Prasad Oak : प्रसाद-मंजिरीच्या लग्नात सासूबाई ‘या’ कारणामुळे रडल्या!

सुरभी भावे – लहान वयातच एकामागून एक संकटे आली, पण मी हार मानली नाही…
सुरभी भावे! (Surabhi Bhave) अनेक मालिकांमधून घराघरांत पोहोचलेली एक गुणी अभिनेत्री. सुरभी सध्या ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेमध्ये नकारात्मक भूमिकेमध्ये दिसत आहे. मालिकांमधून नकारात्मक भूमिका करणाऱ्या या अभिनेत्रींच्या आयुष्यात सध्या सकारात्मक, आनंदी गोष्टी घडत आहेत. यापैकी एक म्हणजे तिच्या ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेनं नुकतेच शंभर भाग पूर्ण केले आहेत, तर दुसरी आणि सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिला अभिनयासाठी ‘दादासाहेब फाळके ट्रस्टचे अप्रिसिएशन सर्टिफिकेट’ मिळालं आहे.
सुरभी मूळची कोकणातली, गुहागरमधली. तिचं चौथीपर्यंतचं प्राथमिक शिक्षण गुहागरमध्येच झालं आहे. नंतर पाचवीपासून आठवीपर्यंतचं शिक्षण राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेमध्ये झालं. ही शाळा आशियातील मुलींची पहिली सैनिकी शाळा आहे. सुरभी या शाळेच्या पहिल्याच बॅचची विद्यार्थिनी होती.
सुरभीच्या जडणघडणामध्ये या शाळेचा महत्त्वाचा वाटा आहे. सैनिकी शाळा असल्यामुळे शिस्त होतीच. शिवाय स्विमिंग, हॉर्स रायडींग अशा अनेक गोष्टीही तिथे शिकायला मिळाल्या. तसंच कलागुणांनाही चांगला वाव मिळाला. “शाळेत असताना शिक्षकांच्या नकला करायचे, इतकंच काय तर, आपल्याला गाणं येतं याचा साक्षात्कारही मला शाळेत असताना झाला”, असं सुरभी सांगते.

सरकारी अधिकारी व्हायचं स्वप्न होतं –
सैनिकी शाळा असल्यामुळे शाळेत अनेकदा प्रमुख पाहुणे म्हणून मोठमोठे अधिकारी आणि मंत्री येत असतं. त्यामुळे त्यावेळी सुरभीने (Surabhi Bhave) एमपीएससी किंवा यूपीएससी करून सरकारी अधिकारी व्हायचं स्वप्न बघितलं होतं. अशातच तिला मायग्रेनचा अटॅक आला आणि ती गुहागरला परत गेली. त्यावेळी तिचे वडील तिला म्हणाले, “तू आता इथेच राहा. पुढे कॉलेजला गेलीस की, आमच्यासोबत फारशी राहणार नाहीस.” त्यामुळे नववीमध्ये ती पुन्हा गुहागरच्या शाळेत गेली. पण तिचं स्वप्न मात्र कायम होतं.
काही काही गोष्टी विधिलिखितच असतात आणि त्या घडणारच असतात. अशीच एक दुर्दैवी घटना सुरभीच्या आयुष्यातही घडली. सुरभी दहावीत असताना अचानक तिचे वडील या जगातून कायमचे निघून गेले. हा सुरभी आणि तिच्या कुटुंबियांसाठी एक मोठा धक्का होता. या घटनेने सुरभीचं कुटुंब कोलमडून गेलं. तिची आई गृहिणी आणि भाऊ तिच्यापेक्षा तीन वर्षांनी लहान. त्यामुळे सुरभीने आपली सगळी स्वप्न बाजूला ठेवून लवकरात लवकर शिक्षण पूर्ण करून कुटुंबाला आर्थिक आधार द्यायचा निर्णय तिने घेतला.
वडिलांच्या जाण्याने आर्थिक परिस्थितीही डबघाईला आली. नारळ, सुपारीच्या बागांमधून मिळणाऱ्या उत्पन्नावरच गुजराण होत असे. अशातच वडिलांपाठोपाठ ठराविक अंतराने तिचे आजी, आजोबाही निवर्तले. घरात चोरी झाली. दहावीमध्ये असताना एकामागून एक अशी संकटांची श्रुंखला सुरु होती. त्यामुळे सुरभी दहावीची परीक्षा देण्याबद्दल साशंक होती. पण तिच्या आईने तिला समजावलं, “नापास झालीस तरी चालेल, पण तू परीक्षा दे”, असं सांगून तिला धीर दिला. याबद्दल सांगताना सुरभी म्हणाली, “अप्रत्यक्षपणे, नेव्हर गिव अप, हा धडा त्यावेळीच आईने दिला.”

एवढ्या दुःखद प्रसंगामधून जाऊनही सुरभी (Surabhi Bhave) दहावीला फर्स्ट क्लासमध्ये पास झाली. पण त्या दुःखद वर्षाबद्दल बोलताना सुरभी म्हणते, “२००२ हे माझ्या आयुष्यातलं सर्वात वाईट वर्ष होतं.” पुढे राणी लक्ष्मीबाई सैनिकी शाळेमध्येच तिला अकरावीला ॲडमिशन मिळाली. खरंतर तिला सायन्सला जायचं नव्हतं, पण त्या शाळेत सायन्स अनिवार्य असल्यामुळे तिला दुसरा पर्याय नव्हता.
बारावीच्या परीक्षेनंतर सुरभी स्मिता तळवलकर यांच्या ठाण्यामध्ये झालेल्या नाट्यशिबिरामध्ये सहभागी झाली होती. तिथे दिग्पाल लांजेकर यांच्याकडून तिला खूप काही शिकायला मिळाल्याचं सुरभी आवर्जून सांगते. त्यांनी सुरभीला अभिनय क्षेत्रात येण्याचा सल्लाही दिला होता. परंतु एकतर हे क्षेत्र बेभरवशी आणि त्यात सुरभीवर कुटुंबाची जबाबदारी. त्यामुळे तिने तेव्हा या क्षेत्राचा विचार केला नाही. पण कुठेतरी मनात या क्षेत्राबद्दल ओढ निर्माण झाली होतीच.
पुढे बारावीनंतर सुरभीने नोकरी करत बीएमएम पूर्ण केलं. या दरम्यान तिने प्रशांत दामलेंच्या अकॅडमीमध्ये नोकरी केली. तिथे अनेक मातब्बर कलाकारांनी तिला अभिनय क्षेत्राकडे येण्याचा सल्ला दिला. ग्रॅज्युएशननंतर तिला एबीपी माझा (तेव्हा स्टार माझा) मध्ये नोकरी मिळाली. तिथे कलाकारांच्या मुलाखती घेताना सुरभीला सतत वाटायचं, आपली पण अशीच मुलाखत कोणीतरी घ्यायला हवी.

अशातच एका स्पर्धेच्या एकांकिकेमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीने आयत्यावेळी नकार दिल्यामुळे सुरभीला त्यामध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि इथूनच तिचा अभिनय प्रवास सुरु झाला. पुढे नोकरीत स्थिरस्थावर झाल्यावर किमान ६ महिने गुजराण होऊ शकेल एवढे पैसे गाठीशी आहेत याची खात्री झाल्यावर तिने अभिनय क्षेत्रात नशीब आजमावायचं ठरवलं. याबद्दल आईला विचारल्यावर तिची आई म्हणाली, “हे तू आधी म्हणाली असतीस तरी मी नाही म्हटलं नसतं..” आईच्या पाठिंब्यामुळे अभिनय क्षेत्रात प्रवास सुरु झाल्याचं, सुरभी आवर्जून सांगते.
आत्तापर्यंत सुरभीने (Surabhi Bhave) १४ मालिका ३ चित्रपट २ नाटकांमध्ये काम केलं आहे. आता तिला सोशिक, मुळूमुळू रडणाऱ्या स्त्रीची व्यक्तिरेखा किंवा एकदम डॅशिंग, करारी स्त्रीची व्यक्तिरेखा साकारायची आहे. सहकलाकारांबद्दल विचारल्यावर सुरभी सांगते, “कारकिर्दीच्या सुरवातीलाच रोहिणी हट्टंगडी, चिन्मय मांडलेकर अशा मातब्बर आणि अनुभवी कलाकारांसोबत काम करायची संधी मिळाली, त्यामुळे खूप काही शिकता आलं. आत्ताही ‘भाग्य दिले तू मला’ मालिकेमध्ये निवेदिता ताईंसोबत काम करताना खूप दडपण आलं होतं, पण त्या खूपच गोड आहेत. त्रिभंगाच्या वेळीही रेणुका ताईंनी खूप समजून घेतलं. ‘अनुभव हाच खरा गुरु आहे’, हे वाक्य या कलाकारांकडे बघून पटलं.”

सुरभीचं अरेंज मॅरेज आहे. तिला सहा महिन्यांचं छोटं बाळ आहे. पण सुदैवाने बाळाच्या जन्मानंतरही पती आणि सासरच्या माणसांनी प्रत्येकवेळी तिला सपोर्ट केला. “आयुष्यातल्या प्रत्येक वळणावर चांगली माणसं भेटत गेली आणि त्यांच्यामुळेच मी घडत गेले”, असं सुरभी सांगते. एकूणच तिची कारकीर्द आणि वैयक्तिक आयुष्य सुरळीत चालू आहे. खूप लहान वयात आयुष्य म्हणजे काय, याचा अनुभव घेतलेली सुरभी (Surabhi Bhave) आपल्या कारकिर्दीपेक्षा जास्त आपल्या माणसांबद्दल भरभरून बोलते. मुलगी सांभाळायला मदत करणाऱ्या सानिकाचं नावही ती आवर्जून घेते.
===========
हे देखील वाचा – ‘लाल सिंग चढ्ढा’ चित्रपटाचा १४ वर्षांचा प्रवास सोपा नव्हता – अतुल कुलकर्णी
===========
“या क्षेत्रात काम केल्यामुळे तुम्हला पैशासोबत अजून एक गोष्ट मिळते ती म्हणजे प्रसिद्धी. जे या क्षेत्राचं वेगळेपण आहे. हे वेगळेपणच तुम्ही टिकवून ठेवायला हवं आणि त्यासाठी पाय नेहमी जमिनीवर हवेत.” असं सुरभीचं स्पष्ट मत आहे. एकदम दिलखुलास गप्पा मारणारी, अपयशाने खचून न जाणारी आणि यशामध्ये पाय जमिनीवर ठेवणाऱ्या सुरभीचा पुढचा प्रवास निश्चितच उत्तम असणार यात शंकाच नाही. (Surabhi Bhave)