ताज महाल १९८९ : भूतकाळाच्या कालपटावर रमलेल्या प्रेमाच्या छटा
ऑनलाईन ॲप : नेटफ्लिक्स (Netflix)
पर्व : पहिले
स्वरूप : प्रेमपट
दिग्दर्शक : पुष्पेंद्र नाथ मिश्रा
मुख्य कलाकार : नीरज काबी, गीतांजली कुलकर्णी, शिबा चड्डा, दानिश हुसेन, अनुद सिंग ढाका, अंशुल चौहान, पारस प्रियदर्शन
सारांश : ८०च्या दशकातील भावविश्वात रममाण होत असताना, सिरीज प्रेक्षकांना सोशल मिडिया पलीकडच्या आंबटगोड प्रेमकथांची लज्जत चाखवते. हल्लीच्या इंस्टंट लव्हस्टोरींना बाजूला सारत या प्रेमकथांचा गोडवा प्रेक्षकांच्या मनावर रेंगाळत राहतो.
प्रेम म्हणजे काय असतं? तारुण्यात कॉलेजच्या बाकावर ते फुलत की संसाराच्या रहाटगाड्यात हातातून निसटत? हे प्रेम वय, सामाजिक स्तर, आवडनिवड पाहत विचारपूर्वक ठरतं की पहिल्या नजरेत जडतं? बरं आयुष्यभर एक प्रेम पुरत की पुनःपुन्हा या वाटेवर यायला ते भाग पाडतं? प्रेम कधी परावलंबत्वाचा हट्ट करतं की नदीच्या समांतर काठांवरसुद्धा फुलतं? या आणि अशा अनेक प्रश्नांचे कोडे प्रेमाने कित्येक काळापासून घातली आहेत. कित्येक कवी, लेखक, तत्वज्ञ आपापल्यापरीने या प्रश्नांची उत्तरं शोधायचा प्रयत्न करत आहेत. नेटफ्लिक्सची नवी सिरीज ‘ताज महाल १९८९’ याचं प्रश्नांचा पुन्हा एकदा मागोवा घेते पण ते थेट ८०च्या दशकातील काळात डोकावून. सिरीजच्या शीर्षकगीतात या दशकाच्या काही झलकी दिसायला सुरवात होते आणि मालिका थेट त्या काळात शिरते.
या कथा आहेत लखनऊच्या एका कॉलेजच्या अंगणात गुरफटलेल्या विविध जोडप्यांच्या. कॉलेजमधील फिलॉसोफीचे अध्यापक अख्तर भिग आणि विज्ञानाच्या अध्यापिका सरिता हे यातील पहिलं जोडपं. कॉलेजच्या दिवसांमध्ये त्यांची प्रेमकथा फुलली असली तरी आज लग्नानंतर काही वर्षांनी नवऱ्याला उर्दू शायरी पलीकडचं जग दिसतच नाही, यामुळे आलेल्या दुराव्यावर घटस्फोट हा पर्याय असू शकतो का? हा विचार सरिताला सतावतो आहे तर बायकोच्या मनात असं काही चालू आहे, याचा थांगपत्ताही अख्तरला नाही. अख्तरचा कॉलेजचा मित्र, फिलॉसोफी विषयात प्राविण्य मिळवूनही स्वखुशीने शिलाईकाम स्वीकारणारा सुधाकर आणि त्याने वैश्याविश्वातून बाहेर काढल्यावर स्वाभिमानाने भाजी विकून उदरनिर्वाह करणारी मुमताज या दोघांना आपलं प्रेम सिद्ध करायला लग्नाच्या लेबलची गरज वाटत नाही.
एकीकडे ही आयुष्याच्या चक्रात गुंतलेली जोडपी आहेत तर दुसरीकडे नव्याने प्रेमाच्या संकल्पनेची ओळख करू पाहणाऱ्या कॉलेजतरुणांच्या कथा आहेत. प्रेमाच्या वाटेवर चुकुनही न जाणारा, हुशार पण तितकाच मनमौजी अंगद, यशस्वी प्रेम मिळेपर्यंत या वाटेवर पुनःपुन्हा जायची काहीही हरकत नसलेली रश्मी, आपण करे तो कायदा या तोऱ्यात वावरणारा धरम, कॉलेजमधील साम्यवादी चळवळीत स्वतःला झोकून देणारी ममता हे या प्रेमकथेचे वेगवेगळे पदर आहेत.
सिरीजचं कथानक ८०च्या दशकातील असलं तरी त्याच्या कथांमध्ये वेगळेपण आहे. एकजण मुसलमान आणि एक हिंदू अशी दोन जोडपी आहेत किंवा मध्यमवर्गीय गृहस्थाच वैश्येसोबत संसार मांडणं आहे. रश्मीच्या प्रेमाच्या व्याख्येत शारीरिक जवळीक हाही एक महत्वाचा भाग आहे. जोडप्यामध्ये भांडणं असली, तरी घटस्फोट घेणे हा पर्याय तेव्हाच्या समाजाला मान्य नव्हता हे सरिता आणि तिच्या मैत्रिणीच्या बोलण्यातून येतं. पण स्वतः कमवती असल्यामुळे सरिताला मात्र या पर्यायाचा विचार करायला हरकत नव्हती. उलट नात्यात कटूता येऊनही सरिताची जेम्ससोबतची मैत्री यावर अख्तर कधीच बोट दाखवत नाही. या तेव्हाच्या काळाला नवीन असलेल्या बाबींचा सिरीजमध्ये कुठेही बाऊ केलेला नाही. उलट गोष्टीमध्ये उगाचच फिल्मीड्रामा भरण्याऐवजी नात्यांचे पदर हृवर उलगडण्यावर दिग्दर्शकाचा भर आहे. त्यामुळे सुधाकर आणि मुमताजच्या महत्त्वाच्या क्षणांमध्ये उर्दू शायरीचा सुंदर उपयोग केलेला आहे. वर्ग सुरु असताना लिपस्टिक लावणाऱ्या रश्मीला लिपस्टिक पुसायला लावणाऱ्या सरितालाचं तिच्या आनंदाच्या क्षणी हळूच रश्मीच लिपस्टिक देते. आपलं कुटुंब वाचविण्याचा शेवटचा प्रयत्न म्हणून अख्तर त्याच्याकडची सगळी जमापुंजी वापरून सरिताला घटस्फोट देण्याआधी हनिमूनला नेतो. अंगदचं लक्ष वेधण्यासाठी ममताच वाचनालयात त्याच्याभोवती घुटमळत राहणं असो असे अशा अनेक नाजूक क्षण सिरीजमध्ये टिपले आहेत.
सिरीजमधील कलाकारांची निवडही तितकीच सजकपणे केलेली दिसते. अख्तरच्या वागण्यातला गोंधळलेपणा असो किंवा सरिताच्या वागण्यातील घालमेल नीरज काबी आणि गीतांजली कुलकर्णी यांनी हे भाव अचूक टिपले आहेत. तर शिबा चड्डा आणि दानिश हुसेन यांनी त्यांच्या पात्रातील नात्याचं कवित्व सुंदरपणे रेखाटल आहे. एकीकडे या पोक्त भूमिकांसाठी या अनुभवी कलाकारांची निवड करत असतानाच तरुण पात्रांसाठी तुलनेने नवे चेहरे निवडून दिग्दर्शकाने त्या भूमिकांमधील चंचलता हेरण्याचा प्रयत्न केलेला आहे.
या सगळ्यांचे दुवे एकत्र जोडणारा ताज महाल हा सिरीजच्या शेवटी हळूच डोकावतो. ‘हनिमून’, ‘कॉलेजवयीन प्रेम’, ‘प्रेम थेट व्यक्त करणे’ या संकल्पना समाजासाठी नवीन असण्याच्या ८०च्या दशकात लग्नानंतर नवराबायकोला फिरायला जायच्या ठिकाणांमध्ये ताजमहाल, काश्मिर यांचा समावेश आवर्जून व्हायचा. प्रेमाचे प्रतिक असलेला ताजमहाल पाहण्याची संधी ही कित्येकांना लग्नानंतर जोडीदारासोबतच पहिल्यांदा मिळायची. त्यामुळे सिरीजमध्येसुद्धा ताजमहाल या सगळ्यांसाठी एक प्रतिक म्हणून काम करतो.
कथानक जमेची बाजू असतानाही सिरीजला गालबोट लागलं ते अनियोजित संकलनाचं. सिरीज पाहताना बरेच प्रसंग विनाकारण ताणले आहेत तर काही महत्त्वाच्या क्षणांना मध्येच कात्री दिली आहे. काही प्रसंगांची क्रमवारी गोंधळात टाकते. त्यामुळे काही भागांमध्ये प्रेक्षकांचा हिरमोड होऊ शकतो. तसचं जितका विचार अख्तर – सरिता आणि सुधाकर-मुमताजच्या कथांसाठी केला आहे तितकी नजाकतता तरुणाईच्या कथांमध्ये केलेला दिसत नाही. पण हळूवार प्रेमकथा पहायच्या असतील, तर ही सिरीज चुकवू नका.
माहिती आणि फोटो सौजन्य – नेटफ्लिक्स (Netflix)
मृणाल भगत