Jaran Marathi Movie Motion Picture: विवाहिता आणि बाहुली, काय आहे

इंजिनिअर होता होता दिग्दर्शक झाला – ‘सहकुटुंब सहपरिवार’ फेम स्वप्नील वारके
लहानपणी स्वप्नील (Swapnil Warke) आई-बाबांसोबत थिएटरमध्ये सिनेमा बघायचा, तेव्हा त्याचं डोकं आणि मन वेगळ्याच वाटेनं दौडायचं. मनोरंजन म्हणून सिनेमा पाहणं वेगळं आणि त्यात पूर्णत: समरस होणं वेगळं. स्वप्नील सिनेमाची प्रत्येक बाब ‘ग्रास्प’ करीत होता. छोट्या छोट्या बाबींवर विचार करीत होता. मनाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करीत होता. इथूनच दिग्दर्शक बनण्याच्या महत्त्वाकांक्षेनं मूळ धरलं असावं.
‘राजा राणीची गं जोडी’, ‘जय मल्हार’, ‘माझी माणसं’ या गाजलेल्या मालिकांचं दिग्दर्शन, कित्येक चित्रपट अन् मालिकांचं सहदिग्दर्शन, असा स्वप्नील वारके या गुणी कलावंताचा प्रवास. एखाद्या ध्येयापर्यंत पोहोचायचं तर योग्य दिशा असावी लागते. वाटेत कुणी ती दिशा दाखविणारं असतं तर कुणाला हा प्रवास स्वत:चा स्वत: करायचा असतो. स्वप्नीलनं त्याची दिशा स्वत: शोधली अन् आपल्यातील कलागुणांच्या भरवशावर तो रसिकांची मनं जिंकायला निघाला. उत्तमोत्तम कलाकृती साकारून आपल्यातील गुणवत्ता त्यांनं सिद्ध केली.
स्वप्नीलवर बालपणापासूनच सिनेमाचे संस्कार झाले. इलेक्ट्रिकल काँट्रॅक्टर असलेले वडील शिवाजी वारके अन् गृहिणी असलेली आई शुभांगी या दोघांनाही चित्रपटांची आवड. नुसतीच आवड नाही तर सिनेक्षेत्रातलं बऱ्यापैकी ज्ञानही होतं. परळच्या आपल्या दारी रिचर्ड ॲटनबरो यांच्या ‘गांधी’ चित्रपटाचं शूट झालं आणि ते आपल्याला जवळून अनुभवता आलं, त्यात स्वत: सहभागी होता आलं, याचा त्यांना केवढा अभिमान. ते ऐकतच स्वप्नील मोठा होत होता. (Success Journey of Swapnil Warke)

बाबा परळला एकांकिकांतून कामं करायचे, ऑर्केस्ट्रामध्ये गायचेही. त्यांचे कलागुण स्वप्नीलमध्ये आले. तो काळ सचिन, महेश कोठारे यांच्या चित्रपटांचा होता. आपणही दिग्दर्शक व्हायचं, हे स्वप्नीलनं तिसरीत असतानापासूनच ठरवलं होतं. प्रचंड वाचन असलेली आई एकदा म्हणाली, “तू शाळेतल्या भाषणात का भाग घेत नाहीस?” स्वप्नील थोडा अडखळला. आईनं एक छानसं भाषण लिहून दिलं, प्रेरितही केलं. तिथून स्वप्नीलमध्ये ‘स्टेज डेअरिंग’ आलं.
अभ्यासात हुशार असलेला स्वप्नील शाळेत नाटकं लिहून ती बसवायला लागला. १९९३ला दंगली झाल्या. त्यावेळी दूरदर्शनवर एनएफडीसीचे सिनेमे दाखविले जायचे. त्यांतून सत्यजित रे, श्याम बेनेगल असे दिग्गज दिग्दर्शक कळले. चौथीपासूनच तो स्टीव्हन स्पिलबर्ग यांचा फॅन झाला होता.
भांडुपची वस्ती त्याकाळी जरा कुख्यातच होती. तिथं एका इंडो अमेरिकन संस्थेनं नाट्यशिबिर आयोजित केलं होतं. गुणी मुलांना एक प्लॅटफॉर्म मिळावा, हा त्यामागचा उद्देश होता. स्वप्नील त्यात सामील झाला. सुधा करमरकर यांच्या नाटकात कामं करण्याची संधी मिळाली. २२ मुलं होती त्यावेळी. व्यावसायिक नाटकांचे प्रयोग होऊ लागले. आठवीत असताना सह्याद्री दूरदर्शनच्या ‘किलबिल’मध्ये तो लीड रोलमध्ये होता. बालपणापासूनच असा प्रवास सुरू झाल्यानं कलेला पैलू पडत होते. (Success Journey of Swapnil Warke)

दहावी तो विशेष गुणवत्तेसह उत्तीर्ण झाला. त्यानं इंजिनीअर व्हावं, ही आईबाबांची इच्छा होती. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यानं इंजिनीअरिंगला प्रवेशही घेतला. मात्र, तिथं मन रमलं नाही. परिणामी, तो अनुत्तीर्ण झाला. या इंजिनीअरिंगच्या फंदात पडायचं नाही, असं त्यानं ठरवलं. त्यावेळी ललित कला केंद्र, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्युट ऑफ इंडिया (एफटीआयआय), नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (एनएसडी) असं काही असतं, हे त्याच्या गावीही नव्हतं. हे सर्वकाही उशिरा कळलं, अन्यथा तिथंच शिक्षणाला गेलो असतो, असं स्वप्नील सांगतो. कलाक्षेत्र समजून घ्यायचं असेल तर व्याख्यानं, शिबिरं हीच माध्यमं तेव्हा होती. (Success Journey of Swapnil Warke)
स्वप्नील इंजिनीअरिंगला असतानाची गोष्ट. ट्युशनचे शिक्षक कमालीचे नाटकवेडे होते. स्वप्नीलमधील कलागुण ते जाणून होते. त्यांनी त्याला एक नाटक बसविण्याचा सल्ला दिला. स्वप्नीलनं ते बसवलं. हे बळ देणारंच होतं. त्यावेळी दत्तविजय प्रॉडक्शनच्या ‘वंदेमातरम’ नाटकाचं ऑडिशन होतं. अभिजित पानसे त्याचे लेखक-दिग्दर्शक होते. ऑडिशनसाठी चाळीसेक मुलं आली होती. स्वप्नीलची त्यात निवड झाली. या नाटकाचेही प्रयोग त्यानं केले. मात्र, अभिनयात तो फारसा रमत नव्हता. दिग्दर्शकाला तो बरेचदा इनपुट्स द्यायचा.
मित्र उमेश बने यानं सुचविलं, ‘तू दिग्दर्शनावर लक्ष केंद्रित कर.’ त्यावेळी महेंद्र कदम एक सीरियल करीत होते. उमेशनं त्यांच्याकडे जाण्याचा सल्ला स्वप्नीलला दिला. स्वप्नीलनं महेंद्र कदम यांची भेट घेतली. त्यांना असिस्ट करण्याची इच्छा बोलून दाखविली. कदम यांनी सांगितलं, “ये, पण पैसे मिळणार नाहीत.” स्वप्नीलनं ते मान्य केलं. कारण, दिग्दर्शनाचं नवं तंत्र त्याला शिकायचं होतं. इकडे आई-बाबा मात्र चिंतेत. पोरानं इंजिनीअरिंगची पदवी पूर्ण करावी, अशी त्यांची इच्छा होती. मात्र, स्वप्नीलनं आपला मार्ग निवडला होता. (Success Journey of Swapnil Warke)

महेंद्र कदम कमालीचे प्रेमळ. स्वप्नीलची परिस्थिती ते जाणून होते. ते त्याला गाडीखर्चाला पैसे देत. त्याच दरम्यान अल्फावर ‘होम मिनिस्टर’ची तयारी सुरू होती. कदम यांनी स्वप्नीलला बोलवलं. म्हणाले, “तिकडे ये, तुझा पगार सुरू होईल.” ही एक नवी संधी होती. तिथून व्यावसायिक प्रवास सुरू झाला. स्वप्नील दीड वर्ष ‘होम मिनिस्टर’च्या टीमसोबत होता. तेव्हा कुठं घरच्यांना बरं वाटलं. त्यावेळी निखिल साने ‘अल्फा’चे एक्झ्युकेटिव्ह प्रोड्युसर होते.
टीव्ही माध्यमात मुशाफिरी सुरू होती. मात्र, स्वप्नीलला सिनेमा करायचा होता. ते एक वेगळंच तंत्र आहे, ते शिकावं लागतं असं सांगून महेंद्र कदम यांनी स्वप्नीलला फिल्मक्लब जॉइन करून दिला. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे विविध सिनेमे त्यादरम्यान पाहायला मिळाले. सिनेमा हे गोष्ट सांगण्याचं प्रभावी माध्यम आहे, हे कळलं होतं. चांगला सिनेमा करणारा दिग्दर्शक व्हायचं, त्यात कमर्शियल, आर्ट असा भेदभाव नसावा, असं त्यानं ठरवून टाकलं होतं. (Success Journey of Swapnil Warke)
सुरुवातीला जालिंधर कुंभारसोबत ‘अनामिका’, पल्लवी जोशी प्रॉडक्शनची ‘अनुबंध’ अशा सीरियल्सचं सहदिग्दर्शन, दिग्दर्शन, सेकंड युनिट दिग्दर्शन केलं. प्रकाश कुंटे त्यावेळी मदतीला होता. स्टार प्रवाहवरच्या ‘लक्ष्मी व्हर्सेस सरस्वती’ सीरियलचं कॉमेडी व्हर्जन करायचं होतं. त्यासाठी दिग्दर्शक हवा होता. स्वप्नीलनं ही सीरियल महिनाभर केली. सर्वांना काम आवडलं होतं. तरीही त्याचा फोकस हा सिनेमावरच होता. राजीव पाटील यांच्या ‘पांगिरा’ तसंच ‘सनई चौघडे’, महेश कोठारे यांचा ‘जबरदस्त’, ‘हंपी’, ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘सायकल’ या चित्रपटांसाठी त्याने असिस्ट केलं. ‘कट्यार काळजात घुसली’चा तो मुख्य सहायक दिग्दर्शक होता.

प्रयोग करणं गरजेचं…
आपल्या कलाकृतीत सतत नवनवे प्रयोग करत राहणं अतिशय गरजेचं आहे, असं स्वप्नील सांगतो. “प्रेक्षकांना तेच ते पाहून कंटाळा आलेला असतो. अशावेळी आपण नवीन काय देतो, यावरही त्या कलाकृतीची यशस्विता अवलंबून असते”, असं सांगताना त्यानं विनोद लव्हेकर निर्मित ‘राजा राणीची गं जोडी’ करत असतानाचा किस्सा कथन केला. (Success Journey of Swapnil Warke)
मुळातच गावठी बाज असलेल्या या सीरियलच्या ऑडिशनसाठी मुंबईच्या बाहेर म्हणजे नाशिक, पुणे आदी ठिकाणी ऑडिशन ठेवल्या होत्या. सीरियलमधील पात्रांना साजेसे नवे कलाकार तेव्हा हवे होते. ते शोधणं आव्हान होतं. कित्येकांचं ऑडिशन झालं. शिवानी सोनार हिनं आउटस्टॅण्डिंग परफॉर्मन्स दिला. म्हणून तिची निवड झाली. मणिराज पवार याचं हसणं स्वप्नीलनं दिग्दर्शकीय अँगलनं कॅश केलं होतं. तेही प्रेक्षकांना आवडलं. असे वेगळ्या धाटणीचे कलावंत त्यावेळी निवडले गेले. “टीव्हीवरच्या सीरिअल्सचं यश हे प्रेक्षकांच्या अभिरुचीवर अवलंबून असतं. त्यात तोच तोपणा येत असेलही. तरी टीव्हीकडून सतत सर्व्हे केला जात असतो. नवनवे प्रयोग कराल तरच टिकाल, असा हा मामला आहे”, असंही स्वप्नील स्पष्टपणे नमूद करतो.
सिनेमा फ्रेम देते, तर टीव्ही स्थैर्य…
“सिनेमा आणि सीरियल या दोन वेगवेगळ्या बाबी झाल्या. सिनेमा एक जुगार आहे. त्यानं कमाई केली तर ठीक. शिवाय, तो प्रोजेक्ट किती दिवस चालेल, यावर आर्थिक गणितं अवलंबून असतात. मात्र, सशक्त माध्यम असलेला सिनेमा तुम्हाला फ्रेम देतो. तर, सीरियल्स तुम्हाला ओळख आणि आर्थिक स्थैर्य देतात. इथं तुमचा पर डे, महिन्याची ठराविक रक्कम ठरलेली असते. शिवाय, घराघरांतही तुम्हाला ओळख मिळते”, असं स्वप्नील सांगतो. (Success Journey of Swapnil Warke)

ओटीटी माध्यमाबद्दल बोलताना स्वप्नील म्हणाला, “ओटीटी हेही वेगळंच माध्यम आहे. तिथं तुमची कथा तुम्हाला अधिक विस्तारानं आणि कलात्मक पद्धतीनं मांडण्यास वाव आहे. मात्र, तो प्रत्येक वयोगटापर्यंत पोहोचला, असं सध्यातरी म्हणता येणार नाही. प्रत्येक माध्यमाची वेगवेगळी खासियत आहे. सिनेमा, मोठा पडदा हे भव्य माध्यम आहे. त्यातही आता कित्येक तांत्रिक बदल झालेत. माझ्या काळात मी रिळांपासून सुरुवात केली. बरेच बदल पाहिले. आता तर नवोदित थेट डिजिटलपासून आपला प्रवास सुरू करतात. ही स्थित्यंतरे आहेत. त्याला तुम्ही धोके म्हणून बघता की संधी, हे तुमच्यावर अवलंबून आहे.”
स्टिव्हन स्पिलबर्गसह व्ही. शांताराम, विजय आनंद हे स्वप्नीलचे आवडते दिग्दर्शक. व्ही. शांताराम यांची गोष्ट सांगण्याची पद्धत त्याला खूप भावते. शिवाय, फरहान अख्तर त्याला आवडतो. स्वप्नील सध्या ‘सहकुटुंब सहपरिवार’ या सीरियलचं दिग्दर्शन करतोय. अजूनही काही प्रोजेक्ट्स सुरू आहेत. (Success Journey of Swapnil Warke)
=======
हे देखील वाचा – सुरेल प्रवास घडविणारा प्रयोगशील संगीतकार : समीर सप्तीस्कर
=======
मध्यंतरी त्यानं भरपूर लिखाण केलं. दोन चित्रपट लिहून पूर्ण झाले आहेत. ते लवकरच आकाराला येतील. काहीही करायचं, ते जीव ओतून. आपली प्रत्येक कलाकृती सरसच असली पाहिजे, याकडे त्याचा कटाक्ष आहे. मेहनती, नम्र, गुणी असा हा चमकता स्वप्नील कलाक्षेत्रावर आपली अमिट मोहोर उमटवायला सज्ज झाला आहे.