Nilesh Sabale : “कलाकारांना फक्त ऐकूनच घ्यावं लागतं”; असं का

Sthal Movie Review : अरेंज मॅरेजची वैचारिक गोष्ट!
लग्न… काळ बदलत गेला तसं लग्नसंस्थेच्या परिभाषाही बदलल्या. पुर्वीच्या काळात घरातील मोठी मंडळी त्यातही पुरुष मंडळी जो मुलगा पसंत करेल त्याच्याशी लग्न करायचं आणि संसार थाटायचा संच घडत आलं. काळानुरुप आणि शिक्षणामुळे स्त्रियांनी त्यांचे हक्क आणि वैचारिक स्वातंत्र्य याचं महत्व समजून अरेंज मॅरेज जरी असलं तरी आपला जोडीदार कसा हवा? याबद्दलच्या अपेक्षा त्या मांडू लागल्या आणि स्वत:ही आलेल्या स्थळाला पारखू लागल्या. आता तर काय लव्ह मॅरेज हे फारच कॉमन झालंय. वयाची तिशी आली तरी लग्न न झालेली मुलगी घरात असेल तर “तुझा तु शोध गं बाई पोरगा आणि पिवळे करुन टाक हात” हे संवाद घरोघरी ऐकू येतात. अरेंज आणि लव्ह मेरेजनंतर लिव्ह इन रिलेशनशिप ही नवी संकल्पना पाश्चिमात्य देशांकडून आपल्या संस्कृतीत हळूहळू का होईना रुजू लागली. अशाच अरेंज मॅरेजची विदर्भाच्या एका गावातील अनोखी गोष्ट ‘स्थळ’ चित्रपटात दाखवलीये. जाणून घेऊयात हा चित्रपट आहे तरी कसा?(Sthal Movie Review)
काय आहे कथानक….?
आधी जाणून घेऊयात चित्रपटाची कथा काय आहे. तर ‘स्थळ’ या चित्रपटाची कथा घडते विदर्भात. सविता जिचं स्वप्न लग्न करुन संसार थाटायचं नव्हे तर MPSC करुन सरकारी नोकरी करण्याचं असतं. मात्र,आई-वडिलांच्या इच्छेखातर तिला एकामागून एक येणारी स्थळं पाहावी लागतात आणि त्यांच्याकडून येणारा नकारही पचवून घ्यावा लागतो. तिचं लग्न जमत नाहीये याचा तिला जरी आनंद असला तरी त्यामुळे तिच्या करिअरवर होणारा दुष्परिणाम आणि आई वडिलांना होणारा त्रास या सगळ्यात सविताची मात्र गळचेपी होत असते. लग्न जमत नसल्यामुळे सविताच्या कुटुंबाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोनही बदलत जातो. शिवाय कथेतून स्त्री सशक्तीकरण, बेरोजगारी, प्रथा-परंपरा या मुद्द्यांवरही समांतर भाष्य करत ग्रामीण भागातील अरेंज मॅरेजची कथा पाहायला मिळते.(Marathi films Review)
चित्रपटाच्या कथेनंतर आता वळूयात दिग्दर्शन आणि लिखाणाकडे
या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत जयंत सोमलकर… आणि प्रस्तुती केलीये सचिन पिळगावकर यांनी! शहरात राहणाऱ्या माणसाला गावाची ओढ असतेच. त्यामुळे प्रत्यक्षात का होईना चित्रपटाच्या कथेमार्फत विदर्भ फिरवून आणण्याची चोख जबाबदारी लेखकाने निभावलीये असं म्हणावं लागेल. ग्रामीण भाग, गावातील लोकांचं दैनंदिन जीवन, शहरात कितीही प्रगती होत असली तरी आपल्या संस्कृती आणि मातीशी त्यांचं जोडलेलं नातं आजही कसं आहे? यावर फोकस करुन प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचं कसब दिग्दर्शकानं साधलं आहे. चित्रपटात एक सीन आहे ज्यात सविताला पाहायला ‘पाहूणे’ येतात. त्यावेळी पाहूणे-मंडळींनी फ्रेश झाल्यानंतर नव्या टॉवेललाच हात-पाय पुसले आहेत हे दाखवण्यासाठी टॉवेलचा प्राईज टॅग तसाच ठेवून त्यावर फोकस करणं, किंवा दाराच्या बाहेर घरात फक्त पुरुष मंडळी ‘मुलगी’ पाहायला आले आहेत हे अधोरेखित करण्यासाठी पुरुषांच्याच चपला दाखवणं; यातून दिग्दर्शकाने अगदी विचारपूर्वक कथेची मांडणी केल्याचं दिसून येतं. खरं तर चित्रपटात तीन घटना समांतर सुरु असल्या तरीही त्या घडण्यामागचं मुळ कारण हे ‘लग्न’चं आहे यावरुन फोकस हलणार नाही याची विशेष काळजी लेखकाने घेतली आहे.(Entertainment tadaka)

स्थळ या चित्रपटात केवळ लग्न याच विषयावर भाष्य न करता शेतकरी आत्महत्या, हुंडा, विद्यार्थ्यांचं शिक्षकांकडे वाढणारं आकर्षण, बेरोजगार तरुण या विषयांनीही लक्ष वेधलं आहे. या व्यतिरिक्त कितीही म्हटलं की, स्त्रियांना स्वातंत्र्य आहे, त्यांना त्यांचं जीवन त्यांच्या अटीशर्थींनी जगण्याचा अधिकार आहे पण वास्तविक जीवनात पाहता आजही ग्रामीण भागातील स्त्री पुरुषांच्या वैचारिक, आर्थिक, मानसिक वर्चस्वाखाली कशी गुदमरतेय हे भयाण सत्य संवादातून उत्तम सादर केलं गेलं आहे.
============
हे देखील वाचा :Madhuri Dixit-Nene : सुपरस्टार असूनही माधुरीला का मिळायचा आईचा ओरडा?
============
सिनेमॅटोग्राफरच्या नजरेतून…
चित्रपटाच्या सिनॅमॅटोग्राफीकडे आता जरा वळूयात…
चित्रपटातला एक सीन सांगायचा झाला तर सविताला पाहायला आलेले ‘पाहुणे’ आणि सोबतची मंडळी तिला काही ठराविक प्रश्न विचारतात; त्यावेळी मुलीच्या मागून कॅमेरा अॅंगल दाखवत फ्रेममध्ये केवळ पुरुष मंडळी दिसतात. यातून मुलीच्या जीवनातील महत्वाचे निर्णय आजही पुरुषांच्याच मर्जीने घेतले जातात हा विचार कुठेतरी प्रेक्षकांना दिला जातो. किंवा अजून एका सीनमध्ये मुलीचे आई-वडिल मुलीच्या लग्नाचा सगळा खर्च कसा करायचा? यावर संवाद साधताना दिसतात; कारण मुलीचं लग्न म्हटलं की सर्व ‘रितीरिवाज’ पाळावे लागणारच. आणि या सगळ्यासाठी पैसे कुठून येतील याचा विचार करत असता रुममधील बल्बचा प्रकाश घरात कोपऱ्यात पडलेल्या कापसाच्या ढिगाऱ्यावर पडताना दाखवलाय; वास्तविक बाजारात कापसाला योग्य भाव मिळत नसल्याने घरात कापूस पडून आहे; पण आता मात्र जो भाव मिळेल त्या भावात कापसाचं पिक विकूनच सविताच्या लग्नासाठी पैसे उभे करावे लागतील हा सविताच्या आई-वडिलांच्या नजरेतील संवाद चांगल्या पद्धतीने चित्रित केला गेला आहे. एकंदरीत कथेसोबत सिनॅमेटॉग्राफी देखील चित्रपटाची जमेची बाजू ठरते. चित्रपटात बऱ्याच उत्कृष्ट कॅमेरा फ्रेम्स आणि अॅंगलच्या माध्यमातून सिनेमॅटॉग्राफरने संवाद नसूनही गोष्ट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा छान प्रयत्न केला आहे.

===============================
हे देखील वाचा : Priyanka Chopra : मिस वर्ल्ड जिंकण्यासाठीच ‘ती’ आली होती!
===============================
कथाच सुपरस्टार…
कथा, दिग्दर्शन, लिखाण, सिनेमॅटॉग्राफी यानंतर आता अभिनयाकडे वळूयात. स्थळ या चित्रपटाची कथा जशी युनिक आहे तसंच कलाकारांच्या बाबतीतही एक ट्विस्ट आहे. कारण या चित्रपटातील एकाही कलाकाराने आत्तापर्यंत कॅमेऱ्यासमोर काम केलं नाही आहे. म्हणजेच या चित्रपटात एकही स्टार कलाकार नसून सगळ्या स्थानिक कलाकारांनी चित्रपटात अभिनय करत आपापली पात्रं उत्कृष्टरित्यासादर केली आहेत. दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे ‘स्थळ’ चित्रपटाची कथाच सुपरस्टार असल्यामुळे चित्रपटाला बड्या कलाकाराची किंवा चेहऱ्याची गरज वाटत नाही. (Sthal Movie)
७ मार्च २०२५ रोजी प्रदर्शित झालेल्या स्थळ या चित्रपटाने यापुर्वीच ४८ व्या टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (TIFF) सर्वोत्कृष्ट आशिया पॅसिफिक चित्रपटासाठीचा NETPAC पुरस्कार जिंकला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी चित्रपसृष्टीचं नाव उंचावणारा स्थळ चित्रपट एकदातरी चित्रपटगृहात जाऊन नक्की पाहा… आणि हो तुम्हाला रिव्ह्यू कसा वाटला हे देखील आम्हाला नक्की कळवा…. (Sthal movie review)
‘कलाकृती मिडीया’ स्थळ चित्रपटाला देत आहे 3.5 स्टार!