दिग्दर्शनाचा कोर्स पूर्ण केलेल्या कलाकार बनला अभिनेता !
सिनेमाच्या दुनियेत काहीजण अभिनय करायला येतात पण डायरेक्टर म्हणून यशस्वी होतात (सुभाष घई) तर काही जण आपल्या करिअरची सुरुवात दिग्दर्शक म्हणून करतात पण नंतर नायक म्हणून यशस्वी होतात (फरहान अख्तर) काही जण सिनेमात नायक म्हणून येतात आणि खलनायक म्हणून यशस्वी होतात (प्रेमनाथ) तर काहीजण गायक म्हणून आपलं करिअर सुरु करतात आणि नायक बनण्याचा अयशस्वी प्रयत्न देखील करतात.
(मुकेश,तलत, शैलेंद्र सिंग) सिनेमातील हा प्रवास मोठा भुलभुलय्याचा आहे. कधी कुणाला कुठली भूमिका करायला लागेल काही सांगता येत नाही. हिंदी सिनेमातील ख्यातनाम अभिनेते बलराज साहनी यांचा मुलगा परीक्षित साहनी याच्याबाबत देखील असेच काही झाले. तो खरंतर आला होता सिनेमामध्ये दिग्दर्शन करायला. पण त्याला सिनेमात अभिनेता म्हणून स्वीकारले गेले. खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. आजची पिढी परीक्षित साहनी ला थ्री इडीयट्स, पी.के. या चित्रपटातील भूमिकांमधून ओळखते. (Parikshit Sahni)
परीक्षित साहनी (त्यांचे मूळ नाव अजय सहानी) यांचा जन्म एक जानेवारी १९४४ रोजीचा. त्यांचे वडील अभिनेता बलराज सहानी तसेच काका लेखक भीष्म सहानी दोघेही डाव्या विचारसरणीचे. त्यामुळे लहानपणापासून मनावर संस्कार हे कम्युनिस्ट विचारसरणीचेच झाले. जेव्हा शालेय शिक्षण संपले तेव्हा साहजिकच पुढील करिअरचा जेव्हा प्रश्न निर्माण झाला.
तेव्हा आर्किटेक्चर करण्यासाठी परीक्षित साहनी रशियाला गेले. परंतु तिथे आर्किटेक्चरचे ऍप्टिट्यूट टेस्टमध्ये मॅथेमॅटिक्स मध्ये कमजोर असल्यामुळे त्यांना तिथे प्रवेश मिळाला नाही. मग त्यांनी आपल्या वडिलांच्या क्षेत्रात काम करायचे ठरवले आणि रशियामध्येच फिल्म डायरेक्शन चा कोर्स त्यांनी पूर्ण केला. सिनेमा दिग्दर्शनाचा कोर्स पूर्ण केल्यानंतर १९६६ साली परीक्षित साहनी भारतात परत आले. इथे आल्यावर त्यांनी आपल्या पहिल्या सिनेमाची तयारी सुरू केली. वडील बलराज सहानी यांनी पंजाब मधील लोकप्रिय लेखक नानक सिंग यांचे एक पुस्तक त्यांच्या हातात दिले आणि सांगितले ,” या पुस्तकावर एक स्क्रिप्ट तयार कर यावर तुला चांगला चित्रपट बनवता येईल.” परीक्षित साहनी यांनी ती कादंबरी म्हणून वाचली आणि दोन वर्षे मेहनत करून त्याची स्क्रिप्ट लिहून ठेवली. (Parikshit Sahni)
या दरम्यान त्यांना राज कपूर यांच्याकडून एक ऑफर आली. ‘मेरा नाम जोकर’ या चित्रपटात त्यांना सहाय्यक म्हणून काम करण्याची ! ‘मेरा नाम जोकर’ या सिनेमांमध्ये रशियन सर्कस आणि रशियन अभिनेत्री देखील काम करत होती. परीक्षित साहनी तिथे राहिल्यामुळे रशियन भाषेचे बऱ्यापैकी ज्ञान झाले होते. ही ऑफर ते स्वीकारणार होते परंतु त्याचवेळी त्यांच्या वडिलांचे मित्र असित सेन त्यांच्या घरी आले आणि त्यांनी परीक्षित साहनी यांना ‘अनोखी रात’ या चित्रपटात अभिनय करण्याची संधी दिली. खरं तर अभिनय परीक्षित साहनी यांना करायचा नव्हताच परंतु वडिलांनी खूप आग्रह केल्यामुळे त्यांनीही छोटीशी भूमिका करायला होकार दिला. या चित्रपटाच्या दरम्यानच संजीव कुमार यांनी त्यांना त्यांचे मूळचे अजय सहानी हे त्यांचे मूळ नाव बदलून परीक्षित साहनी हे नाव घ्यायला सांगितले. ‘अनोखी रात’ चित्रपट प्रदर्शित झाला त्याला माफक यश मिळाले. (हा संगीतकार रोशन यांचा शेवटचा चित्रपट ठरला. या चित्रपटाचे संगीत देत असतानाच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.)
तोवर बलराज साहनी यांच्याकडून आपल्या मुलाने लिहिलेल्या स्क्रिप्ट वरील चित्रपट बनवण्यासाठी प्रोडूसर शोधण्याचे काम चालू केले होते. एक निर्माता त्यांना मिळाला. त्याने सिनेमाला फायनान्स करायची कबूल केले. पण अट एक घातली की ,”या चित्रपटाचे दिग्दर्शन राजेंद्र भाटीया करतील. तुमच्या मुलाने या सिनेमात प्रमुख नायकाची भूमिका करावी.” परीक्षित ने याला साफ नकार दिला. “ज्या सिनेमाची स्क्रिप्ट मी दोन वर्षे मेहनत करून लिहिली आणि जो चित्रपट मला माझ्या स्टाईलने दिग्दर्शित करायचा होता तो चित्रपट मी दुसऱ्याकडे कसा देऊ?” त्यावर त्यांचे वडील बलराज साहनी म्हणाले,” बेटा , कदाचित तुझ्या नशिबात अभिनय हेच क्षेत्र लिहिले गेले असेल त्यामुळे याला नकार देऊ नकोस. चांगला तुझ्या आवडीच्या विषयावरचा चित्रपट येतो आहे त्यात तू स्वतः नायक आहेस. त्यामुळे या चित्रपटात तूच काम कर!” परीक्षित ने मोठ्या नाराजीने काम करायचे ठरवले. यात त्यांची नायिका तनुजा होती. (Parikshit Sahni)
============
हे देखील वाचा : अमिताभ बच्चन यांचा बंगाली सिनेमा ‘अनुसंधान’ पाहिलात का?
============
या चित्रपटातील गाणी प्रेम धवन यांनी लिहिली होती. यातील परीक्षित वरील चित्रित एक गाणं जे किशोर कुमार ने गायलं होतं ‘तेरी दुनिया से होके मजबूर चला मै बहुत दूर बहुत दूर चला…’ आज देखील लोकप्रिय आहे. नंतर परीक्षित सहानी दिग्दर्शनाच्या ऐवजी अभिनयातच रंगून गेला. ऐंशी आणि नव्वद च्या दशकात चरित्र अभिनेता म्हणून त्यांनी स्वतःची चांगली ओळख निर्माण केली. दूरदर्शनवरील काही मालिकांमधील त्यांचा अभिनय आज देखील प्रेक्षकांना आठवतो. अशा प्रकारे दिग्दर्शनाचा कोर्स पूर्ण करून आल्यानंतर दिग्दर्शक होण्याऐवजी परीक्षित ला नाईलाजाने अभिनेता व्हावे लागले!