‘फसक्लास दाभाडे’ हे इरसाल कुटूंब येणार नव्या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला!
टी-सीरीज, कलर यल्लो प्रॉडक्शन आणि चलचित्र मंडळी यांचा आगामी चित्रपट ‘फसक्लास दाभाडे’ २४ जानेवारी २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘झिम्मा २’ च्या यशानंतर दिग्दर्शक हेमंत ढोमे आता ‘फसक्लास दाभाडे’ हा जबरदस्त चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी घेऊन येण्यासाठी सज्ज झाले आहेत. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर चित्रपटाचे नवीन पोस्टर आणि प्रदर्शनाची तारीख सोशल मीडियावर जाहीर करण्यात आली असून अमेय वाघ, क्षिती जोग, सिद्धार्थ चांदेकर यांच्यासह निवेदिता सराफ, हरिष दुधाडे, राजन भिसे, राजसी भावे यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. पोस्टरमध्ये एक एकत्रित कुटूंब दिवाळी साजरी सादरी करताना दिसत आहे. यावरून हा चित्रपट कौटुंबिक मनोरंजनाचा धमाका असणार हे कळतेय. मुळात हेमंत ढोमे यांचे चित्रपट हलक्या-फुलक्या पद्धतीने काहीतरी संदेश देणारे असतात. त्यांची एखादा संवेदनशील विषय उत्तमरित्या हाताळण्याची प्रगल्भता कमाल आहे. त्यामुळे हा चित्रपटही काहीतरी हटके असणार, हे नक्की!(Fussclass Dabhade Marathi Movie)
आपला आनंद व्यक्त करताना निर्माते आनंद एल राय म्हणतात, “दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आम्हाला हे जाहीर करताना अत्यंत आनंद होत आहे की, हा चित्रपट २४ जानेवारी २०२५ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात तुम्हाला भाऊ-बहिणींचे मजेदार आणि भावनिक नातेसंबंध पाहायला मिळतील, त्यासोबतच भावंडांमधील प्रेम आणि नोकझोक पाहायला मिळेल. हास्य आणि हृदयस्पर्शी भावनांचा संगम असलेली ही कथा आपल्यापैकी अनेकांना आपली वाटेल. भावंडांमधली गोड नाती असोत किंवा खेळकर वादविवाद, ही गोष्ट तुमच्या आठवणींना पुन्हा जागं करेल.”
दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, “हा चित्रपट माझ्या जीवनातील काही अनुभवांवर आधारित आहे. भावंडांची आणि त्यांच्या इरसाल कुटूंबाची गोष्ट सांगणारा हा चित्रपट तुमच्या आमच्या घरात घडणाऱ्या बऱ्याच गोष्टींवर आधारित आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना खळखळून हसवेल आपल्या नातेवाईकांची, सग्या सोयऱ्यांची आठवण करून देईल आणि आपण आपल्याच कुटूंबाची कथा मोठ्या पडद्यावर बघतोय असा अनुभव प्रेक्षकांना देईल याची मला खात्री आहे.”(Fussclass Dabhade Marathi Movie)
================================
हे देखील वाचा: अनोख्या जीवन प्रवासाची गाथा सांगणारा ‘जर्नी’ २९ नोव्हेंबर होणार प्रदर्शित
================================
‘फसक्लास दाभाडे’ हा टी-सीरीज, कलर यल्लो प्रॉडक्शन आणि चलचित्र मंडळी यांच्यातील एक सहयोगी उपक्रम आहे ज्यामुळे आनंद एल राय, क्षिती जोग आणि हेमंत ढोमे हे पुन्हा एकदा ‘झिम्मा २’ नंतर एकत्र येणार आहेत. २४ जानेवारी रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे वितरण अनिल थडानी यांच्या ए ए फिल्म्सने केले आहे.