महाराणी येसूबाईंच्या भूमिकेतले अमृता खानविलकरचे फोटो व्हायरल
हेमाला एकमेव फिल्म फेअर पुरस्कार मिळवून देणारा सिनेमा
काही सिनेमाच्या मेकींगच्या कथा फार मनोरंजक असतात. एखादा कलाकार काही कारणाने एखादी भूमिका नाकारतो. ती भूमिका ज्याच्याकडे जाते तो कलावंत त्या भूमिकेचं सोनं करतो. नाकारलेल्या कलाकाराला कायम चुटपूट लागून जाते. रमेश सिप्पी ज्यांना आपण महामूव्ही ’शोले’चे दिग्दर्शक म्हणून ओळखतो त्यांचा ’शोले’च्या आधीचा सिनेमा होता ’सीता और गीता.’(Hema Movie)
या सिनेमाची प्रेरणा मार्क ट्वेन यांच्या ’द प्रिंस अॅंड द पॉपर’ या कथानकावर होती. याच कथानकावरून याआधी दिलीपकुमारचा ’राम और शाम’ हा सिनेमा बनला होता व सुपर हिट ठरला होता. याच कथानकावरून पण नायिकेला केंद्र स्थानी ठेवून त्यांना सिनेमा बनवायचा होता. खरंतर नायकप्रधान काळात असे सिनेमे बनवणे हा एक धोका होता पण तरी त्यांनी सतीश भटनागर यांच्या कथेवर सलीम जावेद यांना पटकथा – संवाद लिहायला सांगितले.
१९७१ सालच्या ‘अंदाज’ पासून रमेश सिप्पी यांनी दिग्दर्शना्ची सूत्रे हाती घेतली. या सिनेमात त्यांना त्या काळची लोकप्रिय तारका मुमताजला डबल रोलमध्ये घ्यायचे होते. पण तिने अव्वाच्या सव्वा रक्कम सांगितल्याने त्यांचा नाईलाज झाला पण सिनेमा बनवताना त्यांच्या डॊळ्यापुढे मुमताजच होती. मुमताजने नकार दिल्यावर त्यांचा नायिकेचा नव्याने शोध सुरू झाला. (Hema Movie)
त्यावेळी ‘अंदाज’चे डबिंग करायला हेमा येत असे. त्यांनी तिला या आगामी प्रोजेक्टबाबत विचारले तेव्हा तिनेही फारशी उत्सुकता दाखवली नाही पण सलीम जावेदची भन्नाट पटकथा बघून ती तयार झाली. नायकाच्या एका भूमिकेत धर्मेंद्र आणि दुसर्या नायकाच्या भूमिकेसाठी ज्युबिलीकुमार राजेंद्रकुमारला घ्यायचे त्यांच्या मनात होते.पण या नायिकाप्रधान सिनेमात मला काहीच वाव नाही असे म्हणत राजेंद्रने भूमिका नाकारली ती वाट्याला आली संजीवकुमारच्या ! याचे संगीत आधी शंकर जयकिशन देणार होते पण जयकिशनच्या निधनानंतर ते आले पंचमकडे ! (Hema Movie)
हेमाने दोन्ही भूमिका जबरदस्त केल्या. गीताच्या भूमिकेतील तिचा जिप्सी पेहराव,लेहंगा,आरशाच्या चमकणार्या तुकड्यांचा ब्लाऊज,तिचं बोलण्याचं बेअरींग अफलातून होतं. धर्मेंद्र साठी मन्नाडे आणि संजीव साठी किशोर अशी स्वररचना की गेली.हवा के साथ साथ घटा के संग संग,जिंदगी है खेल कोई पास कोई फेल,कोई लडकी मुझे कल रात सपनो मे या गाण्यांनी धुम केली.यातील मनोरमाच्या भूमिकेचे कौतुक करायला हवे तिची बेरकी पाताळयंत्री भूमिका कोण विसरेल ? यातील संवादावर पब्लिक खूष असायची.
==========
हे देखील वाचा : ‘या’ कपूरने आर के फिल्म्स मध्ये काम करायला दिला नकार
==========
सिलींग फॅन ला लटकलेल्या हेमाला मनोरमा म्हणते ’नीचे आ बेटी’ त्यावर हेमा म्हणते ’उपर आ मोटी’.या भूमिकेसाठी हेमाला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.(संपूर्ण कारकिर्दीत तिला मिळालेला एकमेव फिल्मफेअर पुरस्कार) १९७६ साली हा सिनेमा रशियात प्रदर्शित केला तिथेही सुपर हिट ठरला.या सिनेमाच्या यशाने अशा सिनेमांची चलती सुरू झाली.जैसे को तैसा (जितेंद्र) चालबाज (श्रीदेवी) किशम कन्हैय्या (अनिल कपूर), जुडवा (सलमान) डुप्लीकेट (शाहरूख) कुछ खट्टी कुछ मीठी (काजोल).अनेक भाषातून यावर सिनेमे निघाले. आपल्या मराठीत १९७९ साली ’चोरावर मोर’ याच कथानकावर होता त्यात उषा चव्हाण दुहेरी भूमिकेत होती. एवढी सोन्या सारखी भूमिका नाकारल्याचा मुमताजला बरेच दिवस पश्चाताप झाला !