ऋतुजा बागवेला मिळाला मानाचा उस्ताद बिस्मिल्लाह खाँ युवा पुरस्कार
छोटी जाहिरात पाहून पाऊल टाकलं अन् ‘प्रतिभा’ बहरत गेली
प्रतिभा बराचवेळ वर्तमानपत्रातील ती छोटी जाहिरात पुन्हा पुन्हा न्याहाळत होती. त्यात दिलेल्या पत्त्यावर संपर्क साधायचा की नाही, याबाबतची घालमेल तिच्या मनात सुरू होती. आतापर्यंत ‘घरचे म्हणतील ते’ यापलीकडे न गेलेल्या प्रतिभाला आतापर्यंत दाबलेल्या स्वप्नांना पंख द्यायचे होते, कलेला वाट मोकळी करून द्यायची होती. मोठ्या हिमतीनं तिनं एक पाऊल उचललं. आज त्या पावलांना बळ मिळालं आहे. (Success story of Pratibha Wale)
प्रतिभा वाले… नाटक, मालिका, वेबसीरिजमधला सुपरिचित चेहरा. ‘२०० : हल्ला हो’सारखा चित्रपट, ‘माझ्या नवऱ्याची बायको’सारखी मालिका, ‘बेरोजगार’सारखी सीरिज; अशा कित्येक कलाकृतींत तिनं आपल्या अभिनयाची चमक दाखविली आहे. एरवी मनोरंजन क्षेत्रात यायचं तर अनेकींनी बालपणापासून तयारी केलेली असते. घरी तसं वातावरण असावं लागतं. प्रतिभाच्या बाबतीत मात्र विपरीत घडलं. आवश्यक जबाबदाऱ्या पार पाडून, सर्वांची मनं सांभाळत लग्नानंतर तिनं या क्षेत्रात प्रवेश केला. कलागुणांच्या भरवशावर आज ती तिच्या क्षेत्रात यशस्वीपणे वावरते आहे. ही ‘प्रतिभा’वान वाटचाल आत्मविश्वास गमावलेल्या महिलांना प्रेरणा देणारी आहे.
ती पूर्वाश्रमीची प्रतिभा सलगरे. हे कुटुंब लातूरचं. वडील षण्मुख नोकरीला होते, तर आई चंद्रकला गृहिणी. पाच बहिणींपैकी एक, प्रतिभा. अभ्यासात हुशार अन् कमालीची धीटही. तिचं वाचन चांगलं, साहित्याची आवडही होती. तिला खूप वाटायचं की आपण नाटक, भाषणांत भाग घ्यावा. मात्र, घरी त्यासाठी परवानगी नव्हती. मुलगी दहावी झाली की तिचं लग्न उरकून टाकायचं, अशी पद्धत होती. तरी प्रतिभाला बऱ्यापैकी शिकायला मिळालं. नंतर एमएसईबीमध्ये कार्यरत रेवणसिद्ध वाले यांच्याशी ती विवाहबद्ध झाली अन् नाशिकला आली. तोपर्यंत आपण कलाक्षेत्रात काहीतरी करावं, याचा साधा विचारही तिच्या मनात नव्हता. मात्र, म्हणतात ना… नशीब बरोबर तुम्हाला जिथं न्यायचं, तिथं बरोबर घेऊन जातं.
लग्नानंतर प्रतिभा नोकरी शोधत होती. त्याचदरम्यान राज्य नाट्यस्पर्धा जाहीर झाली होती. एका संस्थेला आपल्या नाटकासाठी कलाकार हवे होते. त्यासाठी त्यांनी एका वर्तमानपत्रात छोटी जाहिरात दिली होती. ही संस्था नेहमी बालनाट्ये करायची. त्यावेळी त्यांनी मोठं नाटक करायचं ठरवलं होतं. ती छोटी जाहिरात वाचून प्रतिभाचं कलामन जागृत झालं. ‘करू की नको’, अशी संभ्रमावस्थाही झाली. पती रेवणसिद्ध यांना तिनं विचारून पाहिलं. रेवणसिद्ध फक्त हसले. (Success story of Pratibha Wale)
प्रतिभानं त्या संस्थेशी संपर्क साधला. सतीश तारे यांचं ते नाटक होतं, ‘सगळं कसं गुपचूप’. प्रतिभाला या नाटकात भूमिका मिळाली. ती पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या नाटकात काम करत होती. तिच्या अभिनयाची तारीफ झाली. तिथून उत्साह दुणावला. नंतर राज्य नाट्यस्पर्धांमध्ये ती सहभागी होऊ लागली. एमएसईबी, कामगार कल्याण मंडळाच्या कित्येक नाटकांमधून तिनं कामं केली. ‘शोभायात्रा’, ‘माकडाच्या हाती शॅम्पेन’सारखी नाटकं तिला करायला मिळाली. एकांकिका, एकपात्री प्रयोगांतूनही ती चमकू लागली, लिहायलाही लागली.
आता व्यावसायिक रंगभूमी खुणावत होती. नाशिकच्या एका स्पर्धेदरम्यान राजा मयेकर परीक्षक होते. त्यांना प्रतिभाचं काम आवडलं होतं. त्यांनी तिला मुंबईला येण्याचा सल्ला दिला होता. मात्र, त्यावेळी ते शक्य नव्हतं. यादरम्यान २०१० साली ती पुण्याला गेली. मयेकरांनी तेथील भालचंद्र पानसे यांचा संपर्क क्रमांक दिला. तेव्हा पानसेंच्या ‘कशाला उद्याची बात’ चित्रपटाची तयारी सुरू होती. तिथं या क्षेत्राशीही तिचा परिचय झाला. त्याचवेळी इतिहास संशोधन मंडळाशी संपर्क आला. तिथं मोहन शेट्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांवर नाटक करत होते. त्यात सावरकरांच्या पत्नीची भूमिका प्रतिभाला मिळाली.
या नाटकाचा शनिवारवाड्यात प्रयोग झाला होता. त्यानंतर मेघराज राजेभोसले यांच्या ‘जाऊ तिथे पाहू’ या नाटकाचेही भरपूर प्रयोग झाले. या नाटकात त्यागराज खाडीलकर यांचीही भूमिका होती. कुलदीप पवार यांच्यासोबत ‘बायांनो नवरे सांभाळा’, विजय जोशी यांच्यासोबत ‘तो मी नव्हेच’ नाटकाचेही भरपूर व्यावसायिक प्रयोग झाले. आता मालिकाक्षेत्रात जायची इच्छा प्रबळ होऊ लागली होती. त्या दिशेनं प्रयत्न सुरू झाले. सुमित्रा भावे त्यावेळी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीसाठी ‘माझी शाळा’ मालिका करीत होत्या. त्यात काम करण्याची संधी मिळाली. ज्योती सुभाष यांच्यासारख्या मोठ्या कलावंताकडून शिकायला मिळालं. यादरम्यान काही शॉर्टफिल्म्सही केल्या. (Success story of Pratibha Wale)
झी मराठीच्या ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेमुळे प्रतिभाचा चेहरा परिचयाचा झाला. प्रतिभाने ‘रुद्रम’, ‘देवयानी’, ‘आराधना’, ‘लाडाची लेक’, ‘माझ्या नवऱ्याची बायको’, ‘डॉ. आंबेडकर’, ‘माझी माणसं’ अशा अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. कोरी पाटी प्रॉडक्शनसोबत तीन वेबसीरिज केल्या. ‘मराठवाडा’, प्लॅनेट मराठीवरील ‘बदली’ तसेच भाडिपाच्या ‘बेरोजगार’ या सीरिजधील तिच्या कामाचं कौतुक झालं.
ऑडिशन दिलं, विसरूनही गेले, अन्…
सार्थक दासगुप्ता दिग्दर्शित, यूडली फिल्म्स, सारेगामासारख्या मोठ्या बॅनरची निर्मिती असलेल्या ‘२०० : हल्ला हो’ या चित्रपटात काम करण्याचा अनुभव भन्नाट होता. प्रतिभा सांगते, “या चित्रपटाची घोषणा झाली, तेव्हा मीही ऑडिशनला गेले. रांगेत राहून रीतसर ऑडिशन दिलं. त्यानंतर काही दिवस गेले. मी ते ऑडिशन विसरूनही गेले होते. काही दिवसांनंतर सुप्रिया धुमाळ हिचा फोन आला. या चित्रपटात भूमिका मिळाल्याची आनंदवार्ता तिनं दिली. कथा छान होती. एका चांगल्या प्रोजेक्टचा भाग होता आलं, अमोल पालेकर, सुषमा देशपांडे यांसारख्या मोठ्या कलावंतांसोबत स्क्रीन शेअर करायला मिळाला, ही माझ्यासाठी अभिमानास्पद बाब होती. करोना काळात एवढ्या मोठ्या मॉबसोबत सर्व आवश्यक काळजी घेऊन, उत्तम नियोजन करून या चित्रपटाचं चित्रीकरण झालं होतं. त्यानंतर ‘पेन्शन’ या चित्रपटातही काम करण्याची संधी मिळाली.”
चांगले लोक भेटत गेले…
या क्षेत्रात येण्याआधी काहीच अनुभव नव्हता, ना घरचं तसं वातावरण होतं. तरी स्वत:तील कलागुणाच्या भरवशावर प्रतिभानं आपली यशस्वी वाटचाल केली. “प्रत्येक क्षेत्र वाईट असतं अन् चांगलंही. आपल्याला वाटेत कसे लोक भेटतात, यावरही बरंच काही अवलंबून असतं. मला चांगल्या व्यक्ती भेटल्या. या क्षेत्रात चांगलेच अनुभव आले. खूपच वाईट अनुभव आले असते, तर कदाचित मी तिथंच थांबले असते. आपण फक्त आपल्या कामालाच प्राधान्य दिलं, तर बऱ्याच गोष्टी सुकर होत जातात. कधी वाईट अनुभव आलेच तर आपला रस्ता बदलणं, दुर्लक्ष करणं हेच श्रेयस्कर ठरत असतं’, असं प्रतिभा सांगते. (Success story of Pratibha Wale)
नाटकांत अधिक समाधान
नाटक, मालिका, चित्रपट, वेबसीरिज यांपैकी कुठलं माध्यम अधिक जवळचं वाटतं, या प्रश्नावर प्रतिभा सांगते, “माझं माझ्या कामावर प्रेम आहे. त्यामुळे सगळी माध्यमं सारखीच आहेत. असं असलं तरी नाटक अधिक जवळचं वाटतं. सीरिजही समाधान देऊन जाते. ओटीटी हे वेगळंच माध्यम आहे. इथं काम ठराविक असतं, कालावधी ठराविक असतो.”
प्रतिभा सध्या नॅशनल अवॉर्ड विजेते स्वप्नील कापुरे यांच्या एका शॉर्टफिल्ममध्ये महत्त्वाची भूमिका साकारत आहेत. काही मालिका, सीरिजचंही काम सुरू आहे. तसेच महाराष्ट्र कल्चरल सेंटरचं ‘सर्व प्रश्न अनिवार्य’ हे मोठं नाटक सध्या सुरू आहे. ‘निशाणी डावा अंगठा’ फेम रमेश इंगळे उत्रादकर यांच्या कादंबरीवर आधारित या नाटकाचं नाट्यरूपांतर कृतार्थ शेगावकर यांनी केलं आहे, तर दिग्दर्शक आहेत अपूर्व साठे. शुभांगी दामले, अनिरुद्ध खुटवळकर यांसारख्या मातब्बरांसोबत काम करताना उत्साह अधिक वाढल्याचे ती सांगते. सुमित्रा भावे यांच्यासोबत चित्रपट करायचा राहून गेला, ही खंत प्रतिभाला आहे. मोहन आगाशे, नीना कुळकर्णी, पूजा नायक, तापसी पन्नू, भूमी पेडणेकर यांचा अभिनय तिला विशेष आवडतो. (Success story of Pratibha Wale)
=========
हे देखील वाचा – मायानगरीत स्वत:चं अस्तित्व सिद्ध करणारा हरहुन्नरी कलावंत: आशिष नरखेडकर
=========
प्रतिभाच्या या प्रवासात घरच्यांची चांगली साथ आहे. “मी काय अचिव्ह केलं, ते आत्ताच सांगता येणार नाही. मात्र, मी काम करत राहते, त्यातच मला समाधान मिळतं. शाळा, कॉलेजातल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाइकांना कौतुक वाटतं, हेच माझ्यासाठी खूप आहे”, असं ती तितक्याच नम्रतेनं नमूद करते. कामालाच परमेश्वर मानून प्रामाणिकपणे त्याला न्याय देणारी प्रतिभा कायम जमिनीवर आहे. तिचा प्रवास प्रवाही आहे. ही ‘प्रतिभा’ दिवसेंदिवस बहरते आहे.