ऋतुजा बागवेला मिळाला मानाचा उस्ताद बिस्मिल्लाह खाँ युवा पुरस्कार
‘ख्वाडा’ ते ‘वाय’… रसिका चव्हाणचा प्रेरणादायी प्रवास
‘खिचिक’ चित्रपटाचं शूट सुरू होतं, तेव्हाची गोष्ट. रसिका शूटिंगदरम्यानच कित्येकांच्या पसंतीस उतरली होती. जिथं शूट सुरू होतं, तिथं एक ताई यायच्या. एकदा रसिका सहज बोलून गेली, “ताई, तुमची साडी खूप छान आहे हां…” दुसऱ्या दिवशी त्या ताईनं ती साडी रसिकाला आणून दिली. म्हणाली, “तुम्हाला आवडली ना, मग खास तुमच्यासाठी आणलेय, घ्या.”
रसिका गहिवरली. एरवी, लोक एका भेटीनंतर सहसा कुणाला लक्षात ठेवत नाहीत. इथं तर रसिका नवोदित. तरीही त्या ताईनं एवढं प्रेम दिलं होतं. तिच्या भूमिकेची ती चाहती झाली होती. आयुष्यात असे काही प्रसंग बळ देणारे असतात. आपल्या कामाची ही पावती असल्याची जाणीवही करून देतात, असं रसिका हळवेपणानं सांगते.
रसिका चव्हाण! सालस व्यक्तिमत्त्वाची, संपर्कातील लोकांशी माणूसपणावर विश्वास ठेवून वागणारी, मराठी चित्रपटसृष्टीला मिळालेली एक गुणी, प्रभाव पाडणारी कलावंत. ‘ख्वाडा’ या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटापासून तिच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. अल्पावधीतच तिनं ‘दशक्रिया’, ‘खिचिक’, ‘वाय’ या चित्रपटांतून रसिकांची मनं जिंकली. कलेचं वातावरण असलेल्या घरात जन्मलेली ही कन्यका सध्या मनोरंजनक्षेत्राचा पडदा व्यापायला निघालेली आहे. (Success journey of Rasika Chavan)
रसिकाचे वडील राजेंद्र चव्हाण साइन बोर्ड आर्टिस्ट, तर आई नलिनी न्यायालयात असिस्टंट सुपरिटेंडंट म्हणून कार्यरत. शाळा, कॉलेजामध्ये असतानापासूनच रसिका नाटकं, वक्तृत्व स्पर्धा आदींमध्ये अधिक रमायची. आई घरात तर बाबा ऑफिसमध्ये, असं कित्येक घरातलं चित्र असतं. इथं वेगळं होतं. आर्टिस्ट असलेले बाबा घरीच काम करायचे, तर आई ऑफिसला असायची. अशावेळी रसिका, तिची लहान बहीण राधिका यांचं सर्वकाही बाबाच सांभाळायचे. शाळेत सोडायला जाणं, शाळेत एखादी स्पर्धा असेल, तर त्याची तयारी करवून घेणं, विविध स्पर्धांची माहिती काढून तिथं रसिकाच्या नावाची नोंदणी करणं, यात बाबांचाच पुढाकार असायचा.
शाळा, कॉलेजात असताना नाटकांत कामं सुरू होती. मात्र, याच क्षेत्रात यायचं वगैरे असं काही ठरलं नव्हतं. कल्याणच्या के. एम. अग्रवाल कॉलेजमध्ये पहिल्या वर्षाला असताना ‘ख्वाडा’साठी ऑडिशन दिली होती. त्यात सोनूच्या भूमिकेसाठी तिची निवडही झाली. आई-बाबांनी परवानगी दिली. उन्हाळ्यात चित्रीकरण होतं. त्यामुळे कॉलेज डिस्टर्ब होण्याचा प्रश्नच नव्हता. (Success journey of Rasika Chavan)
चित्रीकरण आटोपलं. मात्र, त्यादरम्यान दोन वर्षे निघून गेली. चित्रपट प्रदर्शित व्हायची चिन्हं दिसेनात. रसिकासह अन्य कलावंतांनीही आशा सोडली होती. मात्र, राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा झाल्यानंतर स्पेशल ज्युरीचं अवॉर्ड मिळालं. त्यावेळी चित्रपट प्रकाशझोतात आला. चित्रपटगृहांत प्रदर्शनाची तारीखही ठरली. मग काय, अख्ख्या युनिटमध्ये उत्साहा संचारला.
रसिकाचे बाबा राजेंद्र यांनी स्वत: चित्रपटाचे दहा ते बारा फ्लेक्स बनविले. अख्ख्या युनिटला घरी बोलवलं, त्यांचा सत्कार केला. रसिकासाठी मनोरंजनक्षेत्राची दारं खुली झाली होती. आता याच क्षेत्रात करिअर करायचं, हे तिनं ठरवून टाकलं होतं. घरच्यांनी तिला पूर्ण साथ दिली. (Success journey of Rasika Chavan)
पुढं ‘दशक्रिया’, ‘खिचिक’ आणि आता ‘वाय’हे तिचे चित्रपट प्रदर्शित झाले. ‘दशक्रिया’त दिलीप प्रभावळकर, मनोज जोशी, मिलिंद शिंदे, आदिती देशपांडे, तर ‘खिचिक’मध्ये सुदेश बेरी, सिद्धार्थ जाधव आदी दिग्गज कलावंतांसोबत काम करण्याची संधी तिला मिळाली. ‘वाय’मध्ये मुक्ता बर्वेसोबत काम करायला मिळतंय म्हटल्यावर तर तिचे आई-बाबा आनंदानं नाचले. “माझ्या कामानं माझ्यापेक्षा बाबा-आईला अधिक आनंद होतो. माझी आजपर्यंतची वाटचाल मी बाबांमुळेच करू शकले, असं रसिका गहिवरून नमूद सांगते.”
अजित वाडीकर दिग्दर्शित ‘वाय’च्या चित्रीकरणादरम्यानचे प्रसंग सदैव लक्षात राहण्यासारखे आहेत. खूप काही शिकायला मिळालं. तब्बल १०७ दिवस या चित्रपटाचं शूट चाललं होतं, अशी आठवण रसिका सांगते.
-तेव्हा तुमचे तुम्हीच असता…
बाबांचे चित्रकलेचे गुण रसिकातही बऱ्यापैकी उतरले आहेत. घरी कलेचं वातावरण होतं. बहीण राधिका पुण्याच्या ललित कला केंद्रात शिकतेय. कथ्थकमध्ये ती बी.ए. करतेय. रसिकानंही कथ्थकचं प्रशिक्षण घेतलंय. मात्र, एका अपघातानंतर तिला कथ्थक बंद करावं लागलं.
अभिनयक्षेत्रात घरातलं कुणीही कार्यरत नव्हतं. ज्यावेळी घरात अभिनयाची पार्श्वभूमी नसते, तेव्हा तुमचे तुम्हीच असता. तुमची तयारी तुम्हालाच करावी लागते, तुमचा अभ्यासही तुम्हालाच करावा लागतो, असं रसिकाचं म्हणणं आहे. (Success journey of Rasika Chavan)
“पहिल्यांदा कॅमेऱ्याला सामोरी गेलीस तेव्हाचा अनुभव काय होता”, असं विचारलं असता ती सांगते, “ज्यावेळी ‘ख्वाडा’चं चित्रीकरण झालं, त्यावेळी सगळीच टीम नवी होती. चित्रीकरणाच्या एक ते दीड महिना आधी आम्ही पुण्याजवळच्या शिक्रापूर येथील लोकेशनवर सोबत होतो. खूप बॉन्डिंग झालं होतं तेव्हा एकमेकांशी. एकाच ताटात जेवायचो आम्ही. त्यामुळे केमिस्ट्री छान जुळून आली होती. पहिल्या दृश्याच्या वेळी थोडी भीती वाटली. मात्र, दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे आणि अन्य युनिटनं सांभाळून घेतलं. त्यामुळे सुरळीत सर्वकाही पार पडलं.”
-जेव्हा शिव्या देण्याची वेळ आली…
प्रीतम एसके पाटील दिग्दर्शित ‘खिचिक’ हा २०१९ला प्रदर्शित झालेला चित्रपट पारधी बेड्यावर आधारित आहे. या चित्रपटात रसिकाच्या तोंडी शिव्या आहेत. “मी मुळातच अतिशय शांत स्वभावाची आणि ‘खिचिक’मधील माझं पात्र माझ्या विरुद्ध स्वभावाचं म्हणजेच आक्रमक स्वरूपाचं. शिवाय, यात मला शिव्याही द्यायच्या होत्या. त्या नुसत्या देऊन चालणार नव्हतं, तर भूमिकेची गरज म्हणून प्रभावीपणे त्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायच्या होत्या. अशावेळी त्या शिव्या मी शिकले. भूमिकेसाठी मेहनत ही अतिशय महत्त्वाची आहे”, असं रसिका सांगते. (Success journey of Rasika Chavan)
लिखाण करायचंय…
रसिकानं सोशल मीडिया विषयात एमबीए केलंय. सोशल मीडिया मॅनेजर म्हणून नोकरीही केली आहे. भविष्यात तिला उत्तमोत्तम भूमिका करायच्या आहेत. जी आपण फक्त वाचून आहोत, अशी ऐतिहासिक पात्रे तिला साकारायची आहेत. याशिवाय, ती उत्तम लिहितेही. भरपूर लिखाण करायचं, ही तिची महत्त्वाकांक्षा आहे.
==========
हे देखील वाचा – परपुरुषाचा स्पर्श नको म्हणून ‘या’ अभिनेत्रीने नाकारली चक्क नायिकेची भूमिका…
===========
काही चित्रपटांसह एका वेबसीरिजची तयारी ती करतेय. तिच्यावर अभिनेत्री स्मिता पाटील यांचा प्रभाव आहे. त्यांच्यासारख्याच भूमिका मिळाव्यात, अशी तिची इच्छा आहे. स्वप्नं भरपूर आहेत आणि ते साकार करण्याची जिद्दही तिच्यात आहे. कमालीचा नम्रपणा, जमिनीवर असणं, सतत नवं शिकण्याची उर्मी हे तिच्यातील आणखी महत्त्वाचे गुण. तिचं नावच मुळात रसिका. आपल्यातील कलागुण आणि मेहनतीच्या भरवशावर ती रसिकांच्या मनावर राज्य करण्यास सज्ज झाली आहे.