‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
अभिमान एक सत्यकथा
ख्यातनाम दिग्दर्शक ऋषिकेश मुखर्जी ’अभिमान’ सिनेमावर काम करीत होते. एकाच क्षेत्रात काम करणार्या पती पत्नीच्या आयुष्याची अहंकार आणि परस्परातील स्पर्धेमुळे विस्कटणारी चौकट त्यांना दाखवायची होती. त्या करीता त्यांनी एक सत्यकथा निवडली. ही कहाणी होती गायक किशोरकुमारच्या पहिल्या लग्नाची.
१९५० साली किशोरने रूमा देवी घोष सोबत लग्न केले. रूमा घोष बंगाली भाषेतील उत्तम गायिका व अभिनेत्री होत्या. किशोर त्यांच्या तुलनेत स्ट्रगलर होता. अमितकुमारच्या जन्मानंतर त्यांच्यातील मतभेद वाढले व परस्परातील दरी रूंदावत गेली. लहानग्या अमितला किशोरकडे सोडून रूमा घोष १९५८ साली विभक्त झाल्या. ऋषिदाच्या डोक्यात ही रीयल स्टोरी फार दिवसांपासून डोक्यात होती. या कथानकात थोडासा फेरफार करून त्यांनी अभिमान सिनेमा बनवायचे ठरवले.
अभिमान सिनेमा जेंव्हा फ्लोअर वर गेला त्या वेळी अमिताभ स्ट्रगलरच होता तर जया भादुरी बर्यापैकी नाव झालेली अभिनेत्री होती. हा चित्रपट ऋषिकेश यांचे देखणे दिग्दर्शन, कलावंताचा अप्रतिम अभिनय व सचिनदाच्या मिठास संगीताकरीता (गीतकार मजरूह सुलतानपुरी) आजही आठवला जातो. यातील नायक सुबीरकुमार हा गायक असतो. या चित्रपटात नायकाच्या तोंडी चार गाणी आहेत. त्या पैकी एक सोलो होते आणि तीन ड्युएटस होती. या युगल गीताच्या वेळी ऋषिदा यांनी लताच्या सोबत किशोर, रफी आणि मुकेश यांचा स्वर वापरायचे ठरवले. एकाच सिनेमात नायकाला तीन चोटीच्या गायकांचा आवाज देण्याची त्यांची कल्पना भन्नाट होती. असला प्रकार तोवर कधी झाला नव्हता.
या सिनेमातील कथेच्या मागणीनुसार नायिकेचा स्वर हा नायकापेक्षा थोडा सरस आहे असे दाखवायचे होते. कथा गीत संगीताच्या माध्यमातूनच पुढे जाते. नायक-नायिका तील अहंकाराची भावना व त्यातून घडणार्या नाट्यात गाण्यांची भूमिका फार महत्वाची होती. ’तेरी बिंदीया रे’ या गीतात लता सोबत रफीचा, ’तेरे मेरे मिलन की ये रैना’ या गीतात लता सोबत किशोरचा स्वर आहे. तिसर्या युगल गीतात ’लूटे कोई मन का नगर बनके मेरा साथी’ मध्ये खरं तर मुकेशच्या आवाजात ठरलं होतं. तसं झालं असतं तर एकाच सिनेमात एका नायकाला तीन प्रमुख गायकांचे स्वर वापरले गेल्याचा विक्रम झाला असता. पण मुकेश नेमका त्या वेळी उपलब्ध न झाल्याने मनहर च्या स्वरात हे गाणे रेकॉर्ड झाले.
या सिनेमात अनुराधा पौडवालच्या स्वरात एक श्लोक आहे. त्या मुळे तिच्याही पार्श्वगायनाचा श्रीगणेशा झाला. लताच्या स्वरातील तीन सोलो ’नदीया किनारे’, ’अब तो है तुमसे हर खुशी अपनी’, ’ पिया बिना पिया बिना’ अतिशय अप्रतिम बनली होती. याच सिनेमातील बिंदू च्या भूमिकेने प्रथमच एक वेगळी ओळख निर्माण केली.
’अभिमान’ करीता सचिनदा आणि जया भादुरीला फिल्म फेयर पुरस्कार मिळाला. ३ जून १९७३ रोजी अमिताभ-जया यांचे लग्न झाले व २७ जुलै १९७३ रोजी अभिमान प्रदर्शित झाला. हा सिनेमा देशात तर हिट झालाच पण श्रीलंकेतील कोलंबोच्या एम्पायर थिएटर मध्ये या सिनेमाने तब्बल ५९० दिवस मुक्काम ठोकला!
धनंजय कुलकर्णी