
दुर्दैवी गायिका मुबारक बेगम : हमारी याद आयेगी ?
एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये दुःख, अपयश, अवहेलना, अपमान, मनोभंग इतका ठासून भरलेला असतो काही केलं तरी त्या वेदना पाठ सोडायला तयार नसतात आणि ती व्यक्ती जर कलावंत असेल तर त्याच्या संवेदनशील मनाला या यातना आयुष्यभर ठसठसत राहतात. असाच काहीसा अनुभव पार्श्वगायिका मुबारक बेगम यांना आला होता. (Mubarak Begum)
खरं तर आजच्या पिढीला मुबारक बेगम (Mubarak Begum) नाव माहित असण्याची सुतराम शक्यता नाही पण ‘कभी तन्हाई में हमारी याद आयेगी…’ हे गाणं प्रत्येक संगीत रसिकांनी कधी ना कधी ऐकलेलं असतं. हे गाणे गाणारी गायिका होती मुबारक बेगम. तिच्या लोकप्रिय गाण्यांची संख्या हाताच्या बोटांवर मोजता येईल इतकीच आहे गाण्यांची संख्या आहे. वीस एक वर्षांपूर्वी पुण्यात आमच्या संगीत प्रेमी मित्रांनी मुबारक बेगम यांना बोलावून त्यांच्या मदतीसाठी एक संगीतमय कार्यक्रम ठेवला होता. या कार्यक्रमात मुबारक बेगम यांनी आपलं सर्व दुःख जाहीरपणे मांडलं होतं. आयुष्यात आलेल्या संधी इथल्या प्रस्थापित मंडळीच्या कारस्थानाने कशा हिरावल्या गेल्या याचा पाढा त्यांनी वाचून दाखवला.
राजस्थानमध्ये ५ जानेवारी १९३६ रोजी जन्मलेल्या मुबारक बेगम यांचा लहानपणीचा काळ गुजरात मध्ये गेला. त्यांचे वडील चांगले तबला वादक होते. यातूनच तिला देखील संगीताची आवड निर्माण झाली. पण घरचे अठरा विश्व दारिद्र्य, शिक्षणाचा अभाव यामुळे आलेल्या संधीचा कधी त्यांना लाभ घेता आलाच नाही. मुळात तशा संधीच खूप कमी मिळाल्या. चाळीसच्या दशकाच्या अखेरीस त्यांनी हिंदी सिनेमासाठी गायला सुरुवात केली. संगीतकार नाशाद यांच्याकडे ‘आईये’ या सिनेमासाठी पहिल्यांदा त्या गायल्या.

या सिनेमात लता सोबत एक गीत त्यांनी गायले. पन्नासच्या दशकात ‘दायरा’ या चित्रपटातील गाणी खूप गाजली. रफी सोबत चे ‘देवता हो के सहारा मैने थामा ही दामन तुम्हारा…’ हे गाणे खूप गाजले. बिमल रॉय यांच्या ‘देवदास’(१९५५) या चित्रपटात सचिन देव बर्मन यांच्या संगीत नियोजनात त्यांनी ‘वो न आयेंगे पलटके…’ हे गाणं गायलं. मुबारक बेगम हे नाव ठळकपणे रसिकांच्या समोर येऊ लागले होते. १९६१ साली आलेल्या केदार शर्मा यांच्या ‘हमारी याद आयेगी’ या चित्रपटातील टायटल सॉंग त्यांना अपघाताने मिळाले. हे गाणं खरंतर आधी लता मंगेशकर गाणार होत्या पण मुबारक यांचे नशीब बलवत्तर म्हणून हे गाणं मिळालं आणि हीच त्यांची खऱ्या अर्थाने ओळख बनली. (Mubarak Begum)
‘कभी तन्हाईयो मे भी हमारी याद आयेगी….’ या गाण्याने भारतभर प्रचंड लोकप्रियता हासील केली. आज या चित्रपटाची आठवण केवळ हे गाणे राहिलेले आहे. मुबारक यांचे करीयर चांगले मार्गी लागते आहे असे वाटू लागले. ‘हमराही’ मधील ‘मुझको अपने गले लगा लो ए मेरे हमराही हे रफी सोबतच गाणं प्रचंड गाजलं. पण दुर्दैवाचे फेरे पुन्हा पडले. मुबारकच्या या लोकप्रियतेला ग्रहण लागले.
या लोकप्रियतेचा फायदा मुबारक बेगम (Mubarak Begum) यांना अजिबात मिळता काम नये याची व्यवस्थित तजवीज केली गेली. मुबारक बेगम एका मुलाखतीत सांगतात,” माझ्याविरुद्ध एक मोठा कट रचला जात होता आणि मला या इंडस्ट्रीतून कसे बाहेर काढता येईल याचा पद्धतशीर प्रयत्न होत होता ! ‘जब जब फूल खिले’ या चित्रपटातील ‘परदेसियो से न अखिया मिलाना’ हे गाणं माझ्या आवाजातच रेकॉर्ड झालं होतं. त्याचप्रमाणे ‘काजल’ या चित्रपटातील ‘अगर ना मिले तुम तो मै ये …’ हे गाणे देखील माझ्याच आवाजात रेकॉर्ड झाले होते. परंतु मार्केटमध्ये जेव्हा या चित्रपटाच्या एल पी आल्या त्या वेळी दुसऱ्याच पार्श्वगायिकेच्या आवाजात हे गाणे आले होते. हे नंतर माझ्या आयुष्यात बऱ्याचदा घडू लागलं. रेकॉर्डिंग होत होते पण गाणी वेगळ्याच आवाजामध्ये बाहेर येत होते.”
सत्तरच्या दशकात तर मुबारक बेगम यांना गाणी मिळणं बंद होवू लागलं, हळूहळू त्या इंडस्ट्रीतून बाहेर पडू लागल्या. त्यांचं वैवाहिक जीवन देखील फारसं सुखी नव्हतं. ऐंशी च्या दशकाच्या शेवटी त्यांनी ‘रामू तो है दिवाना’ या चित्रपटात शेवटचं गाणं गायलं. यानंतर त्यांच्या दारिद्र्याचे फेरे सुरू झाले.एकेक पैशासाठी त्यांना संघर्ष करावा लागू लागला. या काळात अक्षरशः त्यांना मुंबईतील एका बदनाम वस्तीमध्ये दहा बाय आठच्या खोलीत राहावं लागलं. त्यावेळी अक्षरशः खाण्याचे वांदे होते. एकेकाळी ज्या गाण्याने रेकॉर्ड कंपनीने लाखो रुपये कमवले ते गाणे गाणारी गायिका दोन घास खाण्यासाठी मजबूर झाली होती. अभिनेता सुनील दत्त यांना जेव्हा मुबारक बेगम यांच्या या अवस्थेची बातमी कळली तेव्हा त्यांनी तिच्या करता पेन्शन सुरू केली. तसेच कलावंताच्या कोट्यातील एक घर मिळवून दिली.
============
हे देखील वाचा : ‘गहरी चाल’ सिनेमात या दोघांनी बहिण भावाची भूमिका केली…
============
अभिनेता सलमान खान याने देखील मदत केली. मुबारक बेगम यांची एक मुलगी पार्किंसन ने आजारी होते तिच्या आजारावर त्यांचा खूप मोठा खर्च होत होता. मुलगा टॅक्सी चालवत होता. सगळीकडून दारिद्र्याचे फेरे येत होते कुठूनच आनंदाची सुखाची बातमी मिळत नव्हती. हळूहळू मुबारक बेगम (Mubarak Begum) मध्ये एक नकारात्मकता येऊ लागली. मीडियाशी बोलताना त्यांच्यामध्ये सर्व समाजाबद्दल कटूताच व्यक्त होऊ लागली. अनेक संगीतकार, गायिकां बद्दल त्या वाट्टेल त्या बोलू लागल्या. यात त्रागा किती होता आणि वास्तवता किती हे सांगता येत नव्हत पण त्यांच्या आयुष्याचा तमाशा झाला होता. २०१५ साली त्यांची मुलगी गेली आणि १८ जुलै २०१६ रोजी वयाच्या ८० व्या वर्षी त्या अल्लाला भेटायला निघून गेल्या. ‘कभी तन्हाई मे हमारी याद आयेगी’ असं म्हणत मुबारक बेगम निघून गेली !