जस्ट मोहब्बत: उमलत्या वयातील अलवार भावभावनांचा अविष्कार
केबलच्या विश्वात १९९५ साली सोनी नावाच्या अजून एका चॅनेलची भर पडली. या चॅनेलने नेहमीच वेगळ्या विषयांवर आधारित कार्यक्रम द्यायचा प्रयत्न केला आहे. अगदी ‘आहट’, ‘सीआयडी’, ‘अदालत’, ‘क्राइम पेट्रोल’ अशा वेगळ्या विषयांवरच्या मालिकांपासून थेट ‘बुगी वूगी’, ‘इंडियन आयडॉल’, ‘कौन बनेगा करोडपती’, ‘बिग बॉस’ (बिग बॉसचा पहिला भाग सोनी टीव्हीवरच प्रसारित करण्यात आला होता) आणि आत्ताच्या ‘शार्क टॅंक इंडिया’पर्यंत वेगवेगळे प्रयोग या चॅनेलवर झाले आहेत. दैनंदिन मालिकांच्या विश्वातही या चॅनेलने अनेक वेगळ्या विषयांवरच्या मालिका दिल्या आहेत. यापैकीच एक म्हणजे ‘जस्ट मोहब्बत (Just Mohabbat).’
ही मालिका ‘द वंडर इयर्स’ या अमेरिकन टीव्ही मालिकेवर आधारित होती. त्याकाळी लहान मुलांसाठी मालिका तयार होत नव्हत्या अशातला भाग नाही. अगदी दूरदर्शन पासून सर्व चॅनेल्सवर लहान मुलांसाठी चंद्रकांत, अलिफ लैला, विक्रम वेताळ, शक्तिमान, अशा कित्येक मालिका प्रसारित केल्या गेल्या. तसंच मराठीमध्ये ‘गोट्या’ ही मालिका प्रसारित करण्यात आली होती. परंतु या सर्व मालिकांमध्ये ‘जस्ट मोहब्बत ( (Just Mohabbat)’ ही मालिका वेगळी ठरली कारण इतर सर्व मालिका लहान मुलांसाठी तर होत्या त्यांच्याबद्दल नव्हत्या. जस्ट मोहब्बतने इथेच बाजी मारली.
जय (हर्ष लुनिया, वत्सल शेठ) हा या मालिकेमध्ये मध्यवर्ती भूमिकेमध्ये आहे. जयचे आई -वडील म्हणजेच राज (सलीम शाह) आणि माया (कविता कपूर) त्याला शिकण्यासाठी डेहराडूनच्या बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवतात. जयचं कुटुंब, त्याचे खास मित्र – मैत्रिणी मधुर, रोमा, संजय आणि त्याचा काल्पनिक मित्र गौतम (आदित्य कपाडिया) या साऱ्यांशी असणारे नातेसंबंध आणि वाढत्या वयानुसार त्याची बदलत जाणारी मानसिकता या विषयाभोवती मालिकेचं कथानक फिरत राहतं.
या मालिकेमध्ये जय लहान वयात कुटुंबापासून दूर राहायला लागल्यामुळे त्याच्या मनात निर्माण झालेली एकाकाकीपणाची आणि असुरक्षिततेची भावना, कुटुंबाची येणारी आठवण आणि नंतर हळूहळू मित्र मैत्रिणीसोबत रुळत जाणं या गोष्टी अगदी प्रभावीपणे दाखवण्यात आल्या होत्या, तर काही वर्षांच्या लीपनंतर किशोरवयात मनात फुलणारं हळुवार प्रेम, आकर्षण, प्रेमातलं यश – अपयश, मैत्रीचे धागे, उमलत्या नकळत्या वयात मनात निर्माण होणाऱ्या भाव – भावना या साऱ्या गोष्टींचं यथासांग चित्रण या मालिकेमध्ये करण्यात आलं.
ही मालिका केवळ लहान मुलांच्याच नाही, तर मोठ्यांच्याही पसंतीस उतरली होती. १९९६ पासून २००० सालापर्यंत सलग ४ वर्ष ही मालिका चालू होती. या चार वर्षांत मालिकेमध्ये अनेक नवनवीन पात्रांची एंट्री झाली होती. सलोनी, अदिती, जे डी अंकल ही पात्र विशेष लोकप्रिय झाली होती.
जय हा श्रीमंत कुटुंबातला मुलगा असतो. त्याचे मित्र मैत्रिणी आणि एकूणच मालिकेमध्ये श्रीमंत कुटुंबाचं राहणीमान दाखविण्यात आलं आहे. पण त्यांच्या भावना मात्र सारख्याच आहेत. मुलांमध्ये ही मालिका लोकप्रिय होण्याचं हे एक प्रमुख कारण होतं. जय, रोमा, संजय ही सर्व मंडळी मुलांना आपल्यापैकीच वाटू लागली होती. या मालिकेचं शीर्षक गीतही प्रचंड लोकप्रिय झालं होतं.
जयच्या भूमिकेने वत्सल शेठ या कलाकाराला प्रचंड लोकप्रियता मिळाली. पुढे त्याने २००४ साली ‘टारझन – द वन्डर कार’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण बॉलिवूडमध्ये त्याला म्हणावं तसं यश मिळालं नाही. काही दिवसांनी तो पुन्हा टीव्ही चॅनेल्सकडे वळला.
याच कालावधीत मोठ्या शहरांमध्ये ‘चाईल्ड सायकॉलॉजी’चे वारे वाहायला लागले होते. त्यामुळे काही प्रमाणात प्रेक्षकवर्ग या मालिकेकडे खेचला गेला. तंत्रज्ञानाच्या प्रगतीने वेग घेतला होता. छोट्या शहरांमध्ये सायबर कॅफे उघडले गेले होते आणि आधुनिक विचारसरणी घराघरात रुजू लागली होती. त्यामुळे मालिकेमध्ये दाखवण्यात आलेलं उच्चभ्रू समाजाचं चित्रण समजून घेणं प्रेक्षकांना तितकंसं कठीण गेलं नाही.
==========
हे देखील वाचा – लपाछपी: थरारक, रहस्यमय, उत्कट आणि भीतीदायक
==========
आजही ही मालिका नव्वदच्या दशकात लहानाचे मोठे झालेल्या अनेकांना जुन्या आठवणींमध्ये घेऊन जाईल. कोणाला पहिलं प्रेम आठवेल, तर कोणाला शाळेच्या दिवसातली मैत्री आठवेल, कोणाला हॉस्टेल लाईफ, तर कोणाला अजून काही. प्रत्येकाची आठवण कदाचित वेगळी असेल, पण ‘जस्ट मोहब्बत (Just Mohabbat).’ म्हटल्यावर मालिका आणि त्यासंबंधित एखादी तरी आठवण नजरेसमोर येईल.