‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
सुधीर फडके यांना डावलून ‘या’ गायकाला मिळाली मराठी गाण्याची संधी…
हिंदी सिनेमात आपल्या मखमली स्वराने रसिकांच्या मनात मधाळ गीतांचा खजिना ज्या गायकाने रीता केला त्या तलत महमूद (Talat Mahmood) यांनी मराठीत देखील काही गाणी गायली होती. त्याच्या मराठीतील पहिल्या गाण्याचा किस्सा खूप मजेशिर आहे. १९६१ साली मराठीत एक चित्रपट आला होता ‘पुत्र व्हावा ऐसा’. याचे निर्माते होते दिनकर जोशी आणि दिग्दर्शक होते राजा ठाकूर. दिनकर जोशी प्रदीर्घ काळ दादामुनी अशोककुमार यांचे सचिव असल्याने हिंदी सिनेसृष्टीसोबत त्यांचे अनेकांशी संबंध होते. या चित्रपटाची गाणी पी सावळाराम, बा. भ. बोरकर आणि डॉ वसंत अवसरे (शांता शेळके) यांनी लिहिली होती.
हे वाचलंत का: महेंद्र कपूर आणि आशा भोसले यांचं पहिलं गाणं…
या चित्रपटात विवेक, जीवनकला ही जोडी होती. कथा, पटकथा आणि संवाद पी सावळाराम यांचे होते. भावगीतांच्या दुनियेत पी सावळाराम आणि वसंत प्रभू यांची युती लोकप्रियतेचे नवे मापदंड उभारत होतीच. त्याचाच फायदा होईल हा निर्मात्यांचा हेतू होता. या चित्रपटातील पहिली चार गाणी ध्वनीमुद्रीत झाली होती. नायकावर चित्रीत होणारी दोन गाणी अद्याप व्हायची होती. सिनेमाचा नायक हा, मराठीच्या त्या काळातल्या साचेबध्द चौकटीच्या बाहेरचा असा हा शहरी, मध्यमवर्गीय होता. त्यामुळे त्याच्यावर चित्रीत होणार्या गाण्यासाठी एक वेगळा प्रयोग करावयाचे निर्मात्यांनी ठरवले. यासाठी त्यांनी तलत महमूदला विचारायचे नक्की केले. पण दिग्दर्शक राजा ठाकूर यांना मात्र हि कल्पना फार काही रूचली नाही.
त्यांच्या मनात मात्र या गाण्यासाठी सुधीर फडके (Sudhir Phadke) यांचा आवाज घ्यावा असे वाटत होते. पण निर्मात्यांच्या हट्टापुढे राजाभाऊंचे काही चालले नाही. वसंत प्रभू तलत पहिल्यांदा मराठीत आपल्या संगीतात गाणार म्हणून खूष झाले. तलतला विचारले तो देखील आनंदला फक्त माझ्या शब्दोच्चारासाठी अधिक मेहनत घ्या अशी विनंती त्यानेच निर्मात्याकडे केली. मग प्रभू रोज तलतला घेवून फोर्टच्या एच एम व्ही कार्यालयात जात जिथे तलतची मराठी शब्द उच्चरण्याची शिकवणी घेणार्यात आपले श्रीनिवास खळे (Shrinivas Khale) देखील असायचे.
हे देखील वाचा: मराठीच्या पडद्यावर हिंदी अभिनेत्री
भरपूर रिहर्सल झाल्यावर ते समोरच्या ’ब्रिस्टाल’ हॉटेलमध्ये जेवायला जायचे. तलत त्या काळात मुद्दाम सर्वांशी मराठीत बोलत असे. तलतला मराठी शाकाहारी जेवण आवडत असे. ‘यश हे अमृत झाले’ हे गाणे आधी रेकॉर्ड झाले. त्या पाठोपाठ स्वप्ने मनातली का वार्यावरी उडावी हे युगल गीत (सुमन कल्याणपूरसोबत) देखील तयार झाले. जोशींनी तलतला गाण्याच्या मानधनाबाबत विचारल्यावर मोठ्या दिलाच्या तलतने नम्र पणे नकार देत ‘आपने मेरे लिए मराठी गीतोंका द्वार खोला है यही मेरे लिए बहोत है’ असे म्हणत त्यांच्या प्रती कृतज्ञताच व्यक्त केली.
हा सिनेमा १९६१ साली प्रदर्शित झाला. यातली जिथे सागरा धरणी मिळते, दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती हि सुमनची गाणी देखील खूप लोकप्रिय ठरली. १९६१ सालचे सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचे पारितोषिक तलतला या सिनेमाकरीता मिळाले. तलतने पुढे काही वर्षांनी वसंत देसाई यांच्याकडे ‘मोलकरीण’ चित्रपटासाठी ‘हसले आधी कुणी तू का मी’ हे आशा सोबत गाणे गायले. तलतने मराठीत फार काही गाणी गायली नाहीत पण जितकी म्हणून गायली ती आजही लोकप्रिय आहेत.