विक्रम गोखले या नावामागे दडलाय मोठा इतिहास
चित्रपट, मालिका आणि नाटक अशा तीनही माध्यमातून प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे…दमदार आवाजाची देणगी लाभलेले आणि अभिनयाचे विश्वविद्यालय म्हणून गौरव केला तरी कमीच वाटेल असे विक्रम गोखले आपल्या चाहत्यांपासून दूर झाले आहेत, ते फक्त शरीरानं… विक्रम गोखले नावाचं वादळ खर तर असं आहे की, ते कधीच मराठी रंगभूमी आणि चित्रपटापासून दूर होणार नाही. बालपणीच अभिनयाचं बाळकडू घेतलेल्या विक्रम गोखले यांच अवघं आयुष्यच मराठी आणि मराठी जणांच्या भोवती फिरलं आहे.आज शरीरानं जरी ते या मराठी रंगभूमीपासून दूर झाले असले, तरी जोपर्यंत मराठी रंगभूमी आणि चित्रपट आहेत तो पर्यंत विक्रम गोखले हे नाव पुसले जाणार नाही.
काही दिवसांपूर्वीच जितेंद्र जोशीचा गोदावरी चित्रपट आला. त्यात मारुतीच्या पायाला पाणी लागलं का…असं विचारणारे..भ्रमिष्ठ झालेले आबा पाहिले आणि मनात एक वेदना झाली. गोदावरी चित्रपटात वयाची 77 वर्षे उलटेलेल्या विक्रम गोखले या अभिनेत्याचे तरुण पणातले चित्रपट ज्यांनी पाहिले असतील त्यांना त्यांची मोहिनी किती होती हे माहित होते. अत्यंत देखणा, रुबाबदार असा हा अभिनेता चित्रपटात आला, आणि चित्रपटातील अभिनेत्यांची व्याख्याच बदलून गेला. पण हे सर्व वाटतं तेवढं सोप नव्हतं. विक्रम गोखले या नावामागे खूप मोठा इतिहास आहे. अगदी पणजी, आजी, बाबांपासूनचा….विक्रम गोखले यांना घरातून अभिनयाचा, अगदी पिढीजात वारसा मिळाला. त्यांच्या पणजी दुर्गाबाई कामत या भारतीय चित्रपट सृष्टीतल्या पहिल्या अभिनेत्री होत्या. जेव्हा चित्रपट हे माध्यम नुकतच जन्माला आलं होतं, तेव्हाची ही गोष्ट…तेव्हा तर चित्रपट दूर पण नाटकातही महिलांना भूमिका करता येत नसत. त्या काळी दुर्गाबाई कामत यांनी ही क्रांती केली. विक्रम गोखले यांच्या आजी कमलाबाई गोखले म्हणजे, लग्ना आधीच्या कमलाबाई कामत या पहिल्या बाल-अभिनेत्री होत्या. 1913 मध्ये दुर्गाबाईंनी दादासाहेब फाळके यांच्या मोहिनी भस्मासूर नावाच्या चित्रपटात पार्वतीची आणि कमलाबाईंनी मोहिनीची भूमिका साकारली. एकूण विक्रम गोखले यांची रोखठोक भूमिका घेण्याची वृत्ती कुठून आली हे स्पष्ट होतच. हे गोखले कुटुंबच तस रोखठोक…विक्रम गोखले यांचे वडील चंद्रकांत गोखले यांनीही हिंदी-मराठी चित्रपट सृष्टीमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडली. या अभिनय संपन्न घरात विक्रम गोखले यांचा जन्म 30 ऑक्टोबर 1947 रोजी पुण्यात झाला. पणजी, आजी, आणि वडीलांचा हा अभिनयचा वारसा विक्रम गोखले यांच्याकडे आला. मुळातच रुबाबदार व्यक्तीमत्व. भाषेवर प्रभुत्व. हिंदी, इंग्रजी भाषाही तेवढ्याच सहजपणे बोलू शकत होते. त्यामुळे विक्रम गोखले यांचे रंगभूमी आणि चित्रपटात आगमन झाले तेव्हा हिरो या शब्दाची व्याख्याच बदलली.
विक्रम गोखले यांनी जवळपास 80 हून अधिक चित्रपटात भूमिका केल्या. मराठी, हिंदी चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका आणि नाटकं अशा सर्व क्षेत्रात त्यांचा वावर होता. अगदी तरुण वयापासून सुरु केलेला हा अभिनयाचा प्रवास अगदी वयाच्या 82 व्या वर्षापर्यंतही कायम होता. त्यांच्याबरोबर ज्यांनी रंगभूमीवर प्रवेश केला, ते कधीच रंगभूमीपासून दूर झाले. पण विक्रम गोखले यांची नाळ कायम अभिनयाबरोबर जोडली गेली. यामागे प्रमुख कारण म्हणजे त्यांची प्रचंड शिस्त. दिलेली वेळ पाळण्याची वृत्ती आणि अभिनयाचं खणखणीत नाणं. हे सर्व त्यांनी त्यांच्या शेवटच्या चित्रपटापर्यंतही पाळलं. गोदावरी चित्रपटातील आबांसाठी विक्रम गोखलेच हवे असा हट्ट होता. विक्रम गोखले यांनीही हा चित्रपट स्विकारला. पण शुटींग सुरु झाल्यावर त्यांची तब्बेत बिघडली होती. अशावेळी रुग्णालयात दाखल करावं लागलं. पण तब्बेत बरी झाल्यावर विक्रम गोखले यांनी आधी चित्रपट पूर्ण करण्यावर भर दिला. वयाची 82 ओलांडलेल्या या आबांनी तेव्हाच सर्वांच्या डोळ्यात पाणी आणलं होतं. या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुकाची पावती मिळाली, त्यात या आबांचा अभिनय प्रमुख ठरला.
वय हा फॅक्टर विक्रम गोखलेल्या आयुष्यात कधी आलाच नाही. छोट्या पडद्यावर गाजत असलेल्या ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत गुरु पंडित मुकूल नारायण यांचे पात्र साकारतांना विक्रम गोखले दिसले. याआधी त्यांनी अग्निहोत्री मालिकेत आपली छाप पाडली होती. मराठी चित्रपटात प्रमुख भूमिका करणा-या विक्रम गोखले यांनी 1971 मध्ये अमिताभ बच्चन यांच्या परवाना या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. त्यानंतर अनेक हिंदी चित्रपट त्यांच्याकडे आले. भूल भुलैया, मिशन मंगल, दिल से, दे दना दान, हिचकी, निकम, अग्निपथ, विक्रम बेताल यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये उत्कृष्ट भूमिका साकारल्या. संजय लीला भन्साळी यांच्या ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटात साकारलेली ऐश्वर्याच्या वडिलांची व्यक्तिरेखा त्याच्या खास पात्रांपैकी आहे. विक्रम गोखले यांना 2013 मध्ये अनुमती या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्याबरोबरच त्यांना 2015 मध्ये विष्णूदास भावे जीवनगौरव पुरस्कारानेही गौरवण्यात आले. तसेच 2017 मध्ये हरिभाऊ साने जीवनौरव पुरस्कार, 2018 मध्ये पुलोत्सव सन्मानाने गौरवण्यात आले. चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कारानाही विक्रम गोखले यांना सन्मानित करण्यात आले.
माहेरची साडी या मराठी चित्रपटातील विक्रम गोखलेंची पित्याची भूमिका अजरामर ठरली. घशाच्या त्रासामुळे नाटकांपासून त्यांना दूर व्हावे लागले, ही बोचणी त्यांना कायम होती. मात्र याची कसर त्यांनी चित्रपटातून भरुन काढली. चित्रपटातील भूमिकांबरोबरच दिग्दर्शन आणि लेखन यातही त्यांची मुशाफीरी चालू होती. यासोबत विक्रम गोखले हे नाव अनेक धर्मदाय संस्थांबरोबरही जोडल गेलं आहे. या गोष्टीचा त्यांनी कधीच जाहीर उच्चार केला नाही, हे आणखी एक त्याचं वैशिष्ट. धर्मादाय संस्था, अपंग सैनिकांना मदत करणारी संस्था यासोबत ते जोडले होते. शिवाय अनाथ मुलांची काळजी आणि अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदतही त्यांनी दिली आहे.
======
हे देखील वाचा : राजू श्रीवास्तव: वेळप्रसंगी रिक्षाही चालवली, पण निर्णयावर ठाम राहिले
======
आपल्या अभिनयला विक्रम गोखले यांनी कधीच एका धाटणीत बांधलं नाही. कधी नायिकेच्या मागे फिरणारा दिलदार नायक, तर कधी रुबाबदार वकील तर कधी घातकी खलनायक…अशा सर्व भूमिकात ते कायम फिट्ट असायचे. रंगभूमी त्यांच्या आवडीची. पण घशाचा त्रास सुरु झाला आणि त्यांना रंगभूमीला निरोप द्यावा लागला. तरही एखादी तरी स्मितरेषा, कथा, कमला, कल्पवृक्ष कन्येसाठी, के दिल अभी भरा नही, खरं सांगायचं तर, छुपे रुस्तम, जावई माझा भला, दुसरा सामना, नकळत सारे घडले, पुत्र मानवाचा, बॅरिस्टर, मकरंद राजाध्यक्ष, महासागर, मी माझ्या मुलांचा, संकेत मीलनाचा, समोरच्या घरात, सरगम, स्वामी यासारख्या नाटकांतून त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. यासोबत आम्ही बोलतो मराठी, कळत नकळत, ज्योतिबाचा नवस, दरोडेखोर, दुसरी गोष्ट, दे दणादण, नटसम्राट , भिंगरी, महानंदा, माहेरची साडी, लपंडाव, वजीर, वऱ्हाडी आणि वाजंत्री, वासुदेव बळवंत फडके ते अलिकडचा सिद्धान्त या मराठी चित्रपटातूनही विक्रम गोखले दमदार भूमिकेत दिसले. हिंदीमध्ये एरवी मराठी अभिनेत्याला फारशी महत्त्वाची भूमिका नसते. शिवाय मराठी धार्जिणे हिंदी म्हणून त्यांना हिणवण्यात येते. पण विक्रम गोखले यांनी हे सर्व समज मागे ठेवले. अग्निपथ, अधर्म, आंदोलन, ईश्वर, कैद में है बुलबुल, क्रोध, खुदा गवाह, घर आया मेरा परदेसी, चँपियन, जज़बात, जय बाबा अमरनाथ, तडीपार, थोडासा रूमानी हो जाय, धरम संकट, परवाना, प्रेमबंधन, फलक द स्काय, बदमाश, लाईफ पार्टनर, लाड़ला, वजीर, श्याम घनश्याम,हम दिल दे चुके सनम , हसते हसते, हे राम यासारख्या चित्रपटात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. छोट्या पडद्यावर त्यांची उडान ही मालिका कायम स्मरणात रहाणारी अशीच आहे. शिवाय अकबर बिरबल,अग्निहोत्र, अल्पविराम, कुछ खोया कुछ पाया, द्विधाता, मेरा नाम करेगा रोशन,या सुखांनो या, विरुद्ध, संजीवनी, सिंहासन यातूनही विक्रम गोखले यांचा दमदार अभिनय प्रेक्षकांना आपलासा वाटला.
मध्यंतरी कंगना रानावत संदर्भात केलेल्या वक्तव्यांवरुन विक्रम गोखले हे वादात आले होते. पण या सर्व वादांना तेवढ्याच तडफेनं त्यांनी उत्तर दिलं होतं. मुळात विक्रम गोखले हेच एक वादळी व्यक्तीमत्व. आपली भूमिका स्पष्टपणे मांडतांना त्यांनी कोणताही आडपडदा वापरला नाही. ती भूमिका राजकीय असो वा सामाजिक. आपला देश स्वतंत्र आहे, अशावेळी आपलं व्यक्तीगत मत मांडतांना आडपडदा कशाला असं रोखठोक मत त्यांचं होतं. पण यासोबत कायम हे लक्षात यायचं की या माणसानं आपल्या देशावर भरभरुन प्रेम केलं. हा जेष्ठ अभिनेता आज आपल्यात फक्त शरीरानं नाही…ही कमी कायम जाणवणार पण त्यांचे विचार,अभिनय यांची साथ कायम राहणार आहे.
सई बने