दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
‘कोमा’त गेलेल्या नर्गिसला सुनील दत्त ने परत आणले!
आपल्या कडील पुराण कथांमध्ये सत्यवान सावित्री यांची गोष्ट खूप लोकप्रिय आहे. सावित्रीने आपल्या मृत पतीचे सत्यवानाचे प्राण परत आणले अशी आख्यायिका त्यात आहे. प्रेमाची ताकत खूप मोठी असते याचा प्रत्यय आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये अनेकदा येत असतो. अभिनेता सुनील दत्त (sunil dutt) आणि अभिनेत्री नर्गिस यांच्या जीवनात देखील याचा प्रत्यय त्यांना वारंवार येत होता. खरंतर या दोघांचा विवाह हा तसं म्हटलं तर रसिकांसाठी खूपच अनपेक्षित असा हा विवाह होता. पण नर्गिसने लग्नानंतर आपला सर्व भूतकाळ आपल्या स्वत: च्या हाताने पुसून टाकला आणि ‘सुनील एके सुनील’ या न्यायाने ती त्याच्या संसारात रममाण झाली. सुनील दत्तचे (sunil dutt) करिअर उभे करण्यामध्ये नर्गिसचा मोठा सहभाग होता. नर्गिसने नंतर सामाजिक कार्यात स्वतःला गुंतवून घेतले. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी नर्गिस दत्त यांना राज्यसभेवर घेतले. त्यांच्या संसार वेलीवर एक मुलगा आणि दोन मुली उमलल्या होत्या. सर्व काही व्यवस्थित चालू असताना सत्तरच्या दशकाच्या मध्यावर त्यांच्या संसाराला कुणाची तरी दृष्ट लागली आणि नर्गिस कॅन्सरची शिकार झाली.
या बातमीने सुनील दत्त (sunil dutt) पुरता हादरून गेला पण लवकरच त्याने स्वतःला सावरले आणि नर्गिसला जगातील बेस्ट पॉसिबल ट्रीटमेंट द्यायचे त्याने ठरवले. नर्गिसला घेऊन तो सरळ अमेरिकेला रवाना झाला आणि तिथे तिच्यावर उपचार सुरू झाले. परंतु हळूहळू नर्गीसची रोगप्रतिकारशक्ती कमी होत गेली आणि एकेक अवयव तिचे निकामे होत गेले आणि अमेरिकेत हॉस्पिटलमध्ये ती चक्क कोमात गेली! तिला नंतर लाईफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आले. अमेरिकेतील डॉक्टर्सनी सुनील दत्तला (sunil dutt) बोलावून सांगितले की “आता नर्गिस आपल्याला जी जिवंत दिसते आहे ती केवळ लाईफ सपोर्ट सिस्टीममुळे. आता आम्हाला असे वाटत नाही की ती यातून बरे होईल आणि परत येईल. आणि परत जरी आली तरी फार काळ जगेल. तेव्हा निर्णय तुम्ही घ्या. लाईफ सपोर्ट सिस्टीम आपण काढून घेऊ. तिचे आणखी हाल नको करूयात. तिला शांतपणे जाऊ द्या.” डॉक्टर्सचे हे म्हणणे ऐकल्यानंतर सुनील दत्त खूपच हवालदिल झाला.
आपल्या प्राण प्रिय पत्नीच्या बाबत डॉक्टरांनी जे विधान केलं होतं ते ऐकून तो म्हणाला,” थांबा. मला एकट्याला हा निर्णय घेता येणार नाही. मला माझ्या मुलांशी बोलले पाहिजे.” नंतर सुनील दत्तने (sunil dutt) संजय, नम्रता आणि प्रियाला अमेरिकेत बोलावून घेतले आणि त्यांना वस्तुस्थितीची जाणीव करून दिली. तिघेही धाय मोकलून रडू लागले. पण तरीही त्यांनी सांगितले,”नको. जोवर मशीन चालू आहे आणि औषध ती घेत आहे तोवर आपण लाईफ सिस्टीम मशीन काढायची नाही. तिला असेच जगू द्या. तिचे असणे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे.” सुनील दत्तने (sunil dutt) आपल्या कुटुंबाचा निरोप डॉक्टर्सला सांगितला आणि लाइफ सपोर्ट सिस्टीम कायम ठेवली!
त्या काळात सुनील दत्तला (sunil dutt) कुणीतरी असे सांगितले होते की जेव्हा एखादी व्यक्ती कोमात असते त्यावेळी त्या व्यक्तीचे अंतर्मन जागे असते जर या अंतर्मनाला साद दिली तर ती व्यक्ती बरी होऊ शकते! तेंव्हा पासून सुनील दत्त हॉस्पिटल मध्ये नर्गिसच्या रूम मध्ये जाऊन तिच्या उशाशी बसून तासनतास तिच्याशी बोलत रहायचा. तिला त्यांच्या लग्नानंतरच्या दिवसाबद्दल सांगायचा, भारतातून रसिकांचे येणारे पत्र तिला वाचून दाखवायचा, मुलांना तिच्याबद्दल काय वाटतं हे तिला सांगत राहायचं असे रोज चार पाच तास नर्गिस सोबत तो एकटाच बोलत राहायचा. आणि आठवड्याभरानंतर चमत्कार घडला. नर्गिसने डोळे उघडले. सुनील दत्तकडे पाहून ती मंद हसली.
========
हे देखील वाचा : हम बने तुम बने एक दुजे के लिये…
========
सुनील दत्तने (sunil dutt) ताबडतोब डॉक्टर्सला बोलावून आणले. डॉक्टर्सला देखील हा फार मोठा चमत्कार वाटला. सुनील दत्त यांच्या कठोर परिश्रमाला, तपश्चर्येला आणि प्रेमाला यश आले होते. नर्गिस आता व्यवस्थित बोलत होती. आपल्या भारतीय कथांमध्ये सावित्रीने सत्यवानाचे प्राण परत आणले होते इथे नेमका उलटा प्रकार झाला होता. नर्गिस सुनील दत्तला म्हणाली,” मला माहिती आहे; माझे फार दिवस नाहीत. पण मला या परकीय देशात मरायचे नाही. मला तुम्ही आपल्या भारतात घेऊन चला. मला माझ्या मातृभूमीतच शेवटचा श्वास घ्यायचा आहे!” सुनील दत्तने तिच्या इच्छेनुसार तिला भारतात परत आणले.
तेव्हा संजय दत्त यांचा पहिला सिनेमा ‘रॉकी’ चित्रपट तयार झाला होता. फक्त त्याचे प्रदर्शन राहिले होते. त्याचा ट्रायल शो देखील नर्गिससाठी अरेंज केला गेला. तिने आपल्या मुलाला रुपेरी पडल्यावर पाहिले. संपूर्ण सिनेमा पाहताना तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. आणि त्या नंतर काही तासातच तिने समाधानाने प्राण सोडले.तो दिवस होता ३ मे १९८१. ही भावस्पर्शी आठवण सुनील दत्तने (sunil dutt) सिमी गरेवाल सोबत Renduzvous with simi greval या कार्यक्रमात १९९७ साली सांगितली होती.