महेंद्र कपूर आणि आशा भोसले यांचं पहिलं गाणं…
नवीन पार्श्वगायकाचा शोध घेण्यासाठी संपूर्ण भारतात १९५७ साली “मेट्रो – मरफी ऑल इंडीया सिंगींग कॉंपिटीशन” ही स्पर्धा घेण्यात आली. यात महेंद्र कपूर (Mahendra Kapoor) या स्पर्धेचा विजेता होता तर गायिकांमध्ये आरती मुखर्जी यांनी बाजी मारली. महेंद्र कपूरच्या छोटेखानी घरात अगदी आनंदाचं वातावरण होतं. देशभरातून पहिला नंबर मिळाल्याने महेंद्र कपूर तर ‘सातवे आसमान’ वर होता. पण या आनंदावर विरजण पडलं; कोर्टाकडून आलेल्या एका समन्समुळे घरातील आनंदाचं वातावरण क्षणार्धात पालटलं.
हे देखील वाचा: चौकटी बाहेरचा राज… राज कपूर…
याच स्पर्धेतील एकाने महेंद्रच्या निवडीवर आक्षेप घेतला होता. त्याच्या मते ही स्पर्धा नवोदित हौशी गायकांकरीता होती. पण महेंद्रने स्पर्धेत भाग घेण्यापूर्वी एका सिनेमात गाणे गायले होते त्यामुळे त्याची निवड अवैध आहे. प्रकरण कोर्टात गेले. संयोजकांनी महेंद्रकपूरच्या विरोधात फसवणूकीचा दावा लावला व संपूर्ण स्पर्धेचा खर्च त्याच्याकडून वसूल करण्यासाठी समन्स धाडले! घरात चिंतेचे वातावरण होते. एवढे पैसे आणायचे कुठून???
त्याने स्पर्धेपूर्वी एका सिनेमात गायन केले जरी असले तरी त्या गाण्याकरीता त्याने एक पैसाही मानधन घेतले नव्हते. याच मुद्द्यावर महेंद्रने आपली बाजू कोर्टापुढे मांडली. सच्चेपणाची, प्रामाणिकपणाची एक उपजत ताकत असते. न्यायमूर्ती व्ही डी तुळजापूरकर यांना ती पटली आणि महेंद्र कपूर यांनी न्यायालयीन लाढाई जिंकली व स्पर्धेतील विजेतेपद देखील अबाधित राखण्यात यशस्वी ठरले. या स्पर्धेकरीता जेष्ठ संगीतकार अनिल विश्वास, नौशाद, सी रामचंद्र, वसंत देसाई, एन दत्ता आणि मदन मोहन हे परीक्षक म्हणून लाभले होते. विजेत्या स्पर्धकाला या संगीतकारांकडून एकेक गाणं गायला मिळणार होतं.
हे वाचलंत का: नर्गीसची रेडिओवर मुलाखत घेताना सुनीलदत्त घाबरला होता!
सी रामचंद्र तथा अण्णांनी महेंद्रला पहिला ब्रेक “नवरंग” (१९५९) च्या वेळी दिला. या गाण्याच्या वेळचा एक किस्सा ऐकण्यासारखा आहे. पहिलंच गाणं युगल गीत होतं. आशा भोसले (Asha Bhosle) सोबत “आधा है चंद्रमा रात आधी”(aadha hai chandrama raat aadhi). पहिलंच गाणं ते देखील आशा सोबत त्यामुळे महेंद्र कपूरवर थोडं दडपण आल्याने तो नर्व्हस होता. गाण्याचं ध्वनीमुद्रण चालू झालं. गाणं मध्यावर आलं. अण्णा कानाला हेडफोन लावून गाणं ऐकत होते. त्यांना काही तरी चुकतंय असं वाटू लागलं. ते धावतच सिंगींग बूथ मध्ये गेले. ‘रूको रूको’ म्हणत त्यांनी रेकॉर्डींग थांबवलं. कुणालाच काही कळेना.
महेंद्र तर बिचारा घाबरून गेला. ‘अण्णा कुछ गलती हो गयी क्या?’ असं त्याने विचारले, तितक्यात राजकमलचे सॉंग रेकॉर्डीस्ट मंगेश देसाई तिथे पोचले. ते अण्णांना म्हणाले ‘बच्चा तो काफी अच्छा गा रहा है…’ आता थक्क व्हायची पाळी अण्णांची होती कारण त्यांना महेंद्रचा आवाजच ऐकू येत नव्हता. त्यांच्या हेडफोनला जोडलेल्या वायर मध्ये तांत्रिक दोष निर्माण झाला होता. ताबडतोब ती वायर बदलण्यात आली आणि गाणं पुन्हा एकवार सुरू झालं. महेंद्रचा जीव भांड्यात पडला. त्याचं पहिलचं गाणं सुपर हिट झालं होत… !
अतिशय गुणी गायक असलेल्या महेंद्र कपूरच्या पहिल्या गीताचा किस्सा आज त्याच्या जन्मदिनाच्या निमित्ताने…!