Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

Taath Kana Movie Trailer: जिद्द आणि संघर्षाची उत्कंठावर्धक कथा दाखवणाऱ्या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित !
जगप्रसिद्ध न्युरोस्पाईन सर्जन डॉ. प्रेमानंद रामाणी (Dr. Premanand Ramani). आपल्या अथक परिश्रमांनी, सेवाभावाने आणि विज्ञानावरील निष्ठेने हजारो रुग्णांना नवजीवन देणाऱ्या या महान व्यक्तीच्या असामान्य जीवनावर आधारित ‘ताठ कणा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा प्रेरणादायी चित्रपट २८ नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. ‘प्रज्ञा क्रिएशन्स’ चे विजय मुडशिंगीकर आणि ‘स्प्रिंग समर फिल्म्स’चे करण रावत यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. लेखन श्रीकांत बोजेवार यांचे असून दिग्दर्शन गिरीश मोहिते यांनी केलं आहे. समर्पण, सेवा, प्रेम आणि प्रामाणिकपणा या चार आधारस्तंभांवर उभा असलेला हा चित्रपट फक्त एका डॉक्टरची कहाणी नाही, तर ती आहे एका माणसाच्या अदम्य जिद्दीची गाथा. डॉ. रामाणी यांनी न्यूरोस्पाईन सर्जरी क्षेत्रात केलेल्या संशोधनामुळे जगभरातील रुग्णांना नवी दिशा मिळाली. हजारो लोकांना वेदनामुक्त करणारी शस्त्रक्रिया त्यांनी शोधून काढली, पण या प्रवासात त्यांना संशय, विरोध आणि संघर्षाचाही सामना करावा लागला. तरीही त्यांनी हार न मानता, आपल्या रुग्णांच्या विश्वासावर आणि स्वतःच्या कर्तृत्वावर आधारित हे मिशन यशस्वी केलं. या असामान्य प्रवासाची गोष्ट ‘ताठ कणा’ या चित्रपटातून मांडली गेली आहे.(Taath Kana Movie Trailer)

नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक अशोक हांडे यांनी या चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आणि हा चित्रपट समाजाला प्रेरणा देणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. या प्रसंगी बोलताना डॉ. प्रेमानंद रामाणी म्हणाले, “माझ्या एका रुग्णाला माझ्यावर चित्रपट करावासा वाटला, ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. माझ्या प्रवासाचं दर्शन घडवण्यासाठी संपूर्ण टीमने घेतलेल्या मेहनतीबद्दल मी कृतज्ञ आहे.”निर्माते रोहन मुडशिंगीकर यांनीही भावना व्यक्त करताना सांगितलं, “रामाणी सरांच्या चिकाटीमुळे आमचं कुटुंब वेदनेच्या संघर्षातून सुखरूप बाहेर आलं. माझ्या वडिलांचं त्यांच्यावर आधारित चित्रपटाचं स्वप्न आज पूर्ण होतंय, हे आमच्यासाठी अभिमानाचं आहे.”

दिग्दर्शक गिरीश मोहिते यांनी या चित्रपटाला उत्तम टीमवर्कचा नमुना म्हणत, “आमच्या सगळ्यांच्या पुण्याईने या चित्रपटाचा भाग होता आलं, ही आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे,” असं सांगितलं. चित्रपटात उमेश कामत यांनी डॉ. रामाणींची भूमिका साकारली आहे. “एका अशा व्यक्तीची भूमिका करायला मिळाली, ज्यांच्या कार्यामुळे असंख्य जीव वाचले, ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे,” असं ते म्हणाले. त्यांच्या पत्नीची भूमिका अभिनेत्री दीप्ती देवी यांनी साकारली असून, त्या म्हणाल्या, “एका डॉक्टरच्या मागे उभी राहणाऱ्या स्त्रीची ताकद दाखवणं ही माझ्यासाठी शिकवणारी आणि भावनिक भूमिका होती.”(Taath Kana Movie Trailer)
=============================
हे देखील वाचा: “लागली पैज?” नाटकातून रुमानी खरे आणि यशोमन आपटे झळकणार एकत्र !
=============================
चित्रपटात सायली संजीव, सुयोग गोऱ्हे, अजित भुरे, शैलेश दातार, अनुपमा ताकमोगे, रवी गोसाई, संजीव जोतांगिया यांसारखे अनेक नामांकित कलाकार झळकणार आहेत. छायांकन कृष्णकुमार सोरेन, संपादन निलेश गावंड, कलादिग्दर्शन महेश कुडाळकर, आणि संगीत अविनाश-विश्वजीत यांचे आहे. ‘ताठ कणा’ हा फक्त एका डॉक्टरचा नाही, तर मानवी जिद्द, धैर्य आणि सेवाभावाचं प्रतीक आहे. २८ नोव्हेंबरला प्रदर्शित होणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनाला स्पर्शून जाईल, यात शंका नाही. कारण शेवटी, धैर्य ताठ कण्याचं असतं, आणि तो कणा डॉ. प्रेमानंद रामाणींच्या कार्याने अधिक मजबूत झालाय.