दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
पाचूच्या रानात झिम्मड पाऊस !
गीतकाराला एखादे गीत, त्यातले शब्द कसे सुचतात त्याची प्रक्रिया जाणून घेणं खप इंटरेस्टिंग असतं. ‘सुंदर माझं घर’ चित्रपटाच्या वेळचा किस्सा आहे. या चित्रपटासाठी अभिनेत्री मधुराणी गोखले – प्रभुलकर संगीत करणार होती. त्याकरिता कोकणचे वर्णन करणारे गीत हवे होते आणि मधुराणीने गीतकार गुरु ठाकूरला कोकणावर गीत लिहायला सांगितले.
या चित्रपटाकरिता लोकेशन शोधण्याकरिता मधुराणी कोकणातील ठिकाणे पहात होती. मधुराणीने गुरूला सांगितले की या चित्रपटाची नायिका मुंबईत आहे आणि तिच्या आठवणीतील कोकण गीतातून यायला हवे आहे. त्यावेळी गुरु ठाकूर देखील मुंबईत होता आणि मग आपल्याला आता कोकणातले काय आठवेल याचा तो विचार करू लागला.
हे वाचलेत का ? वाह गुरु
गुरूला त्याच्या लहानपणची एक गोष्ट आठवली. कोकणातील गावात देवळात उत्सवाच्या वेळी कार्यक्रम असायचे आणि ते पाहून परतताना एकदा तो आणि त्याचा मामा समुद्रकिनाऱ्याच्या वाटेने जात होते. चांदणी रात्र होती. तेव्हा वाळू चांदण्यांमुळे चमकताना दिसत होती. मामा कोकणी भाषेत म्हणाला, “आज चांदना पडला हा”.
गुरु लहान होता ,त्याला वाटलं की आकाशातून चांदण्या खाली पडल्या आणि त्यांचा फुटून चुरा झाला की काय?
गुरु म्हणाला की “मामा, चांदण्या पडून फुटल्याने हा चुरा झाला ना?” कारण त्या चांदण्या रात्री चमकणारी वाळू त्याला चांदण्यांचा चुरा झाल्यासारखी वाटली. “चांदण्यांचो चुरो झालो” असे म्हणत तेव्हा या ‘चांदणचुरा’ शब्दावरून गुरुची त्या काळात काही जणांनी गंमत केली होती. पण तो ‘चांदणचुरा’ शब्द गुरूच्या मनात कायम घर करून राहिला.
मधुराणीने कोकणच्या आठवणींचे गीत लिहायला सांगितल्यावर मुंबईत असलेला गुरु कोकणची काय चित्रं डोळ्यासमोर येतात, याचा विचार करू लागला आणि मग पटकन त्याला पाच कडव्यांचे गाणे सुचले.
हे गीत ‘सुंदर माझं घर’ चित्रपटाकरिता ध्वनीमुद्रित झालं. या गीताला संगीत मधुराणी गोखले – प्रभुलकर हिचे असून मनिषा जोशी आणि कल्याणी साळुंखे यांनी ते गायले आहे .