारित होत आहे. त्यामुळे ‘तुझ्या सोबतीने’ सुरू झाल्यानंतर ‘नशीबवान’च्या वेळेत बदल होणार का, की एखादी मालिका निरोप घेणार यावर अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

‘तुझ्या सोबतीने’ ही कथा दोन भिन्न पार्श्वभूमीत वाढलेल्या व्यक्तींच्या आयुष्याभोवती फिरते. एका बाजूला मुंबईतील चाळीत राहणारी, घराची संपूर्ण जबाबदारी समर्थपणे सांभाळणारी आणि आयुष्याकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवणारी नुपूर आहे. तिच्या मते, परिपूर्णतेपेक्षा अपूर्णतेतच आयुष्याचं खरं सौंदर्य दडलेलं असतं. दुसरीकडे आहे मल्हार खानविलकर, झगमगाट, शिस्त आणि परफेक्शनच्या दुनियेत वावरणारा ‘सुमती इव्हेंट्स’चा मालक. नुपूर आणि मल्हारची जीवनशैली, विचारसरणी आणि जगणं पूर्णपणे वेगळं असलं, तरी एकमेकांच्या साथीने ते आयुष्याचा प्रवास कसा घडवतात, याची भावनिक गोष्ट म्हणजे ‘तुझ्या सोबतीने’. (Tujhya Sobtine New Serial)
===============================
===============================
या मालिकेत एतशा संझगिरी (Aetashaa Sansgiri) आणि अजिंक्य ननावरे (Ajinkya Nanaware ) ही नवी जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे. त्यांच्यासोबतच ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ (Sukh Mhanje Nakki Kay Asat) या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री माधवी निमकर (Madhavi Nimkar)पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. तिच्या कमबॅकमुळे मालिकेविषयी प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे.