Manoj Kumar : हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘भारत’ काळाच्या पडद्याआड

सुरेल प्रवास घडविणारा प्रयोगशील संगीतकार : समीर सप्तीस्कर
गिटारवर काहीतरी धून वाजवत असलेल्या समीरला आईनं विचारलं, “तू त्या टीव्हीवरच्या सारेगमपमध्ये का जात नाहीस?” समीरनं स्मित केलं. गिटार बाजूला ठेवून म्हणाला, “आई, त्या शोमध्ये गायक माझ्यासाठी गातील. माझं काम टीव्हीच्या मागचं आहे.” आईला तेव्हा फारसं काही कळलं नाही. मात्र, नंतर हा ‘समीर… हवाँ का झोका’ संगीताच्या क्षेत्रात असा काही विहार करू लागला, की रसिक त्याच्या सुरांनी तृप्त होऊ लागले. (Success journey of Samir Saptiskar)
समीर सप्तीस्कर! संगीताच्या क्षेत्रातलं सुरेल रत्न. ‘दुनियादारी’, ‘गर्ल्स’, ‘घंटा’ ‘एफयू’ आणि आगामी ‘अनन्या’ आदी चित्रपट, तसंच ‘काळे धंदे’ वेबसीरिज, ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ यासह दहापेक्षा जास्त मालिका असा संगीतकार म्हणून त्याचा प्रवास खूप मोठा आहे. नेटफ्लिक्सवरची टॉपची वेबसीरिज ‘मनी हिस्ट’चं गणपती व्हर्जनही त्यानं केलंय. या क्षेत्रातील त्याची वाटचाल प्रेरक, तेवढीच रोचक आहे.
शाळकरी वयापासूनच संगीताचा कान असलेल्या समीरला या क्षेत्रात काहीतरी करावं, असं वाटत होतं. संगीत ऐकत, मनातल्या मनात काही धून बनवीत घरातच बसायचा तो. स्कूलच्या बँडमध्येही तो जात नव्हता. कारण तो की-बोर्ड वाजवायचा. शाळेतल्या बँडमध्ये की-बोर्डला स्थान नव्हतं.

इंजिनीअरिंगला असताना लोकल बँजो पथकात तो दाखल झाला. इतर वाद्येही तिथं वाजवून पाहायला मिळावीत, हा त्यामागचा उद्देश. ती वाजवता वाजवता आत्मविश्वास वाढू लागला. इंजिनीअरिंगला असतानाच त्यानं स्वत:चा बँड स्थापन केला. त्यासाठी कलाकारांची जुळवाजुळव करणं गरजेचं होतं. संगीताबद्दल रुची असणारे काहीजण पुढं आले. मात्र, त्यांना वाद्ये वाजविता येत नव्हती. त्यातील दोन-चार जणांना समीरनं वाद्ये शिकविली आणि बँड सुरू झाला. (Success journey of Samir Saptiskar)
साधारणत: २०००चा तो काळ. तेव्हा कम्प्युटर नुकताच भरात आला होता. त्यावर म्युझिक प्रोग्रामिंग करता येतं, त्यासाठी वेगळं सॉफ्टवेअर असतं, हे समीरला कळलं. आपली गाणी लोकांपर्यंत पोहोचवायची असतील, तर हे तंत्र अवगत करायलाच हवं, याची जाणीव त्याला झाली होती. मित्राकडे कम्प्युटर होता. त्याच्याकडे जाऊन तो म्युझिक प्रोग्रामिंगचे प्रयोग करू लागला.
इंजिनीअरिंग आटोपल्यानंतर तो मुंबईच्या रुईया कॉलेजमधील एकांकिकांना संगीत देऊ लागला. ‘अनन्या’ ही त्याची संगीतकार म्हणून पहिली एकांकिका. योगायोग म्हणजे याच एकांकिकेवर बेतलेल्या ‘अनन्या’ या चित्रपटाचंही संगीत करण्याची संधीही त्याला मिळाली. विशेष म्हणजे, ‘अनन्या’चं पूर्ण पार्श्वसंगीतही समीरचंच आहे.
समीर सांगतो, “माझ्या पहिल्याच म्युझिकला पुरस्कार मिळाला तेव्हा आत्मविश्वास दुणावला होता. यातूनच पुढं ‘ब्रेकअप के बाद’, ‘गच्ची’सारखे अल्बम आले. रसिकांना ही गाणी आवडू लागली. गीतकार अभिषेक खणकर, सचिन पाठक आदी माझ्यासोबत होते. जे काही बनवायचं ते गुणवत्तापूर्णच असायला हवं, याकडे आमचा कटाक्ष असायचा. तेवढी मेहनत आम्ही घ्यायचो. म्हणूनच आमची गाणी रसिक स्वीकारत होते.” (Success journey of Samir Saptiskar)

हे सगळं करत असताना सेंट्रल रेल्वेमध्ये कार्यरत आई सविता यांना काळजी लागून राहिली होती. मुलानं इतरांसारखी स्थायी नोकरी पकडावी, अशी स्वाभाविक इच्छा सविता यांची होती. कारण, वडील अशोक हे समीरच्या लहानपणीच जग सोडून गेले होते. त्यामुळे ही काळजी साहजिक होती. मात्र, समीरला संगीत क्षेत्रातच नाव कमवायचं होतं. समीरचं नाव पेपरात छापून यायला लागलं, तेव्हा सविता यांना ‘मुलगा काहीतरी चांगलं करतोय’, याचं समाधान वाटत होतं. समीर चमकू लागला होता.
महेश मांजरेकरांच्या घरी, मध्यरात्री…
रसिकांना जिंकायचं असेल तर त्यांना उत्तमच काहीतरी दिलं पाहिजे, हा समीरचा पक्का निर्धार. म्हणूनच ‘काळे धंदे’मधील, “राधेनं किसनाला धक्का दिला…” हे गाणं रसिकांच्या एवढं पसंतीस उतरलं की, आज सगळीकडे डीजेवर ते वाजतं. अभिषेक खणकरनं हे गीत लिहिलंय. त्याला समीरचे सूर लाभले अन् या कोळीगीतानं माहोल केला. कोळीगीत म्हटलं की बरेचदा ठेका सारखा असतो. मात्र, समीरनं यात परिस्थितीनुसार वेगळा प्रयोग केला.
‘काळे धंदे’च्या वेळेसचा एक खास प्रसंगही समीरनं सांगितला. अभिनेता जितेंद्र जोशी यानं समीरची महेश मांजरेकर यांच्यासोबत भेट घालून दिली. समीरनं मध्यरात्री मांजरेकर यांचं घर गाठून त्यांच्या बेडरूममध्ये त्यांना धून ऐकविली अन् हे गाणं ओक्के झालं. संजय जाधव, रवी जाधव, महेश मांजरेकर यांच्यासोबत काम करताना बरंच काही शिकायला मिळालं. तुम्ही हजार संपर्क बनवा. मात्र, तुम्हाला तुमच्यातील टॅलेंटच तुम्हाला पुढं नेतं, याचे धडेही मिळाले. (Success journey of Samir Saptiskar)
कामात नुसतं रमून चालत नाही, तर त्यात सातत्य हवं. स्वत:ला अपग्रेड करत राहणं खूप महत्त्वाचं असतं, असं समीर सांगतो. चित्रपट, मालिकेसाठी गाणं करत असाल, तर ते त्या कथेनुरूप असावं. संगीतकारानं तिथं अट्टाहास करून चालत नाही. संगीताच्या माध्यमातून त्या कथेला न्याय द्यायचा असतो, असंही तो नमूद करतो.

मनोरंजन क्षेत्रात होणाऱ्या बदलांबाबत बोलताना “मोठ्या पडद्याचे अस्तित्व कधीच संपुष्टात येऊ शकत नाही”, असा विश्वास समीर व्यक्त करतो. मोठ्या पडद्यापुढं आधीही आव्हानं होती. मात्र, काळानुरूप मोठ्या पडद्यानं तांत्रिकदृष्ट्या स्वत:ला पुढंच ठेवलं आहे. आज मोठ्या पडद्यावर चित्रपट पाहताना जी मजा येते, ती अन्य माध्यमांत नाही. संगीतही तिथं डॉल्बीमध्ये ऐकण्याचा अनुभव अनोखा असतो. मात्र, टीव्ही, ओटीटी या माध्यमांचंही स्वत:चं एक वेगळं अस्तित्व आहेच”, असं तो सांगतो. (Success journey of Samir Saptiskar)
परिस्थितीच असते तुमची प्रेरणा
या वाटचालीत काही चांगले-वाईट अनुभवही आले. खरंतर परिस्थितीच तुम्हाला प्रेरणा देते. तीच वेळोवेळी तुम्हाला शिकवत असते. त्यातूनच तुम्ही तुमचा पुढचा प्रवास कसा करायचा, हे ठरवत असता, असं समीरचं स्पष्ट मत आहे.
“म्युझिक कम्पोझर व्हायचं तर श्रीमंत असायची गरज नाही. एक गिटार, कम्प्युटर आणि शब्द या बाबी पुरेशा आहेत. त्यावर तुम्ही ट्रॅक बनवून इतरांना ऐकवू शकता. प्रत्येक गाणं एक नशीब घेऊन येत असतं. आपल्या हातून ते बनल्यानंतर ते आपलं राहात नाही, इतरांचं होऊन जातं. नंतर नाविन्याचा स्वीकार करत आपल्याला पुढं जात राहायचं असतं. तुमचे शब्द आणि ट्युन मात्र पॉवरफुल हवी”, अशी मोलाची बात समीर सांगतो. (Success journey of Samir Saptiskar)
अडकून पडू नये, प्रयोग व्हायला हवेत
क्रिएटिव्ह काम करायचं तर स्पेसची गरज नाही. शब्द, चाल कुठंही सुचू शकते. फक्त ती जिद्द हवी, असं समीर नमूद करतो. “रसिक आधी गाणी ऐकायचे. आता ती बघतात. त्यामुळे आव्हानं निश्चितच वाढली आहेत. आपल्याला लहानपणी आकाशवाणीनं गाणी ‘ऐकवली’ आहेत. त्यामुळे त्याकाळी हे गाणं कुणाचं, हे त्या पिढीतील लोक चटकन सांगत.
आता परिस्थिती काहीशी बदलली आहे. स्वत:ला सतत अपग्रेड ठेवणं ही गरज होऊन बसली आहे. मराठी गाणी काही विशिष्ट परिघांत अडकली आहेत. मात्र, असं होऊ नये. त्यात प्रयोग व्हायला हवेत. रसिकांना काहीतरी नवं देण्यासोबतच त्यांनी ते स्वीकारलं पाहिजे, अशी तजवीज व्हायला हवी.

मराठीचं संगीत वर न्यायचं असेल तर रसिकांनी गाणी शोधून शोधून ऐकली पाहिजेत, अशी परिस्थिती आपणच निर्माण करायला हवी. मराठीत म्युझिक लॉन्चिंग सोहळे सध्या जवळपास बंदच झाले आहेत. ते सुरू व्हावेत. या गाण्यांमागे कुणाकुणाची मेहनत आहे, त्यांची नावं पुढं यायला हवीत”, अशी अपेक्षाही तो व्यक्त करतो. (Success journey of Samir Saptiskar)
========
हे देखील वाचा – सचिन दरेकर: सदैव ‘ॲक्शन’ मोडवर असलेला मनस्वी कलावंत
========
यूट्युबवर सध्या संगीताला वाहिलेले विविध चॅनेल्स आले आहेत. त्यात काही निश्चितच चांगले आहेत. मात्र, बरीच थुकरट गाणीही येत आहेत, अशी खंत मांडताना ‘संगीतक्षेत्राची गरिमा राखली गेली पाहिजे’, असा आग्रह तो धरतो.
समीरला उत्तमोत्तम दिग्दर्शकांसोबत काम करायचंय. भविष्यात रसिकांना काहीतरी वेगळं आणि उत्कृष्टच द्यायचं, हा त्याचा इरादा पक्का आहे. सतत नाविन्याची कास धरणारा, फक्त संगीत आणि संगीतच जगणारा, सतत जमिनीवर असलेला, नम्र स्वभावाचा समीर सुरांच्या दुनियेतला शुक्रतारा म्हणून पुढं येईल, यात शंकाच नसावी.