कलाक्षेत्रात शफकच्या गुणांचा संधिप्रकाश
विनिता नंदा यांच्यासमोर शफक मोठ्या आत्मविश्वासानं उभी होती. “मॅम, मुझे आप के साथ काम करना हैं’, असं तिनं स्पष्ट सांगितलं. विनिता यांनी तिला आत्तापर्यंतच्या कामाचा अनुभव विचारला. मात्र, अनुभव शून्य असल्याचं शफकनं सांगितलं. “मला तुमच्यापासून बरंच काही शिकायचं आहे. मात्र, तुमच्यासोबत काम करताना मला माझं मानधन लागेल”, असंही ती थेट बोलली. बेस्टसेलर हिंदी मालिकांच्या निर्मात्या-दिग्दर्शक विनिता यांना शफकमधील हाच आत्मविश्वास आवडला. तिच्यातील स्पार्क त्यांनी तिथंच ओळखला. (Success story of Shafaq Khan)
शफक खान! मनोरंजन क्षेत्रातील एक गुणी, संवेदनशील आणि मोठी क्षमता असलेली दिग्दर्शक. कित्येक मालिकांचं सहदिग्दर्शन, एक आंतरराष्ट्रीय पुरस्कारप्राप्त शॉर्टफिल्म, पंजाबी चित्रपट आणि आता ‘येरे येरे पावसा’ मराठी चित्रपटाचं दिग्दर्शन असा तिचा प्रवास रंजक, रोचक अन् तेवढाच मेहनतीचाही आहे.
शफक लहानपणापासूनच क्रिएटिव्ह. कॉलेजात असताना ती नाटकं बसवायची, दिग्दर्शित करायची. फॅशन डिझायनिंग वगैरेही केलं. मात्र, चित्रपटसृष्टीत प्रवेशण्याचा काहीही विचार नव्हता. वडील शफीक खान व्यावसायिक, तर आई कमर खान गृहिणी. घरी चित्रपटाचं अजिबात वातावरण नव्हतं. शफकला शिक्षणासाठी अलीगढ यूनिव्हर्सिटीला पाठविण्याचं ठरलं.
मुंबई सोडून अलीगढला जाणं शफकसाठी सुरुवातीला नाखुशीचंच होतं. मात्र, घरच्यांनी सांगितलं, “एक वर्ष तिथं राहून बघ. वाटलं तर शिक्षण पूर्ण कर, अन्यथा परत ये.” शफकनं पालकांचा सल्ला मानला अन् ती अलीगढकडे रवाना झाली. तिथल्या कलात्मक वातावरणात ती चांगलीच रुळली. पाच वर्षे शिक्षण पूर्ण केल्यानंतर ती मुंबईला परतली. नंतर मुंबईत येऊन वांद्रे येथील नॅशनल कॉलेजमध्ये एक वर्ष एलएलबी केलं. (Success story of Shafaq Khan)
हे सगळं सुरू असताना कलामन स्वस्थ बसू देत नव्हतं. काहीतरी रोजगार असावा म्हणून करण जोहर, फिरोज नाडियादवाला यांच्या ऑफिसमध्ये कामं केली. त्यादरम्यान खूपदा शूटिंग बघायला मिळायचं. तिथं कुठंतरी वाटलं, हे करून बघावं. मात्र, त्यासाठी रीतसर प्रशिक्षण गरजेचं होतं.
त्याकाळी मालिकांचा बोलबाला होता. विनिता नंदा यांच्या कित्येक मालिका धूम करीत होत्या. शफकनं विनिता यांना गाठलं. त्यांच्यासोबत राहून ‘संसार’, ‘दीवाने तो दीवाने हैं’, ‘पापा’ अशा मालिकांचं सहदिग्दर्शन केलं. यादरम्यान टीव्ही मालिकांचा स्क्रीनप्ले, दिग्दर्शन, त्यातील तांत्रिक बाबी तिला शिकता आल्या. (Success story of Shafaq Khan)
विनिता यांच्यासोबत वर्षभर काम केल्यानंतर शफकनं स्वत:ची निर्मिती कंपनी सुरू केली. २०१२ला तिनं दिग्दर्शित केलेला ‘देसी रोमियो’ हा पहिला पंजाबी चित्रपट प्रदर्शित झाला. बिहारमध्ये मुलगी बनून नाच करणाऱ्या मुलांची सत्यस्थिती तिनं आपल्या ‘लौंडा नाच’ या शॉर्टफिल्ममधून मांडली. ही शॉर्टफिल्म देश-विदेशात प्रचंड गाजली. लॉस एन्जेल्समध्ये या शॉर्टफिल्मला ‘Abbot Kinney’ या मानाच्या पुरस्कारानं गौरविण्यात आलं. शफकची गाडी आता वेगानं धावू लागली. (Success story of Shafaq Khan)
असा घडला ‘येरे येरे पावसा’
आपल्या कलाकृतीतून वास्तववादी कथा प्रेक्षकांपुढं आणायच्या, याकडे शफकचा कटाक्ष असतो. त्यातूनच ‘येरे येरे पावसा’ हा मराठी चित्रपट घडला. भूषण दळवीनं ही कथा लिहिली होती. ती घेऊन तो शफककडे गेला. एका गावात पाच वर्षांपासून पाऊस नाही. ते गाव दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहे. अशावेळी गावातील लहान मुलं एक कमाल करतात, अशी ही कथा. यावर शॉर्टफिल्म बनवण्याचा प्रस्ताव भूषणनं मांडला. शफकला ती कथा भावली. हा शॉर्टफिल्मचा नव्हे, तर चित्रपटाचा विषय आहे, हे तिनं जाणलं. चित्रपट करायचा ठरलं. त्यासाठी जुळवाजुळव सुरू झाली.
नुसती कथा मांडून चालणार नव्हतं, तर त्या विषयाचा सखोल अभ्यास गरजेचा होता. शफक आणि तिच्या टीमनं या विषयाचा रिसर्च सुरू केला. दुष्काळी स्थितीचा सामना करणाऱ्या महाराष्ट्रातील गावांचा शोध सुरू झाला. अशी कित्येक गावं मिळाली. त्यानंतर कथा आणखी फुलू लागली.
अतिशय मेहनतीनं हा चित्रपट आकाराला आला. विषय गंभीर असला तरी शफकनं या चित्रपटाला खुमासदार ट्रीटमेंट दिली आहे. त्यामुळे मनोरंजनातून प्रबोधन हा मेळ उत्कृष्टरीत्या साधला गेलाय. या चित्रपटाचं सध्या कौतुक होतंय. ‘जीफोनी’, ‘हॉलिवूड नॉर्थ फिल्म’, ‘टोकियो इंडी फिल्म’ या आणि अशा अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये या चित्रपटानं मोहोर उमटवली आहे. (Success story of Shafaq Khan)
-अन्, पहिल्यांदा ‘ॲक्शन’ म्हटलं…
या क्षेत्रात काम करताना कित्येक गमतीजमतीही घडत असतात. त्यातीलच एक किस्सा शफकनं सांगितला. मालिकाविश्वात काम करीत असतानाचा हा प्रसंग. कॅमेरामन व दिग्दर्शक भूषण यांच्या मालिकेचं काम सुरू होतं. भूषण यांना सेटवर यायला उशीर झाला होता. युनिट वाट पाहून कंटाळलं होतं. तेव्हा कुणीतरी येऊन सांगितलं, “एका ॲक्टरचा, फोनवर बोलताना आणि तो फोन कट करतोय, असा सीन घ्यायचा आहे. ती जबाबदारी शफकवर आली.
दिग्दर्शक बनण्याची महत्त्वाकांक्षा असलेल्या शफकला ही छोटीशी संधीही बळ देणारी होती. मात्र, प्रत्यक्षात एवढा छोटासा सीन घेणंही सोपं नाही, याची जाणीवही तिला झाली होती. अर्थात, दिग्दर्शन हे काही खायचं काम नव्हे, याची प्रचीती तिथंच आली होती. तरी मनाचा हिय्या करून ती उठली, सीन लावला, सर्वकाही तयार असल्याची खातरजमा करून घेत आयुष्यात पहिल्यांदा ती म्हणाली, ‘ॲक्शन…’ आणि सीन ओके केला. आयुष्यातला हा अविस्मरणीय प्रसंग असल्याचं ती सांगते. (Success story of Shafaq Khan)
मराठीत उच्च दर्जाची क्षमता
चित्रपट या कलेची प्रांतांत विभागणी होऊ नये. ती एक कला आहे आणि कोणत्याही भाषेतला चित्रपट असला तरी तो भारतीय आहे, असं शफकचं स्पष्ट मत आहे. मराठीत उच्च दर्जाची क्षमता आहे. एखादी कथा अधिक वास्तवदर्शी पद्धतीनं सांगायची झाली, तर ते मराठीत अधिक शक्य होतं, असं जाणवल्याचं शफक सांगते. मराठीतले कलाकार कसलेले आहेत. भूमिका ते लवकर समजून घेतात आणि ती तितक्याच परिपक्वतेनं सादर करतात, असं तिचं निरीक्षण आहे.
मोठा पडदा अबाधित राहील…
आज मनोरंजनक्षेत्रात मोठ्या पडद्यापुढे बरीच आव्हानं आहेत. अशावेळी चित्रपटगृहांना धोका आहे का, याबाबत शफकचं मत जाणून घेतलं असता ती म्हणाली, “असं अजिबात वाटत नाही. मोठ्या पडद्यापुढे याआधीही कित्येक आव्हानं आली. मात्र, त्याचं स्थान अबाधित आहे. टीव्ही, ओटीटी ही माध्यमं त्यांच्याजागी निश्चितच सक्षम आहेत. ओटीटीच्या माध्यमातून नवनवे विषय, नवे कलाकार आपल्यापुढं येत आहेत. मोठ्या पडद्याचं अस्तित्व कायम आहे. थिएटरच्या अंधारात उत्तम ध्वनिव्यवस्थेसह चित्रपटाचा आनंद घेणं हा वेगळाच अनुभव आहे. पॉपकॉर्नचा तिथं सुगंध आहे. आउटिंगचीही ती वेगळी मजा असते. कथेचा वेगळा आनंद तिथं मिळतो. त्यामुळे मोठ्या पडद्याला धोका नाहीच.” (Success story of Shafaq Khan)
जर्नी लंबी हैं, बहोत कुछ करना हैं…
शफक सध्या व्यस्त आहे. एका हिंदी चित्रपटाची तयारी, लिखाण सुरू आहे. लवकरच त्याची घोषणा होईल. “काहीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना मी या क्षेत्रात आले. आतापर्यंत माझ्या परीनं कामं केली आहेत, रसिकांना चांगलं काही देण्याचा प्रयत्न केला. ‘अभी जर्नी लंबी हैं, बहोत कुछ सीखना हैं, बहोत कुछ करना हैं”’, असं ती नम्रपणे सांगते.
===========
हे देखील वाचा – अभिनयातला कर्मठ ‘अधिकारी’ मिलिंद शिंदे
===========
आईवडिलांनाच ती आपला आदर्श मानते. एवढं काम करूनही कमालीची नम्र आणि कायम जमिनीवर असणं हा तिच्यातील आणखी एक मोठा गुण. आई-वडील, भाऊ असलम यांच्या रूपात झालेली हानी तिनं सोसलेली आहे. म्हणून मानवी जीवनातील दु:खांची तिला जाणीव आहे. ती आणि छोटा भाऊ शारीक दोघं मिळून आपली निर्मितीसंस्था चालवत आहेत. रसिकांना उत्तमोत्तम द्यायचं, हाच तिचा ध्यास आहे. ‘शफक’चा मराठीत अर्थ होतो, संधिप्रकाश. गुणी, मेहनती शफकच्या रूपात हे कलाक्षेत्र आणखी प्रकाशमान होत जाईल, यात शंकाच नसावी.