Rohini Hattangadi : ‘गांधी’ चित्रपटातील कस्तुरबा गांधी ही भूमिका कशी

तेरी दुनिया से दूर चले होके मजबूर – Mahipal
भारतीय सिनेमाच्या दुनियेत प्रत्येक राज्यातील कलावंतानी अपूर्व असे योगदान दिले आहे. कला आणि संस्कृतीने परिपूर्ण अशा रंगीला राजस्थान या प्रांतातून अनेक गुणी कलाकार या क्षेत्रात आले आणि आपली अवीट छाप सोडून गेले. खेमचंद्र प्रकाश, पंडित इंद्र, पंडित भरत व्यास, बी. एम. व्यास, पंडित शिवराम, जमाल सेन, बसंत प्रकाश, मुबारक बेगम यांच्या सोबतच आणखी एक नाव आहे अभिनेता आणि गीतकार महिपाल (Mahipal) यांचे! दिलीप-राज-देव या सदाबहार त्रिकुटाच्या सुवर्णकाळात आपली कारकीर्द साकारत महिपालने आपली स्वतंत्र ओळख प्रस्थापित तर केलीच शिवाय पौराणिक, पोशाखी आणि जादुई चमत्कारांच्या सिनेमाचा सुपरस्टार अशी प्रेक्षकांवर छांप टाकली.

आपण महिपालला ‘नवरंग’, ’पारसमणी’ या चित्रपटातून ओळखतो पण अशाच टाईपच्या कितीतरी सिनेमांचा तो नायक होता आणि या जॉनरच्या सिनेमाचा एक विशिष्ट प्रेक्षक वर्ग या सिनेमांची कायम वाट पहात असे. आपल्या देशात हा सण, व्रत वैकल्य, जादू टोणा, जादुई चमत्कृती, पोशाखी चित्रपटांचा एकेकाळी मोठा बोलबाला होता. त्या मुळे अशा चित्रपटांची एकेकाळी खूप मागणी असायची आणि अशा सिनेमांचा नायक म्हणून महिपालच्या नावाला एक विशेष वलय होते. काहीशा विस्मृतीत गेलेल्या या अभिनेत्याचे स्मरण!
महिपाल भंडारी (Mahipal) यांचा जन्म २४ डिसेंबर १९१९ रोजी जोधपूर येथील श्रीमंत ओसवाल जैन कुटुंबात झाला. त्याच्या आईचा मृत्यू झाला तेव्हा ते सहा वर्षांचे होते. आपल्या वडिलांचे व्यवसाय कोलकातामध्ये असल्यामुळे, त्यांचे आजोबा त्यांच्या मूळ शहरातील जोधपूर येथे उदयास आले. त्यांच्या आजोबांना पेंटिंग आणि कवितेमध्ये अत्यंत रस होता. ह्यामुळे तरुण महिपालला मोठ्या प्रमाणात प्रभावित केले. महिपाल यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी चौथ्या वर्गात असताना प्रथम रंगमंचावर अभिनय केला. पुढे त्यांनी अभिमन्यू नावाच्या एका नाटकामध्ये भाग घेतला होता आणि मोनो-अॅक्टिंगसाठी सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार मिळविला. नंतर त्यांनी आपल्या शाळेत आणि कॉलेजमधील सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सक्रीय सहभाग घेतला.

कॉलेजमध्ये असताना त्यांचे गणिताचे प्राध्यापक आणि कवी हरनाम दास सेठ यांनी महिपाल (Mahipal) यांच्यातील कलागुण हेरले आणि त्यांना प्रोत्साहन देत भाषेवर प्रभुत्व मिळविण्याचे धडे दिले. महिपाल यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली कविता लिहायला सुरुवात केली. हरिवंश राय बच्चन, महादेवी वर्मा यांच्या सोबत त्यांनी अनेक कवी संमेलन गाजवली. १९३७ मध्ये उदयपूर येथे आयोजित केलेल्या एका कवी संमेलनात भाग घेवून शेतक-यांच्या वेदनेची व्यथा प्राक्त करणारी कविता सादर केली. कवितेचे शब्द होते ‘जो जग को अन्न प्रदान करे’. तेव्हा प्रख्यात कवी पंडित सोनललाल द्विवेदी व्यासपीठावर उपस्थित होते त्यांनी तोंड भरून महिपालच्या या कवितेचे कौतुक केले. राजस्थानातील साहित्य क्षेत्रात या कवितेची जादू आणि तिची छाप प्रदीर्घ काळ राहिली. याचे उत्तम उदाहरण म्हणजे १९९० साली निवृत्त न्यायाधीश आणि खासदार गमनलाल लोढा यांनी संसदेत हीच कविता एकदा प्रश्नोत्तराच्या वेळी वाचली होती आणि संसदेच्या कार्यभारात या कवितेची नोंद झाली.
महिपाल (Mahipal) यांचा रुपेरी प्रवेशाची कथा मजेदार आहे. १९४० च्या दशकाच्या प्रारंभी मिनर्व्हा मूव्हीटोन सोहराब मोदी यांनी संस्थेचे संगीतकार जी पी कपूर आणि दिग्दर्शक पेसी बिलिमोरिया यांना नवीन चेहऱ्याच्या शोधासाठी जोधपूरला पाठवले होते. या दोघांसमोर उमेदवारांची गर्दी उसळली होती. महिपाल अंग चोरून आपल्या कैलाश नावाच्या मित्रासोबत तिथे उभे होते. त्या दोघांच्या नजरेत गर्दीतील महिपालवर नजर पडली आणि त्यांनी तिथल्या त्यांना आगामी सिनेमाच्या नायकाची भूमिका ऑफर केली. अन्य एका भूमिकेसाठी त्यांनी कैलाश (अभिनेते ओम शिवपुरी यांचे जेष्ठ बंधू) या त्यांच्या मित्राची निवड केली. त्यावेळी महिपाल यांचा बी ए चा निकाल आला होता. चित्रपटासाठी त्यांना १२५ रुपये प्रती महिना वेतन मिळणार होते जे त्या वेळच्या मानाने भरपूर होते. घरच्या वरिष्ठांची परवानगी मिळेल की नाही याबाबत ते चिंतेत होते पण त्यांच्या आजोबांनी त्यांच्या सिनेमा प्रवेशाला पूर्ण पाठिंबा दिला. पण इतर नातेवाईक मात्र नाराज झाले. ‘भंडारी खानदानातील लोक आता तवायफ आणि भांड लोकांसोबत नाचणार कां?’ असा कुत्सित सवाल विचारू लागले. पण आजोबांच्या पाठींब्याने महिपाल यांचा सिनेमा प्रवेश सुकर झाला.
=============
हे देखील वाचा : Manoj kumar करीता किशोर कुमारने एकही गीत गायले नाही!
=============
सुरुवातीला लखनौ येथे सराव झाल्यावर त्यांना पुण्याला पाठवले गेले. या सिनेमाची नायिका सुरुवातीला स्वर्णलता होती पण नंतर अनुराधा आली. हिंदीत ‘नजराना’, आणि मारवाडी त ‘निजराणो’ या नावाने हा सिनेमा १९४२ साली झळकला आणि सुपर फ्लॉप झाला. महिपाल पुण्याहून मुंबईला रवाना झाले. तिथे ‘शंकर –पार्वती’ या चित्रपटात कामदेवची भूमिका त्यांच्या वाट्यास आली. या सिनेमासाठी त्यांना ४०० रुपये मिळाले. त्याच वेळी त्यांची भेट राजकमलच्या व्ही शांताराम यांच्याशी झाली. महिपाल (Mahipal) यांची गुणवत्ता पाहून त्यांनी ‘राजकमल कला मंदीर‘मध्ये त्यांना नोकरी दिली.
या संस्थेच्या ‘माली’ (१९४४) या चित्रपटात ‘विष्णू’ची भूमिका केलीच शिवाय सिनेमाचे शीर्षक गीत ‘हम तो भोले भले माली’ हे गाणे देखील लिहिले. संगीत मा. कृष्णराव यांचे होते. नोकरीच्या काळात ते इतर कलाकारांना हिंदीचे सुवाच्च व स्वच्छ उच्चार कसे करावेत हे शिकवित असत. राजकमल च्या ‘अंधो की दुनिया‘ (१९४७), ’बनवासी’(१९४८) या सिनेमात महिपाल (Mahipal) यांनी नायकाची भूमिका केली. मा. विनायक यांच्या सोबत काही काळ काम केले. याच काळात ‘चंद्रमा पिक्चर्स’ च्या ‘आप की सेवा मी’ या सिनेमासाठी गीत लेखनाची संधी मिळाली. यात महिपाल यांनी ८ गाणी लिहिली जी दत्ता डावजेकर यांनी संगीतबध्द केली.
=============
हे देखील वाचा : Raj Kapoor : वर्तमानपत्रातील एका छोट्या बातमीवरून बनवला हा भव्य सिनेमा!
=============
हा महिपाल यांच्या करीता हा सुवर्ण क्षण ठरला कारण लता मंगेशकर यांनी गायलेले पहिले हिंदी चित्रपट गीत याच सिनेमातील होते. हा बहुमान महिपाल यांना मिळाला. ‘पा लागू कर जोरी रे’ हेच ते गाणे ज्या गीताने लताने पार्श्वगायनाच्या कालखंडाचा शुभारंभ केला आणि हे गीत महिपाल यांनी लिहिले. होते.
राजकमलमध्ये वेतनवाढ होत नाही म्हणून महिपाल (Mahipal) यांनी पुन्हा मिनर्व्हा मुव्ही टोन करीता ‘नरसिंह अवतार‘, व ’दौलत’ हे सिनेमे साईन केले. ‘दौलत’ मध्ये त्याची नायिका मधुबाला होती. याच काळात त्यांची भेट होमी वाडीया यांच्या शी झाली आणि त्यांनी त्यांच्या ‘वसंत पिक्चर्स’ च्या ‘गणेश महिमा’ या सिनेमात मध्यवर्ती भूमिका दिली. हा सिनेमा सुपर हिट ठरला. यात मीनाकुमारी त्यांची नायिका होती. पौराणिक सिनेमातील कलाकारांना स्टारचा दर्जा मिळू शकतो हे सिद्ध झाले. ही जोडी नंतर ‘हनुमान पातळ विजय’, ’लक्ष्मीनारायण’, ’अलादिन और जादुई चिराग’ हे सिनेमे आले. आता महिपाल यांना पौराणिक सिनेमा सोबत fantacy सिनेमे पण मिळू लागले. त्या काळात कंबोडिया, जावा-सुमात्रा या पूर्व आशियाई देशात पौराणिक तर अरब आणि इतर आखाती देशात fantacy सिनेमांना खूप मागणी होते. पन्नासचे दशक महिपाल यांनी अशाच असंख्य सिनेमातून भूमिका केल्या.

या दशकाच्या अखेरीस एकदा शांताराम बापू महिपाल यांना भेटले आणि त्यांना विचारले ‘माझ्या आगामी सिनेमात मुख्य भूमिका करणार का आणि मानधन किती घेशील ?’ त्यावर महिपाल म्हणाले ‘माझ्या कलाजीवनाची सुरुवात आणि दिशा आपण दिलीत. मी आपल्याला काय मागणार ? मला फक्त सव्वा रुपया आणि एक नारळ दिला तरी चालेल.’ आणि महिपाल (Mahipal) चा बंपर हिट सिनेमा ‘नवरंग’ १९५९ साली आला. या सिनेमाने भारतीय सिनेमाच्या दुनियेत इतिहास निर्माण केला. यात त्याने साकारलेला कवी रसिकांच्या आजही लक्षात आहे. शांताराम बापूंच्या सिनेमातील नायक कधीच मोठे अभिनेते नसायचे. पण या सिनेमात संध्या इतकाच महिपाल लक्षात रहातो त्यातील गीत-संगीतामुळे! ‘आधा है चंद्रमा रात आधी’, ’तू छुपी है कहा मै तडपता यहां’, ’श्यामल श्यामल वरण‘, ’अरे जा रे हट नटखट’ या गीतांनी बहार आणली. (पण गमंत म्हणजे कवीची भूमिका करणाऱ्या महिपाल यांना स्वत: कवी असूनही यातली गाणी लिहिता आली नाही ती लिहिली होती भरत व्यास यांनी)
=============
हे देखील वाचा : Madhumati : मधील हे गाणे बिमल रॉय यांनी का अर्धवट चित्रित केले?
=============
होमी वाडीया यांचा ‘जबक’ १९६१ साली प्रदर्शित झाला. यात महिपालची नायिका श्यामा होती. या पोशाखी सिनेमातील गाणी खूप गाजली. संगीत चित्रगुप्त यांचे होते. ‘तेरी दुनियासे दूर चाले होके मजबूर हमे याद रखना‘ हे गाणे त्या काळी तरुणांच्या विश्वात खूप लोकप्रिय ठरले होते. महिपाल (Mahipal) यांचा आणखी एक यशस्वी सिनेमा १९६३ आला. हा सिनेमा होता बाबूभाई मिस्त्री यांचा ‘पारसमणी’. यात त्याची नायिका होती गीतांजली. या जादुई, fantacy सिनेमाचे संगीतकार होते लक्ष्मीकांत प्यारेलाल. या जोडीचा हा पहिलाच सिनेमा होता. यातील गाणी आजही लोकप्रिय आहेत. ‘हंसता हुआ नुरानी चेहरा’, ‘रोशन तुम्हीसे दुनिया रौनक तुम ही जहा की सलामत रहो सलामत रहो‘, ’मेरे दिल में हल्कीसी एक कशिश है’, ’उई मा उई मा ये क्या हो गया’, ’वो जाब याद आये बहुत याद आये’, ’चोरी चोरी जो तुमसे मिले तो लोग क्या कहेंगे’ या गाण्यांनी सिनेमा सुपर डुपर हिट ठरला.
सत्तरच्या दशकापासून मारधाड सिनेमाचे युग सुरू झाले त्यामुळे धार्मिक, पौराणिक सिनेमांची संख्या झपाट्याने घडू लागली. महिपाल यांनी काळाची पावले ओळखली आणि स्वत:ला मायावी दुनियेपासून अलग करून घेतले. त्यांचा शेवटचा गाजलेला सिनेमा ज्याने ‘शोले’ ला टक्कर दिली होती तो ‘जय संतोषी माता‘ होता ज्यात त्यांची महर्षी नारद यांची भूमिका होती. महिपाल (Mahipal) फार काही ग्रेट अभिनेते वगैरे कधीच नव्हते. याची त्यानांही जाणीव होती. एकीकडे राम, विष्णू,नारद , शंकर असा भूमिका तर दुसरीकडे अलिबाबा, अल्ल्लौद्दिन अशा भूमिका. आलेली प्रत्येक भूमिका त्याने प्रामाणिक पणे केली. निवृती नंतर मुंबईत मरीन लाईन्स परिसरात फिल्मी प्रतिमा विसरून सर्वसामान्य आयुष्य ते जगले. १५ मे २००५ या दिवशी वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.