कडक शिस्तीच्या मास्टरजी
श्रीदेवी ते माधुरी आणि ऐश्वर्या ते करिना यांना आपल्या तालावर थिरकायला लावणार हिंदी चित्रपटसृष्टीला लाभलेलं नृत्यातलं नाव म्हणजे दिवंगत नृत्यांगना सरोज खान. २००० पेक्षा जास्त गाणी, जवळपास २००-२५० चित्रपट आणि असंख्य कलाकारांना नृत्याचे धडे सरोज खान यांनी आजपर्यंत दिले. त्यांच्या प्रवासाचा हा मागोवा.
निंबुडा-निंबुडा, एक-दोन तीन, डोला रे डोला, काटे नही कटते, हवा-हवाई, ना जाने कहा से आई है, दिल धक धक करने लगा, हमको आजकल है इंतजार, चोली के पीछे ही गाणी आज ऐकली तरी डोळ्यापुढे त्यातील नृत्याविष्कार आपल्यासमोर उभे राहतात. या मागचा चेहरा म्हणजे सरोज खान. आपल्या वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून त्यांना नृत्याची आवड होती. तेव्हापासूनच एक नृत्यांगना म्हणून त्यांचा प्रवास सुरु झाला होता. मात्र पुढे एक नृत्यांगना असण्याबरोबरच त्यांनी स्वतःला एक नृत्यदिग्दर्शक म्हणून तयार केले आहे त्याचा फायदा बॉलिवूडला झाला. गाण्यांमुळे आणि त्यावरील नृत्याविष्कारामुळे चित्रपट यशस्वी होण्यामध्ये सरोज खान यांचा मोठा हात आहे. सरोज खान यांनी तेजाब, खलनायक, मिस्टर इंडिया, चालबाज, नगीना, चांदनी, हम दिल दे चुके सनम, देवदास सारख्या प्रसिद्ध सिनेमासाठी कोरियाग्राफी केली होती.
अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या कलंक चित्रपटासाठीही त्यांनी काम केलं होतं.सरोज खान यांचे शेवटचे गाणं कलंक सिनेमातीत तबाह हो गए यासाठी कोरियोग्राफर केले होते. या गाण्यात माधुरी दिक्षित यांनी नृत्यप्रस्तुती केली होती.
अभिनयाप्रमाणेच कलाकारांना नृत्यसुद्धा यायला हवे. नृत्य हासुद्धा एक महत्त्वाचा घटक आहे असं त्या मानत असतं. कित्येक बॉलिवूड अभिनेत्रींना त्यांनी बॉलिवूड तसेच पारंपारिक नृत्याचे धडे याच विचारातून दिले. १९७४ मध्ये गीता मेरा नाम या चित्रपटापासून त्यांना नृत्यदिग्दर्शक ही ओळख मिळाली. पुढे वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी सरोज खान टच आपल्या नृत्यातून दाखवला.
बॉलिवूड नृत्यासाठी माधुरी दिक्षित हिने सरोज खान यांना आपलं गुरू मानलं आहे. तेजाब या चित्रपटापासून माधुरी दीक्षित हिने सरोज खान यांच्यासोबत काम केलं. त्यावेळी माधुरीला नृत्य शिकण्याचा सल्ला त्यांनी दिला आणि तिच्याकडून पूर्ण तयारीसुद्धा करून घेतली. बॉलिवूडमधील आपल्या नृत्याचे श्रेय माधुरी दीक्षितने सरोज खान यांना दिले आहे.
कलाकारांनी परफेक्ट असावे, स्टेप्स योग्यच व्हाव्यात यासाठी वाटेल तितकी मेहनत घेण्याची त्यांची तयारी होती. रेफ्युजी चित्रपटाचाही असाच किस्सा आहे. अभिनेत्री करिना कपूर हिची रात्री १ वाजेपर्यंत तालीम सरोज खान यांनी करून घेतली होती. शिवाय ए लडकी ये क्या कर रही है, जरा हात पैर हिला असा ओरडासुद्धा त्यांनी करिना कपूर हिला दिला होता. एक्सप्रेशन आणि इतर अनेक बाबतीतही त्यांनी आघाडीच्या अभिनेत्रींना मार्गदर्शन केले आहे. आपल्या संपूर्ण प्रवासात त्यांनी कधीच शिस्तीशी तडजोड केली नाही.
जब वी मेट या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शनाचा राष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळाला होता. २००२ मध्ये देवदास या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार तसेच फिल्मफेअर पुरस्कार, गुरू या चित्रपटासाठी फिल्मफेअर मिळाला होता. २००१ मध्ये आलेल्या आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित लगान या चित्रपटातील नृत्य दिग्दर्शनासाठी त्यांना अमेरिकन कोरिओग्राफी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.
३ जुलै २०२० रोजी श्वसनाच्या त्रासाने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले होते. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.