Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Dashavatar चित्रपटाने हिंदी-साऊथलाही दिली टक्कर; २१ दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी!

Neena Kulkarni यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर!

Jitendra Kumar सचिवजींचा Bhagwat चित्रपटात दिसणार रुद्रावतार!

मीनाक्षी शेषाद्रीचा पहिला सिनेमा Painter Babu आठवतो का?

Digpal Lanjekar : शिवराज अष्टकातील सहावे चित्रपुष्प ‘रणपति शिवराय’- स्वारी

२०२५ मधील टॉप १० बॉलिवूडच्या यादीत Kantara 1 ची ग्रॅण्ड

Kantara : A Legend Chapter 1 चित्रपटाने बॉलिवूडलाही टाकलं मागे!

सर रिचर्ड अ‍ॅटेनबरो यांच्या ‘गांधी’ चित्रपटात Rohini Hattangadi यांना कस्तुरबाची

Kantara Chapter 1 : कांताराने पुन्हा राडा घातलाय !

Treesha Thosar ने वेधलं बॉलिवूडचं लक्ष; शाहरुख खानही झाला फॅन

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

सेल्समन ते यशस्वी अभिनेता: कांचन पगारेचा यशस्वी ‘रिच’

 सेल्समन ते यशस्वी अभिनेता: कांचन पगारेचा यशस्वी ‘रिच’
गोष्ट चमकत्या ताऱ्यांची

सेल्समन ते यशस्वी अभिनेता: कांचन पगारेचा यशस्वी ‘रिच’

by अभिषेक खुळे 10/09/2022

कांचन (Kanchan Pagare) रात्रभर तळमळत होता. झोपच येत नव्हती. डोक्यात भलतीच वादळं घोंघावत होती. कधीतरी डोळा लागला. मात्र, काहीच तासांत तो दचकून उठला. “आपण इथं काय करायला आलोय आणि करतोय काय? ज्याच्यासाठी कष्ट उपसत आहोत, ते हातून सुटत चाललंय”, या विचारानं  तो अस्वस्थ झाला. आता बास्स! स्वप्नपूर्तीच्याच दिशेनं वाटचाल करायची, असा दृढनिश्चय त्यानं केला. वाट खडतर होती. मात्र, त्याला काहीही करून ती पार करायची होती.

कॅडबरीची ‘रमेश-सुरेश’वाली जाहिरात आठवते का? त्यातलाच तो एक. ‘खट्टा-मीठा’मध्ये अक्षयकुमारचा सहकारी. फेव्हिकॉल, स्प्राइट, सलमान खानसोबतची व्हील, पॉलिसी बाजार, एशियन पेंट्स, आयसीआयसीआय बँक, अभिषेक बच्चनसोबत आयडियाची सीरिज यांसह ४५०च्या वर जाहिराती, ‘धमाल-२’सारखे कित्येक चित्रपट असा कांचन पगारेचा जबरदस्त प्रवास आहे. मोठा-छोटा पडदा ते तुमच्या मोबाइलमध्येही कांचन आहे, हाच त्याचा यशस्वी ‘रिच’ आहे. सेल्समन ते अभिनेता असा त्याचा प्रवास मोठा संघर्षपूर्ण आहे.

नाशिक जिल्ह्यातील सटाणा या गावात प्राचार्य असलेले विठ्ठल आणि लीलाबाई यांच्या पोटी हे रत्न जन्माला आलं. बालपणापासूनच इपितर असलेला कांचन मोठा गुणी. शाळेत सर्वच सांस्कृतिक कार्यक्रमांत पुढं असायचा तो. कॉलेजला गेल्यावर या क्षेत्राकडे तो गांभीर्यानं बघू लागला. एकांकिका स्पर्धा गाजवू लागला. मात्र, त्याच्या महत्त्वाकांक्षेला बळ देणारं वातावरण त्याकाळी नव्हतं. हे रिकामटेकडे लोकांचे धंदे आहेत. पोरानं शिकावं, नोकरी पकडावी अन् लग्न करून मोकळं व्हावं, अशी घरच्यांची पारंपरिक अपेक्षा. मात्र, “कांचन के इरादे आसमान को छूने के थे.”

कॉलेज संपत आलं होतं. आता करिअरकडे लक्ष द्यायचं होतं. तो सॅटेलाइटचा जमाना होता. काही मित्रांनी गावातच स्वत:चं लोकल चॅनल काढायचं ठरवलं. त्यातील तंत्र शिकणं गरजेचं होतं. त्याचदरम्यान एका मित्रानं पेपरचं कात्रण आणलं. कर्जतमध्ये एका सीरियलचं वर्कशॉप होतं. त्याची ती जाहिरात होती. मुंबई दूरदर्शनवर कधीकाळी ‘ज्ञानदीप’ कार्यक्रम करणारे आकाश देशपांडे ऊर्फ आकाशानंद यांचं ते वर्कशॉप होतं, त्याचा वेगळा आनंद होता. फी ३०५ रुपये, त्यात खाणं-पिणं समाविष्ट, असं त्या जाहिरातीत नमूद होतं. एवढी स्वस्त फी पाहून कांचन सुखावला. ते ३०५ रुपये, जाणे-येणे मिळून फार फार तर हजारेक रुपये खर्च येईल, त्याची व्यवस्था करून टाकू, असा विचार करत त्यानं वर्कशॉपस्थळी आकाशानंद यांच्याशी संपर्क साधला. 

‘फी किती ठाऊक आहे ना’, असं त्यांनी विचारलं. कांचननं सांगितलं, ‘हो, ३०५ रुपये.’ आकाशानंद म्हणाले, “जाहिरातीत ती प्रिंट मिस्टेक आहे. फी ३१०५ रुपये आहे.” झालं, एसटीडी बूथमधून बाहेर आलेल्या कांचनचा चेहरा पडला. एवढे पैसे आणायचे कुठून, हा प्रश्न होता. अखेर दोन मित्र मदतीसाठी पुढं आले. वर्कशॉपमध्ये आठ दिवस विविध तांत्रिक बाबी शिकता आल्या. सगळ्या ॲक्टिंग सेशनमध्ये तो फर्स्ट होता. वर्कशॉप आटोपून तो गावी आला ते अभिनय क्षेत्रात करिअर करायचं, हे ठरवूनच. 

वर्षभरानंतर घरी थाप मारून कांचन मुंबईला गेला. घरच्यांना वाटलं, पोरगं हातातून गेलं. मुंबईत बहिणीकडे राहात असताना हाताशी नोकरी गरजेची होती. कारण, आकाशानंद यांनी सांगितलं होतं, “मनोरंजनक्षेत्रात संघर्ष जरुर कर, मात्र त्याआधी दोन वेळच्या जेवणाची सोय कर.” त्याचदरम्यान एका वृत्तपत्रात सेल्समन पदासाठीची जाहिरात पाहिली. तिथं अर्ज केला, त्या वॉशिंग पावडरच्या कंपनीत नोकरी मिळाली. शंभर रुपये रोज ठरला.  (Success Story of Kanchan Pagare)

दारोदारी जाऊन लोकांना पटवणं, त्यांना वॉशिंग पावडर विकणं सोपं नव्हतं. त्यानं ते केलं. नंतर तर त्याचा एवढा हातखंडा झाला की अर्ध्या दिवसातच त्याचं काम संपायचं. त्याचदरम्यान प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, अभिनेते संतोष पवार यांच्याशी भेट झाली. त्यावेळी ते मच्छिंद्र कांबळी यांचं ‘वस्त्रहरण’ हे नाटक करीत होते. त्यांनी विचारलं, ‘रिप्लेसमेंट आहे, करशील का?’ कांचननं लगेच होकार दिला. उभं राहायला स्टेज मिळतोय, ही मोठी गोष्ट होती. या नाटकाचे बरेच प्रयोग झाले. नंतर ‘लढ बापू लढ’ नाटक मिळालं. 

दारोदारची नोकरी आणि नाटकं, असं सुरू होतं. याचदरम्यान ‘शोलेला लागले कोल्हे’ या विनोदी नाटकात प्रमुख भूमिका मिळाली. बरेचदा प्रेक्षकांच्या फर्माईशनंतर ‘वस्त्रहरण’ रात्री उशिरापर्यंत लांबायचं. ट्रेन सुटून जायची. त्यावेळी कित्येकदा प्लॅटफॉर्मवर मुक्काम करावा लागला. (Success Story of Kanchan Pagare)

ज्या कंपनीत कांचन नोकरी करत होता, त्यांना आपल्या हर्बल विडीसाठी स्ट्रीट शो करायचे होते. त्याची जबाबदारी कांचनवर आली. लिखाण अन् अभिनय दोन्ही करायचा तो. आता मार्केटिंगचा मोठा अनुभव गाठीशी होता. त्यानं स्वत:ची मार्केटिंग कंपनी सुरू केली. हाताखाली शंभरेक मुलं होती. काम चांगलं चाललं होतं. मात्र, एका क्षणी त्याला वाटलं, आपण इथं मनोरंजनक्षेत्रात चमकण्यासाठी आलोय अन् करतोय भलतंच. सकाळीच त्यानं कंपनी बंद केली, बिलं देऊन टाकली.

पत्नीची साथ मोलाची

नोकरी सोडली, कंपनी बंद केली. आता पुढं काय, हा प्रश्न होता. लग्न झालं होतं, जबाबदारी वाढली होती. संघर्ष सुरू झाला. बरेचदा एकवेळ उपाशी राहायची वेळ आली. तसा तो चांगल्या कुटुंबातून आलेला. त्याचा संघर्ष घरच्यांना कळलं असता, तर ते त्याला लगेच गावी परत घेऊन गेले असते. मात्र, काहीही करून त्याला आपलं उद्दिष्ट साध्य करायचं होतं. अशावेळी पत्नी मंजुलानं चांगली साथ दिली. तिनं कांचनच्या स्वप्नांत कधी आडकाठी आणली नाही. “माझं घर माझा बॅकबोन आहे. पत्नीनं तर माझा फिटनेस, आहार या साऱ्याकडे विशेष लक्ष दिलं”, असं कांचन आवर्जून सांगतो

ऑडिशन, स्क्रीन टेस्ट असा सिलसिला सुरू झाला. एक लॉलिपॉपची जाहिरात मिळाली. त्या भूमिकेसाठी १२०० कलावंतांची चाचणी झाली होती. त्यातून १२ निवडले होते. त्यात कांचन होता. नंतरचे आठ महिने पुन्हा काम नव्हतं. मात्र, त्याची जिद्द मोठी होती. जाहिरातीसाठी हा परफेक्ट चेहरा होता. कठोर मेहनतीला यश आलं. जाहिरातविश्वात त्याचा दबदबा वाढू लागला. त्याचा चेहरा घराघरांत पोहोचला. कॅडबरी, फेव्हिकॉल, स्प्राइट, व्हील, गो डॅडी डॉट कॉम, फेव्हिक्विक, पॉलिसी बाजार, एशियन पेंट्स, डेअरी मिल्क, सेव्हन अप, आयसीआयसीआय, आणि ‘आयपीएल’दरम्यान आयडियाच्या ३१ जाहिरातींची सीरिज अशा साडेचारशेहून अधिक जाहिराती त्याच्या नावावर आहेत. प्रसून पांडे यांच्यासोबत त्यानं बरीच कामं केलीत.

प्रियदर्शन यांनी स्वत:हून बोलवलं तेव्हा…

नाटकं, जाहिराती सुरू असताना मालिका व मोठा पडदा खुणावत होता. त्यासाठीही प्रयत्न सुरू होते. २०१४च्या दरम्यान ‘आंबट गोड’ ही मालिका केली होती. याचदरम्यान एका कास्टिंग डायरेक्टरमार्फत प्रियदर्शन यांचा ‘आक्रोश’ चित्रपटात छोटी भूमिका करण्याची संधी मिळाली. या चित्रपटात अजय देवगण, अक्षय खन्ना, बिपाशा बसू, परेश रावल यांच्या भूमिका आहेत. 

प्रियदर्शन यांचं सर्व बाबींकडे बारीक लक्ष असतं. सहसा इतर कलावंतांची नावं त्यांना माहिती नसतात. मात्र, ३० दिवस काम केल्यानंतर त्यांना कांचन भावला. आपल्या असोसिएटकडे त्यांनी कांचनबद्दल विचारणा केली. नंतर त्यांच्याच ‘खट्टा-मीठा’मध्ये भूमिका मिळाली. अक्षयकुमार त्यात नायक होता. अक्षय कुमारच्या सहकाऱ्याची तेवढीच लक्षवेधी भूमिका त्यानं केली आहे. नंतर प्रियदर्शन जो प्रोजेक्ट करीत, त्यासाठी कांचनला ते बोलत. 

त्यादरम्यान ‘कार्तिक कॉलिंग कार्तिक’, मीरा नायरचा ‘मायग्रेशन’, ‘पप्पू कान्ट डान्स साला’, ‘दिल तो बच्चा हैं जी’, ‘धमाल टू’, ‘राउडी राठोड’, ‘रंगरेज’, ‘मर्दानी’, ‘डॉली की डोली’ असे सुमारे २२ चित्रपट त्यानं केलेत. ‘शैतान हवेली’ ही वेबसीरिजही त्याच्या नावावर आहे. (Success Story of Kanchan Pagare)

वजन पुन्हा वाढवलं

करोना लॉकडाउनमध्ये सर्वच क्षेत्रांवर परिणाम झाला. त्यात मनोरंजनक्षेत्रही आलंच. मात्र, काही चांगल्या गोष्टीही घडल्या. ओटीटी अचानक भरात आलं. यादरम्यानही रसिकांना बरंच काही चांगलं पाहता आलं. रखडलेले प्रोजेक्ट ओटीटीवर आले, कित्येक नव्या कलाकारांची ओळख झाली. काम मात्र बंद होतं. अशावेळी करायचं काय, तर ओटीटी बघणं, खाणं, पिणं नि झोपणं, एवढाच उद्योग उरला होता. मात्र, पत्नीनं सांगितलं, “हाच तर खरा चान्स आहे. डाएट आणि फिटनेसकडे लक्ष दे.”

तिनं सांगितलं ते फॉलो केलं. याचा परिणाम, २४ किलो वजन कमी झालं. त्याचे फोटोज सोशल मीडियावर पोस्ट केले. मात्र, लोकं म्हणाले, “तुझी आधीची पर्सनलिटीच तुझ्या परफॉर्मन्सला पूरक आहे. वजन कमी करून तू इतरांसारखाच दिसशील. मग त्यांच्यात नि तुझ्यात फरक काय?” कांचनला ते पटलं अन् त्यानं पुन्हा वजन बऱ्यापैकी वाढवलं. हा प्रसंग तो तेवढ्याच विनोदी स्टाइलनं सांगतो. (Success Story of Kanchan Pagare)

===============

हे ही वाचा: वेबसिरीजला LGBT बोल्ड सीन्सचा तडका खरंच आवश्यक आहे का?

छोट्या शहरातून आंतरराष्ट्रीय पातळीवर झेप घेणारा गुणी कलावंत: निशांत रॉय बोम्बार्डे

===============

पहले काबिल बनो…

“हेच काय, अन्य कुठल्याही क्षेत्रात जायचं तर आधी तयारी असावी लागते. ‘पहले काबिल बनो, कामयाबी खुद ब खुद आप के कदम चुमेंगी’, ही म्हण इथं तंतोतंत लागू पडते. अभिनेता बनणं सोपं आहे, असं इतरांसारखंच मलाही आधी वाटायचं. मात्र, ते सोपं निश्चितच नाही, हे या क्षेत्रात आल्यावरच कळलं. स्वत:चं कॅरेक्टर टिकवून ठेवण्यात खूप कस लागतो. रंगमंच आणि कॅमेऱ्यासमोर गेल्यावरच त्याची खात्री पटते”, असं कांचन सांगतो. आपण आयुष्य जगतोय की ढकलतोय, याचाही विचार प्रत्येकानं करावा, असा मोलाचा सल्लाही तो देतो.

ओटीटीमुळे मोठ्या पडद्याला नव्हे तर छोट्या पडद्याला कदाचित धोका असू शकतो. त्यामुळे छोट्या पडद्यासमोर अधिक चांगला कंटेंट देण्याचं आव्हान आहे, असं त्याचं मत आहे. लवकरच त्याचा ‘गुठली’ हा चित्रपट येतोय. यात तो पहिल्यांदाच नॉन कॉमिक भूमिका साकारणार आहे. राजकपूरच्या फॅनची गोष्ट सांगणारा चित्रपट आहे. आंतरराष्ट्रीय पुरस्कारप्राप्त हा चित्रपट कोलकाता फिल्म फेस्टिव्हलमध्येही नावाजला गेला आहे. त्याचं शीर्षक अजून फायनल व्हायचंय. राहुल ढोलकिया दिग्दर्शित, फरहान अख्तर निर्मित एका चित्रपटात तो क्राइम ब्रँचच्या अधिकाऱ्याची भूमिका साकारतोय. यात प्रतीक गांधी नायक आहे. याशिवाय, जाहिरातींसह अन्य भरपूर प्रोजेक्ट्स त्याच्याकडे आहेत.

कांचन आपल्या क्षेत्रात बऱ्यापैकी स्थिरावलाय. मुलगा विहंग दिल्लीला आयआयटी करतोय. तरीही, “खरा कलावंत कधीच समाधानी नसतो, सेटलही नसतो”, असं त्याचं मत आहे. भविष्यात त्याला दिग्दर्शनाकडे वळायचंय. नसीरुद्दिन शाह, पंकज कपूर, नवाजुद्दिन सिद्दिकी, मनोज वाजपेयी, पंकज त्रिपाठी हे त्याचे आवडते कलावंत. “हॉलिवूडचा नायक मार्लन बँड्रो याच्यासारखं कॅमेऱ्यासमोर सहज वावरता आलं पाहिजे”, असं तो म्हणतो. (Success Story of Kanchan Pagare)

================

हे ही वाचा: यश चोप्रांचे चित्रपट म्हणजे अलवार प्रेमकहाणी, नयनरम्य लोकेशन्स; इथे स्वप्नं विकली जात असत… 

प्रेक्षकांना नेमकं काय हवं आहे?

=================

आपल्या क्षेत्रातला तो सरताज आहे. तरीही तो कायम जमिनीवर असतो. “अजून बरंच काही शिकायचंय”, या त्याच्या वाक्यातून त्याच्यातील नम्रता अधोरेखित होते. माणुसकीवर त्याचा विश्वास आहे. म्हणूनच तो कायम ‘आपला’ वाटतो. आपल्या परफॉर्मन्सनं इतरांच्या आयुष्यात आनंद पेरणं, हे मोलाचं काम तो करतोय. याच क्षमतांच्या भरवशावर तो रसिकांच्या हृदयात विराजमान आहे. कांचनचा अर्थच मुळात सोनं. फिर क्या कहना!

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor Bollywood Celebrity Entertainment Kanchan Pagare Marathi Movie
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.