‘काजळमाया’ मालिकेमुळे ‘या’ 2 मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

डॉ. प्रेमानंद रामाणी यांचा जीवनपट उलगडून दाखवणारा ‘ताठ कणा’ २८ नोव्हेंबरला होणार प्रदर्शित !
डॉक्टर म्हणजे फक्त एक व्यावसायिक नव्हे, तर एखाद्या रुग्णाच्या जीवनाशी जोडलेली आशेची दोरी. प्रत्येक वेळी जेव्हा एखादा रुग्ण मृत्यूच्या दारात उभा असतो, तेव्हा त्याला वाचवण्यासाठी झटणाऱ्या डॉक्टरचीही कसोटी लागते. आणि त्या परीक्षेत जो यशस्वी ठरतो, तोच खऱ्या अर्थाने समाजाचा ‘ताठ कणा’ बनतो. अशाच एका विलक्षण, ध्येयवेड्या आणि संशोधनासाठी जगणाऱ्या डॉक्टरची प्रेरणादायी कथा सांगणारा चित्रपट म्हणजे ‘ताठ कणा’. प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. प्रेमानंद (पी. एस.) रामाणी यांच्या असामान्य जीवनावर आधारित हा चित्रपट २८ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. (Taath Kana Marathi Movie)

‘प्रज्ञा क्रिएशन्स’चे विजय मुडशिंगीकर आणि ‘स्प्रिंग समर फिल्म्स’चे करण रावत यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून, पटकथा आणि संवादलेखन श्रीकांत बोजेवार, तर दिग्दर्शनाची जबाबदारी गिरीश मोहिते यांनी सांभाळली आहे. जगभरात न्यूरोसर्जरी क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे आणि आज वयाच्या ८६व्या वर्षीही ऑपरेशन थिएटरमध्ये सक्रिय असलेले डॉ. रामाणी त्यांच्या आयुष्याचा हा अद्भुत प्रवास पडद्यावर साकारला जाणार आहे. अत्यंत दारिद्र्यातून आलेला, परंतु डॉक्टर होण्याचं स्वप्न डोळ्यांत साठवलेला तरुण परदेशात उच्च शिक्षणासाठी गेल्यावर खोट्या आरोपांमध्ये अडकतो. त्या कठीण प्रसंगातून बाहेर पडून तो परदेशातील मोठी नोकरी नाकारतो आणि मातृभूमीसाठी परत येतो. देशात आल्यानंतरही त्याला मत्सर, संशय आणि विरोधाचा सामना करावा लागतो, पण त्याच निर्धारानं तो अनेकांच्या आयुष्याचा ‘कणा’ बळकट करत राहतो.

त्याच्या संशोधनावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं, समाजानं पाठ फिरवली, तरीही तो थांबत नाही. त्याच वेळी ‘प्रेमा’च्या एका आवाजानं त्याचं आयुष्य नव्या दिशेला वळतं विज्ञान, प्रेम आणि तत्त्वनिष्ठेच्या संगमातून घडते ही संघर्ष आणि आत्मविश्वासाची कथा ‘ताठ कणा’.या चित्रपटात उमेश कामत, दीप्ती देवी, सायली संजीव, सुयोग गोऱ्हे, अजित भुरे, शैलेश दातार, अनुपमा ताकमोगे, रवी गोसाई आणि संजीव जोतांगिया यांसारखे दमदार कलाकार झळकणार आहेत. (Taath Kana Marathi Movie)
==============================
==============================
चित्रपटाचे छायांकन कृष्णकुमार सोरेन, संकलन निलेश गावंड, तर कलादिग्दर्शन महेश कुडाळकर यांनी केले आहे. संगीतकार अविनाश–विश्वजीत, कार्यकारी निर्माते प्रशांत पवार, आणि प्रोडक्शन कंट्रोलर जितेंद्र भोसले असून, या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून साकार झालेला ‘ताठ कणा’ हा केवळ एका डॉक्टरचा प्रवास नसून तो जिद्द, निष्ठा आणि मानवीतेचा सन्मान करणारा चित्रपट आहे.