‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
वंचितांच्या वेदना रुपेरी पडद्यावर मांडणारा दिग्दर्शक प्रकाश झा
“लोकं गोष्टी लिहतात, पेंटिंग्ज बनवतात, संगीतसाधना करतात तर मी फिल्म्स बनवतो.. हीच तर माझी भाषा आहे..” -प्रकाश झा (प्रख्यात दिग्दर्शक, निर्माता आणि लेखक)
सिनेमा, कला, संगीत इत्यादींचा मागमूस नसलेल्या ब्राम्हण कुटुंबात प्रकाशचा जन्म झाला. गाव बेटिया, जिल्हा चंपारण, राज्य बिहार. तिलैय्याच्या सैनिक स्कूलमध्ये शिक्षण घेतलेल्या प्रकाशला खरंतर सैन्यात सहभागी व्हायचं होतं किंवा यूपीएससी देऊन प्रशासकीय अधिकारी बनून देशसेवा करायची होती. दिल्ली युनिव्हर्सिटीच्या रामजस कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतल्यावर त्याला नामांकित चित्रकारांच्या कलाकृतींचा आस्वाद घेता आला. ह्या कलाकृती बघताना आपला पिंड वेगळा आहे याची त्याला जाणीव झाली आणि तोही चित्रकार बनण्याच्या ध्येयाने झपाटून मुंबईला आला. मुंबईच्या जे. जे. स्कुल ऑफ आर्टस् मध्ये ऍडमिशन घ्यायची तयारी करत असतानाच एका परिचितासोबत त्याला एका फिल्मची शूटिंग बघायला जाण्याचा योग आला आणि तिथूनच सगळं चित्र पालटलं.
नवीन निश्चल, रेखा आणि प्राण यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘धर्मा’ची शूटिंग बघताना ते सगळे कलाकार सांभाळणे, त्यांचे कॉस्च्युम्स, सेटवरील गर्दी नियंत्रित करणे ही सर्व कामे दिग्दर्शक म्हणून चांदसाब करत होते नि करवूनही घेत होते, हे सर्वकाही प्रकाशसाठी नवीन होतं आणि त्याहीपेक्षा जास्त भारावून टाकणारं होतं. ठरलं! त्याने घरच्यांच्या विरोधाला न जुमानता पुण्याच्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट (FTII) ला ऍडमिशन घेतलं आणि एडिटिंग शिकू लागला. पण तिथेही विद्यार्थ्यांनी संप पुकारल्यामुळे त्याला आपला कोर्स अर्धवट सोडून मुंबईला यावं लागलं. आत्तापर्यंतच्या शिक्षण आणि अनुभवाच्या जोरावर काम शोधत असताना त्याला गोवा सरकारकडून माहितीपट बनवण्यासाठी विचारण्यात आलं आणि त्याने झटकन ते काम स्वीकारलं. त्याकाळी थिएटर्समध्ये चित्रपट दाखवण्यापूर्वी माहितीपट दाखवणे गरजेचं होतं कारण सरकारला मिळणाऱ्या रेव्हेन्यूमध्ये त्यांचा वाटा मोठा होता.
१९७५ मध्ये बनवलेल्या ‘अंडर द ब्लू’ या माहितीपटापासून प्रकाशच्या करिअरला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. त्यानंतरची पुढची ८ वर्षे प्रकाशने वेगवेगळ्या माहितीपटांमधून आपली घोडदौड चालूच ठेवली. १९८४ च्या बिहार शरीफच्या जातीय दंगलींवर आधारित ‘फेसेस आफ्टर स्टॉर्म’ हा त्याचा माहितीपट तत्कालीन राज्य सरकारच्या दबावामुळे केवळ चारच दिवसांत बॅन केला गेला. पण या माहितीपटाला त्यावर्षी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आले. त्याच वर्षी आलेल्या ‘हिप हिप हुर्रे’ आणि ‘दामुल’ या त्याच्या पहिल्या दोन चित्रपटांमधून प्रकाश एक चित्रपट दिग्दर्शक म्हणून घराघरात पोहचला. संवेदनशील विषय आणि प्रभावी स्टोरीटेलिंगच्या जोरावर ‘दामुल’ने प्रेक्षकांची मने जिंकली. राष्ट्रीय पुरस्कार, फिल्मफेअर क्रिटिक्स पुरस्कारांवर मोहोर उमटवणारा ‘दामुल’ हा बिहारच्या बंधवा मजुरीवर आधारित चित्रपट होता.
हे देखील वाचा: संजय लीला भन्साळी: ‘स्टारडम’ मिळवलेला दिग्दर्शक
लंडन फिल्म फेस्टिव्हलमध्ये नावाजली गेलेली ‘परिणति’ बनवण्यापूर्वी प्रकाशने ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ या लोकप्रिय दूरदर्शन मालिकेचं दिग्दर्शन केलं. ही मालिकाही प्रचंड गाजली. १९८९ला आलेला ‘परिणति’ हा चित्रपट सुप्रसिद्ध राजस्थानी साहित्यिक विजयदान देठा यांच्या ‘अमीत लालसा’ या लघुकथेवर आधारित होता. जी कथा पडद्यावर अर्ध्या तासात संपू शकत होती, त्या कथेचं दोन तासांच्या चित्रपटामध्ये रूपांतर करणं यातच प्रकाशच्या दिग्दर्शकीय कौशल्याची खरी कसोटी लागते. कसलाही अतिरंजितपणा न दाखवता साध्यासोप्या कथानकाची कास धरून बनवलेला हा सिनेमा लंडनच्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वांच्याच पसंतीस उतरला. पॅरॅलल सिनेमामधून हटके संकल्पना कलात्मक दृष्टीने मांडणारा दिग्दर्शक म्हणून प्रकाश झाचं (Prakash Jha) नाव झालं.
त्यानंतर तब्बल ८ वर्षांनी ‘मृत्युदंड’च्या निमित्ताने प्रकाशने दिग्दर्शक म्हणून पुनरागमन केलं. सुप्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दिक्षितच्या (Madhuri Dixit) कारकिर्दीतील सर्वोत्तम चित्रपटांमध्ये ‘मृत्युदंड’चं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं. नव्या दशकात येऊ घातलेल्या चित्रपटसृष्टीच्या बाजारीकरणाची समीकरणे लक्षात घेऊन प्रकाशने हा चित्रपट बनवताना आर्ट आणि कमर्शियल सिनेमाला साजेश्या घटकांचा योग्य वापर केला. ९०च्या दशकातील बहुतांश सिनेमांसारखं याही चित्रपटात संगीत, गाणी, सिनेमॅटोग्राफी आणि आवश्यक तांत्रिक बाबींवर गोष्टींवर भर दिला गेला परंतु आपला कलात्मक दृष्टीकोन इथेही कायम ठेवण्यात प्रकाश यशस्वी ठरला. अन्यायकारक पुरुषसत्ताक समाजव्यवस्थेशी गावातील महिलांनी पुकारलेल्या बंडावर या चित्रपटाची कथा बेतलेली होती.
‘दिल क्या करे’ (१९९९) आणि ‘राहुल’ (२००१) हे दोन्ही चित्रपट सपशेल फ्लॉप गेल्यानंतर प्रकाशने पुन्हा एकदा माहितीपटांकडे आपला मोर्चा वळवला आणि ‘सोनल’ (२००२) या माहितीपटाची निर्मिती केली. प्रख्यात शास्त्रीय नृत्यांगना डॉ. सोनल मानसिंग यांच्यावर आधारित ‘सोनल’ला त्यावर्षीच्या राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. २००३मध्ये प्रकाशने अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला ‘गंगाजल’ दिग्दर्शित केला, जो आज एक कल्ट क्लासिक म्हणून ओळखला जातो. वास्तविक, ‘दिल क्या करे’ आणि ‘राहुल’च्या अपयशानंतर इतकी मोठी स्टारकास्ट घेऊन प्रकाश ‘गंगाजल’च्या रूपाने एक जुगारच खेळला होता, पण यावेळी हा जुगार यशस्वी ठरला. ‘गंगाजल’ला लोकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं. सत्यघटनेवर आधारित असलेला हा चित्रपटही राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आला.
‘गंगाजल’पासून सुरू झालेली प्रकाशची ही दमदार सेकंड इनिंग ‘मट्टो की साईकेल’वर येऊन थांबलीय. ‘गंगाजल’नंतर एक दिग्दर्शक म्हणून ‘अपहरण’, ‘राजनीती’, ‘आरक्षण’, ‘चक्रव्यूह’, ‘सत्याग्रह’, ‘जय गंगाजल’, ‘परीक्षा’ आणि ‘सांड की आँख’ असे एकेक दर्जेदार चित्रपट आणि ‘आश्रम’ सारखी सुपरडुपरहिट वेबसिरीज देऊन प्रकाशने सध्याच्या स्पर्धात्मक युगात आपलं स्थान अढळ ठेवलं आहे. त्याचसोबत ‘राजनीती’, ‘जय गंगाजल’, ‘सांड की आँख’ आणि ‘मट्टो की साईकेल’मध्ये इतर सहकलाकारांच्या तोडीस तोड अभिनय करत प्रेक्षकांना आश्चर्यचकित केलेलं आहे. आरक्षणामुळे समाजात उठणारे वादंग, नक्षलवाद आणि सरकार, न्याय्य मागण्यांसाठी केलेली आंदोलने, स्त्री-पुरुष समानता असे कित्येक विषय प्रकाशने त्याच्या दिग्दर्शनाच्या जोरावर प्रेक्षकांसमोर प्रभावीपणे मांडले आहेत.
त्याच्या चित्रपटांच्या विषयांमुळे कित्येकदा त्याला जनतेच्या, नेत्यांच्या, सरकारच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. बिहारची प्रतिमा मलीन करण्याचा ठपका त्याच्यावर लावला गेला आहे. प्रकाशच्या मते, एक बिहारी असल्यामुळे तेथील लोकजीवनाचे पडसाद त्याच्या कलाकृतींमध्ये उमटणं स्वाभाविक आहे. मात्र, बिहारला बदनाम करणे हा त्याच्या चित्रपटांचा हेतू कदापि नव्हता, हेही तो तितक्याच कळकळीने सांगतो. नुकत्याच आलेल्या ‘आश्रम’ या वेबसिरीजमध्येही त्याने पुन्हा असे वादंग निर्माण होऊ नयेत यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतल्याचं प्रेक्षकांना कळवलं होतं. कोणत्याही धर्माशी निगडित नसलेले रंग आणि विधी निवडून ‘आश्रम’ची निर्मिती केली गेली. याही सिरीजमध्ये प्रकाशने नेहमीप्रमाणेच समाजातील वेगवेगळ्या संवेदनशील मुद्द्यांना हात घातलेला आहे.
त्याचप्रमाणे, सध्या वेबसिरीज म्हणलं की जो मालमसाला प्रेक्षकांना अभिप्रेत असतो, तोही या सिरीजमध्ये योग्य प्रमाणात भरलेला आहे. तगडी स्टारकास्ट आणि खास ‘प्रकाश झा’स्टाईलचं स्टोरीटेलिंग असलेली ही सिरीज या लॉकडाऊनमध्ये प्रचंड गाजली.
चित्रपटाच्या कथानकाचा गाभा राजकिय असो वा सामाजिक, फक्त प्रबोधनावर भर न देता प्रेक्षकांना खिळवून ठेवता येईल असा मनोरंजक कंटेंट निर्माण करण्यावर प्रकाशचा जास्तीतजास्त भर असतो. त्याच्या चित्रपटांमध्ये असलेली खुमासदार संवादशैली, पॅरॅलल आणि आर्ट सिनेमांमध्ये अभावाने आढळणारे असे कमर्शियल सिनेमासाठी आवश्यक घटक प्रेक्षकांना भावतात. प्रकाश हा हिट-फ्लॉपच्या गणितांमध्ये बसणारा दिग्दर्शक नाही. तो स्वतः एक निर्माता असल्याकारणाने चित्रपटासाठी गुंतवलेलं भांडवल आणि नफा यांचं उत्तम गणित साधण्यात तो यशस्वी ठरलेला आहे. समाजातील संवेदनशील मुद्द्यांवर भाष्य करणारे आपले विचार, आपला दृष्टिकोन आपल्या सिनेमांमधून प्रेक्षकांपर्यंत पोचवणे आणि त्यातून त्यांना केवळ नीतिमत्ता आणि प्रबोधनाचे धडे न देता त्यांचं मनोरंजन करणे या दोन्ही बाबींचा सुवर्णमध्य प्रकाशने साधलेला आहे.
सक्रिय राजकारणात प्रकाश अयशस्वी ठरला असला तरीही समाजकारणात त्याने स्वतःला झोकून दिलेलं आहे. कसलीही फिल्मी पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबातून आलेल्या प्रकाशने बिहारवासीयांना उत्तमोत्तम चित्रपट पाहता यावेत यासाठी पटणा शहरात मल्टिप्लेक्स आणि मॉल उभा केला आहे. ‘अनुभूती’ या त्याच्या स्वयंसेवी संस्थेमार्फत शिक्षण आणि आरोग्य क्षेत्राबरोबरच शेतकरी, मजूर कुटुंबांना अर्थसहाय्य, आपत्ती निवारण इत्यादी प्रकल्प त्याने हाती घेतलेले आहेत.
आज या प्रतिभावंत दिग्दर्शकाचा वाढदिवस. वंचितांच्या वेदना फक्त रुपेरी पडद्यावर मांडण्यापुरत्या मर्यादित न ठेवता प्रत्यक्षात त्या दूर करण्यासाठी हातभार लावणाऱ्या या सच्च्या कलावंताला कलाकृती मीडियाचा सलाम!! त्याच्या सामाजिक जाणिवा अश्याच उत्तरोत्तर प्रगल्भ होत जावोत आणि उत्तमोत्तम कलाकृतींमधून त्या प्रेक्षकांपर्यंत पोहचत राहोत, हीच सदिच्छा!!