‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
‘द डिसायपल’
चैतन्य ताम्हाणे म्हटलं की 2014 मध्ये आलेला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘कोर्ट’ आठवतो. विविध फिल्म फेस्टिव्हलमध्ये 18 पुरस्कार जिंकणारा ‘कोर्ट’ हा एक कोर्टरूम ड्रामा चित्रपट होता. चैतन्य ताम्हाणे या तरूण दिग्दर्शकाचं नाव तेव्हा बरंच गाजलं. वयाच्या अगदी सतराव्या वर्षीच जाहिरात लेखन करणारा हा तरूण वयाच्या 30 -32 व्या वर्षापर्यंत दोनदा मराठी सिनेमाला आंतरराष्ट्रीय व्यासपीठापर्यंत नेणारा ठरला. याच दिग्दर्शकाचा यावर्षी आलेल्या ‘द डिसायपल’ या चित्रपटानेही यशाचं नवं दार ठोठावलं. आंतरराष्ट्रीय चित्रपट समीक्षा संघाकडून उत्कृष्ट पटकथा व सिनेमॅटोग्राफीसाठी तर पुरस्कार भेटलाच, पण चित्रपट क्षेत्रात महत्तवपूर्ण समजल्या जाणाऱ्या व्हेनिस चित्रपट महोत्सवातही समीक्षा पुरस्कार चित्रपटाने पटकावला. मान्सून वेडिंग या 2001 मध्ये आलेल्या मीरा नायरच्या चित्रपटानंतर तिथे स्पर्धा करण्यासाठी पोहोचलेला हा पहिलाच चित्रपट आहे!
भारतीय शास्त्रीय संगीताचे उत्तर भारतीय / हिंदुस्थानी व कर्नाटकी संगीत असे दोन प्रकार पडतात. शास्त्रीय गायनात पंडित भीमसेन जोशी ,पंडित जसराज ,उल्हास कशाळकर ,उस्ताद राशीद खान ,किशोरी आमोणकर ,वसंतराव देशपांडे ,पंडित जितेंद्र अभिषेकी ,प्रभा अत्रे यांपासून ते सध्याचे महेश काळे ,राहुल देशपांडे यांच्यापर्यंत अनेकांच्या गायनाचा आस्वाद आपण घेतलाय. 2015 मध्ये प्रदर्शित झालेला सुबोध भावे दिग्दर्शित ‘कट्यार काळजात घुसली’ हा चित्रपट पण शास्त्रीय संगीतानं भरलेल्या मैफिलींचा नजारा कथेत गुंफून आपल्यापुढे ठेवतो. पण ते तितकं विस्तारित स्वरूपात आणि जाणकार प्रेक्षकांसाठी परिपूर्ण नाही पण ‘द डिसायपल’ हा चित्रपट अगदी डिटेलमध्ये या विषयाचं कथानकाच्या अनुषंगाने चित्रण करतो.
कथेची सुरूवात होते शरद नेरूलकर ( आदित्य मोडक ) या ज्येष्ठ उत्तर भारतीय शास्त्रीय संगीत / हिंदुस्थानी संगीत गायक विनायक प्रधान ( डॉ.अरूण द्रविड ) यांच्या शिष्यापासून. शास्त्रीय संगीतात आपणही परमोच्च स्थान गाठावं , प्रगती करावी असं त्याचं ध्येय असतं. यासाठी त्याची मेहनत सुरू असते.यासाठी तो त्याच्या वडिलांच्या गुरू सिंधुताई जाधव ऊर्फ माई यांच्या दुर्मिळ संग्रहित कॅसेट्स पण ऐकत असतो. त्यातलं तत्वज्ञान ,त्यातलं तंत्र आत्मसात करण्याचा प्रयत्न तो करत असतो.यामध्ये तो वारंवार अयशस्वी होताना दिसतो. या कारणामुळे साहजिकच तो बैचेन ,अस्वस्थ असलेला दिसतो. काही वर्षानंतर मग त्याचं ऊर्वरित आयुष्य दाखवलं जातं ज्यात त्याचा संघर्ष आधीपेक्षा अधिकच तीव्र होत जातो.
कथेच्या बाबतीत बोलायचं तर चैतन्य ताम्हाणेंनी ती सुंदररित्या लिहिली आहे. कथेच्या दोन्ही भागात कसलीही गती कमी होत नाही किंवा कथा भरकटत नाही. कथेतला समतोल छानपैकी जमून आला आहे.प्रकाशयोजनेतून दिसून येणारा पिवळ्या तपकिरी रंगाचा वापर कथेतलं गांभीर्य टिकवून ठेवण्यास मदत करतं. द आर्ट ऑफ लिव्हिंग ( 2017 ) , कॉनवॉय ( 2017 ) या पॉलिश चित्रपटाचे सिनेमॅटोग्राफर मायकल सोबोसिन्सकी यांनी या चित्रपटाचं छायाचित्रण केलंय. चिल्ड्रन ऑफ मेन ,रोमा या चित्रपटांचे दिग्दर्शक अल्फोन्सो क्युरॉन यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. एकूणच कलाकार म्हणून सर्व नवीन चेहरे चित्रपटात दिसले तरी तंत्रज्ञ म्हणून सर्व दिग्गज कलाकार यात आहेत. अभिनेत्री, दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचा आवाज माईंच्या पात्राच्या रूपाने आपल्याला ऐकायला मिळतो. जयपूर – अत्रौली घराण्याचे ज्येष्ठ शास्त्रीय गायक डॉ.अरूण द्रविड यांनी विनायक प्रधान यांची भूमिका निभावली आहे. आदित्य मोडक या नवीनच असलेल्या अभिनेत्याचाही सुंदर अभिनय यात बघायला मिळतो.
चैतन्य ताम्हाणेंनी काही काळ अल्फान्सो क्युरॉन यांच्या ‘रोमा’ या चित्रपटासाठी साहाय्यक म्हणून काम केलंय. त्यांच्या सहवासात राहून बऱ्याच गोष्टी आत्मसात करता आल्या असं ते सांगतात. चित्रपटात बऱ्याच बंदिशी ,रागांनी शुद्ध स्वरूपात श्रवण सुख देणारं अस्सल शास्त्रीय संगीत ऐकायला मिळतं त्यासाठी त्यांनी भारतभर फिरून बरीच माहिती मिळवली ,मुलाखती घेतल्या. कोर्ट चित्रपटासाठी त्यांनी जवळपास आठ ते दहा महिन्यात 1800 ऑडिशन्स मुख्य भूमिकेतील पात्रांसाठी घेतल्या होत्या परंतु यात त्यापेक्षा जास्त ऑडिशन्स त्यांनी घेतल्या असं ते म्हणतात. शास्त्रीय गायक असणारे परत मराठी बोलता येणारे कलाकार शोधणं हे एक आव्हान यासाठी होतं. त्यातच अव्यावसायिक अभिनेत्यांकडून अभिनय करवून घेणं हेही तितकंच अवघड पण कोर्टनंतर याही चित्रपटात त्यांनी ते साध्य करून दाखवलं. शरदचं काही वर्षानंतरचं पात्र दाखवताना त्यात झालेला बदल हा थक्क करणारा आहे अगदी खराखुरा शारिरीक बदल त्यांनी दाखवलाय. शास्त्रीय संगीताबद्दल या चित्रपटात माईंच्या म्हणण्यानुसार ,शास्त्रीय संगीत हे परमात्म्यापर्यंत जाण्याचा मार्ग आहे असं म्हटलं जातं. यात कोणीही सहज यशस्वी होऊ शकत नाही.या साधनेचा मार्ग वाटतो तितका साधा नाही. यावर चालण्यासाठी मन आणि मेंदूवर नियंत्रण असणं गरजेचं आहे.या मार्गावर अनेक काटेकुटे आहेत. अनेक अडचणी आहेत.त्यामुळे त्यातून मार्ग काढणं आणि परमोच्च सुखापर्यंत पोहोचणं बरंच कठीण आहे परंतु जर सातत्य राखलं तर अशक्यही नाही. कथेतला नायक हा असंच यश प्राप्त करण्यासाठी प्रयत्नरत आहे. त्यासाठी हवं ते करण्याची त्याची तयारी आहे पण अपेक्षित यश न मिळणं आणि शास्त्रीय संगीताबद्दल समाजात नसलेली तितकी आवड आणि बॉलिवूड व इतर पाश्चात्य शैलींमधल्या संगीताबद्दल लोकांमध्ये असलेलं फॅड चित्रपटात दाखवलं जातं.
एका कलाकाराला सामाजिकदृष्ट्या किती अडचणी झेलाव्या लागतात आणि अगदी न्यायव्यवस्थेकडूनही त्याच्यावर अनाहूतपणे अन्याय होतो ही गोष्ट ताम्हाणेच्या ‘कोर्ट’मध्ये दिसते तर भारतीय समाजात नामशेष होत जाणाऱ्या शास्त्रीय गायकांची अवस्था आणि स्वतःप्रती अपेक्षित असलेल्या आकांक्षाचंही प्रभावी चित्रण सदरील चित्रपटातून होतं. नायकाला लहानपणापासूनच शास्त्रीय संगीताचे मिळालेले धडे ,वडिलांकडून मिळालेला वारसा यातून त्याच्या मनात निर्माण झालेली ती ईच्छा ,ते वेड ,गुरूंप्रती व संगीताविषयी असलेलं समर्पण कथेतून दिसतं. या कला आणि कलाकार या दोन्ही संकल्पनांच्या पलीकडे जाऊन बघायचं झाल्यास एक माणूस कशाप्रकारे आपल्या अपेक्षांना ,स्वप्नांना पूर्ण करायचा प्रयत्न करतो व त्यात आलेल्या अडचणींमुळे कशाप्रकारची निराशा त्याच्या मनात निर्माण होते हे डिसायपलमधून दिसतं.
‘द डिसायपल’ अजून कोणत्याही माध्यमावर आलेला नाही. लवकरच तो ऑफिशियलरित्या प्रदर्शित होईल आणि टिव्हीवर किंवा ओटीटी माध्यमावर येईल. गुरू – शिष्य नात्यावर आजपर्यंत अनेक चित्रपट आपण पाहिलेत ,शास्त्रीय संगीतावर बनलेलेही अनेक चित्रपट आपण पाहिलेत पण कला – कलाकार आणि एक माणूस या परिप्रेक्ष्यातून त्या भावनिक ,मानसिक अवस्थेचं चित्रण करणारा ताम्हाणेंचा हा सिनेमा आवर्जून बघण्यासारख्या मराठी चित्रपटांपैकी एक ठरतो.
- ऋषिकेश तेलंगे