मराठीतील पहिला लोकप्रिय रहस्यपट : पाठलाग
मराठी चित्रपटाच्या सुवर्णकाळातील दशकातील जिनियस दिग्दर्शक म्हणजे राजाभाऊ परांजपे. कौटुंबिक पट यशस्वी होत असताना त्यांनी १९६४ साली एक रहस्यमय मराठी चित्रपट (Mystery Film) दिग्दर्शित केला आणि सर्वाना चकीत केलं. काही तरी वेगळं करण्याच्या ध्यासातून त्यांनी हा प्रयोग केला. मराठी सिनेमाच्या इतिहासातील हा अभिनव प्रयोग त्यांना त्या वर्षीचे राष्ट्रपती पदक मिळवून गेला! मराठीतील त्यांचा हा चित्रपट (Mystery Film) अफाट गाजला. याच कथानकावर काही वर्षांनी हिंदीत सिनेमा बनला व तो देखील सुपर हिट ठरला. राजाभाऊंचा हा करीष्मा अफाट होता. हा मराठी चित्रपट (Mystery Film) होता ’पाठलाग’. प्रसिद्ध कथा लेखक जयंत देवकुळे यांची एक कथा त्यांच्या वाचनात आली तिचे शीर्षक होते ’आशा परत येते’. ही कथा त्यांना प्रचंड आवडली. ती कथा घेऊन त्यांनी तडक गदीमांना गाठले. गदीमांनी देखील पसंतीची मान डोलावल्यावर मग पटकथा, संवादाची जबाबदारी त्यांच्यावरच पडली. या सिनेमाला एक नैसर्गिक वेग होता. ज्या पत्नीचे अंत्यसंस्कार आपण स्वत: केले तीच पत्नी काही दिवसांनी समोर येऊन उभे राहते. काय म्हणायचे याला? काय असते रहस्य? खरंच तिचा मृत्यू झालेला असतो कां? सिनेमातील कोर्टसीन, तिथले बारकावे, डावपेच याने सिनेमा अत्यंत उत्कंठावर्धक, रहस्यमय आणि रंगतदार बनला.
या सिनेमाच्या मेकींगच्या वेळी राजाभाऊंना नायिकेची दुहेरी भूमिका सीमा देवला द्यायचे ठरवले होते. पण तोवर तिचे रमेश देव सोबत लग्न झाले होते. त्यामुळे केवळ रमेश नायक असेलच तरच काम करेल अशी तिने घोषणा केली होती. तरी देखील राजाभाऊंनी तिला विचारल्यावर तिने राजा भाऊ यांना ’तुमच्याकडे काम करायचे म्हटल्यावर रमेश नाही म्हणणार नाहीच तरी मला एकदा त्याला विचारले पाहिजे.’ असे उत्तर दिल्यावर मात्र राजाभाऊंचा ‘इगो’ काहीसा दुखावला. ज्या अभिनेत्रीला आपण घडवले तिनेच असे उत्तर द्यावे याचा त्यांना थोडा राग आला व अगदी नवीन अभिनेत्रीला घ्यायचे ठरवले. त्या वेळी अशोक ताटे त्यांचे सहायक होते. त्यांची पत्नी सुमन ताटे हिला अभिनयाची आवड होती. एक दोन छोटी कामे तिने केली होती. राजाभाउंनी ठरवले ही भूमिका सुमनलाच द्यायची. नायकाच्या भूमिकेत त्या काळचा रंगभूमीवरचा बादशहा डॉ. काशिनाथ घाणेकरला घ्यायचे नक्की केले. नाटकातील लोकप्रिय असलेल्या घाणेकरांना सिनेमा नवीनच होता. त्यापूर्वी काही चित्रपटात तो चमकलाही होता. अशा तर्हेने दोन्ही नवोदितांना घेऊन हा ’पाठलाग’ सुरू झाला. दत्ता गोर्ले यांनी मराठी सिनेमात प्रथमच झूम लेन्सचा वापर करून यातील काही भाग शूट केला होता. त्यामुळे सिनेमाला एक उंची प्राप्त झाली. या सिनेमाचे सर्व चित्रीकरण जयप्रभा स्टुडीओत पार पडले. या चित्रपटात फक्त दोनच गाणी होती आशा भोसलेंनी गायलेली. ’या डोळ्याची दोन पाखरे’ व ’नको मारूस हाक मला घरच्यांचा धाक’ (सं.दत्ता डावजेकर) पैकी पहिल्या गाण्याचा किस्सा मोठा भारी आहे. चित्रीकरणाच्या वेळी गाणं तयार नव्हतं म्हणजे गाणं लिहिलच नव्हतं. हे गीत पार्श्वभूमीवर वाजविण्यात येणार असल्याने केवळ चालीच्या धुन वर चित्रीकरण पूर्ण केलं. पुढे गदीमांनी झालेलं शूट पाहून शब्द लिहिले. ’या डोळ्याची दोन पाखरे फिरतील तुमच्या भवती’. आधी चित्रीकरण आणि त्यावरून तंतोतंत जुळणारी शब्दरचना असा चमत्कार मराठीत (Mystery Film) तरी या पूर्वी कधी घडला नव्हता.सिनेमा पूर्ण झाला. नायिकेचं फिल्मी नामकरण झालं ’भावना’. चित्रपट रसिकांना बेफाम आवडला.महाराष्ट्र शासनाचे तब्बल सात पुरस्कार तर मिळालेच शिवाय रा्ष्ट्रीय पुरस्कारही पटकावला.
=======
हे देखील वाचा : साहिर, संगीतकार आणि गायकांच्या मानधनापेक्षा एक रुपया जास्त घ्यायचे!
=======
नंतर राज खोसला यांनी रीतसर या सिनेमाचे राईट्स घेवून १९९६६ साली याच कथानकावर ’मेरा साया’ हा सिनेमा बनविला त्यात या सिनेमातील.’या डोळ्याची दोन पाखरे’ च्या जागी गाणं होतं ’तू जहां जहां चलेगा मेरा साया साथ होगा’ आणि ’नको मारूस हाक’ च्या जागी गाणं होतं ’झुमका गिरा रे बरेली के बाजार में…’ आज ‘पाठलाग’ ची आठवण पुसट झाली आहे पण ‘मेरा साया‘ मात्र लगेच आठवला जातो. काय म्हणायचे याला?