मनोरंजन आणि राजकारणाची सरमिसळ होतेय का?
सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे ती ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाची. या चित्रपटाचं चित्रीकरण सुरु झाल्यापासून सतत काही ना काही विवाद होतंच आहेत. मुळात ‘काश्मीर’ आणि विवाद हे जुळलेलं समीकरण इतकी वर्ष होऊनही बदलत नाहीये.
‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपट काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराच्या सत्यघटनेवर आधारित आहे. शिवाय विवेक अग्निहोत्रीसारख्या अभ्यासू दिग्दर्शकाने प्रचंड मेहनतीने सखोल अभ्यास आणि रिसर्च करून चित्रपट दिग्दर्शित केला आहे. इतकंच नाही, तर या चित्रपटातील प्रत्येक प्रसंग खरा असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. इतकं असताना त्यावरून कॉंट्रोव्हर्सी होण्याचं काही कारणच नव्हतं. तरीही ती झालीच, एक नाही तर अनेक गोष्टींवरून! मग ती कपिल शर्माचा प्रमोशन करण्यास देण्यात आलेला नकार असो किंवा कोर्ट केस.
हिंदी चित्रपटांबाबत होणारे वाद काही आपल्याला नवीन नाहीत. पण हे लोण हिंदीकडून मराठीमध्येही आलं आहे. आणि नुसतंच आलं नाही तर एकदम कमी वेळात ते खोलवर रुजतंही चाललं आहे.
मराठी प्रेक्षकांनी दादा कोंडके यांच्या द्वयर्थी संवाद असणाऱ्या चित्रपटांना स्वीकारलं तसंच अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन, महेश कोठारे यांच्या निखळ विनोदी चित्रपटांचेही स्वागत केलं; त्याचबरोबर अलका कुबलच्या कौटुंबिक नायिकाप्रधान चित्रपटांनाही स्वीकारले. अगदी अलीकडच्या काळात मुंबई-पुणे-मुंबई, ती सध्या काय करते, सैराट यासारख्या प्रेमाच्या विविध छटा असणाऱ्या प्रेमकथा तर, कट्यार काळजात घुसली, फॅन्ड्री, आनंदी गोपाळ, बालगंधर्व अशा विविध विषयांवर आधारित चित्रपटांचंही स्वागत केलं. (मराठी इंडस्ट्री)
त्यावेळी कलाकारांच्या नावावर चित्रपट चालत असत. कलाकार हा फक्त कलाकार होता आणि तीच त्याची ओळख होती. परंतु, आता मात्र सगळेच संदर्भ बदलत चालले आहेत. कलाकाराची जात, धर्म इतकंच काय तर त्याची राजकीय भूमिकाही महत्वाची बनली आहे. जसं अमोल कोल्हेंच्या नथुरामाच्या भूमिकेवरून झालेला वाद. अभिनेता अमोल कोल्हे आणि खासदार अमोल कोल्हे या दोन्ही भूमिकांची अकारण सरमिसळ करण्यात आली.
गेल्या काही दिवसात मराठी इंडस्ट्री ढवळून गेली आहे. आधी किरण माने प्रकरण, त्यानंतर अमोल कोल्हे यांच्या नथुरामच्या भूमिकेवरील आक्षेप आणि आता पावनखिंड विरुद्ध झुंड अशा अनेक विषयांवर सोशल मीडियावर वाद रंगले आहेत. कारणं काहीही असोत. पण मनोरंजन क्षेत्र हे केवळ मनोरंजनापुरतं मर्यादित न राहता राजकारणाचं एक प्रभावी माध्यम बनलं आहे.
जात, धर्म, राजकारण हे मुद्दे ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक वगळता मराठी इंडस्ट्रीमध्ये डोकावले नव्हते. अर्थात त्या नाटकाच्या बाबतीतही हे मुद्दे अकारण उभे करण्यात आले होते. कारण जर दाऊद सारख्या दहशतवाद्याच्या आयुष्यावर बनवलेला चित्रपट चालतो, तर नथुराम गोडसेंच्या आयुष्यावरील नाटकावर आक्षेप कशासाठी? असो. सध्याच्या काळात हे जात, धर्म, राजकारण हे मुद्दे इतर क्षेत्रांप्रमाणेच मराठी इंडस्ट्रीमध्येही मोठ्या प्रमाणावर वादंग उठवत आहेत.
सोशल मीडियाच्या आगमनाने सर्वसामान्यांच्या आयुष्यासोबतच एकूणच समाजात अनेक बदल घडले आहेत, घडत आहेत. नीतिमत्ता धाब्यावर बसवून अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अर्वाच्च भाषेतल्या पोस्ट, कमेंट्स, अर्धवट माहितीवर लिहिलेले लेख, देशातल्या देवतुल्य आणि सन्माननीय महान व्यक्तिमत्वांवर होणारे आरोप, या साऱ्या गोष्टींसोबत चित्रपट कलाकारांनाही यामध्ये खेचण्यात येत आहे आणि ‘ट्रोलिंग’ नावाच्या शब्दाने अर्थाचा अनर्थ घडू लागलाय. अर्थात काही कलाकारांनी यामध्ये स्वतःहून उडी घेतली आहे. असो.
सोशल मीडिया नावाचा प्लॅटफॉर्म प्रत्येकाला उपलब्ध झाला आहे. त्याचा वापर कोणी कसा करायचा याला काही नियम नाहीत. अगदी चित्रपटांच्या प्रमोशनपासून राजकारणाच्या प्रचारापर्यंत सर्व गोष्टी इथे घडतात. अर्थात ही चांगलीच गोष्ट आहे. परंतु, हे एवढ्यापुरतंच मर्यादित राहिलेलं नाही.
स्व. लता दीदींच्या निधनानंतर त्यांनी अमुक एका नेत्याची गाणी गायली नाहीत म्हणून त्यांना नावं ठेवण्यात आली, त्याआधी एका मराठी कलाकाराने मराठीमध्ये चांगला कन्टेन्ट असणारे चित्रपट चालत नाहीत, असं म्हणून नाराजी व्यक्त केल्यावर विषय थेट त्याच्या जातीपर्यंत गेला. किरण माने प्रकरणातही संपूर्ण प्रकरणाला अकारण जातीचा रंग देण्यात आला. आणि आता झुंड आणि पावनखिंड चित्रपटांवरही जातीय विवाद सुरु झाला आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा कलाकारांचे वाद राजकारण्यांपर्यंत जायचं काही कारणच नाही आणि नव्हतं. तरीही ते जाऊ लागले आहेत. हे सगळं सहज घडतंय की घडवून आणलं जातंय?
रियालटी शो मध्ये चित्रपटांचं प्रमोशन, एखादया खास सणानिमित्त जुन्या जाणकार कलाकारांचं अथवा कलाकार जोडीचं मंचावर होणारं आगमन या गोष्टी समजण्यासारख्या आहेत. परंतु, रियालिटी शो मध्येही आता राजकारण्यांचा वावर दिसू लागला आहे.
=====
हे देखील वाचा: काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराची मन हेलावून टाकणारी कहाणी
====
एकीकडे बॉलिवूडची दुनिया अंडरवर्ल्ड डॉनच्या ताब्यात आहे, असं उघडउघड विधान केलं जात असताना मराठी इंडस्ट्री मात्र या साऱ्यापासून अलिप्त होती. पण आता मात्र परिस्थिती बदलली आहे. अर्थात आता सुजाण प्रेक्षकांना निखळ करमणूक, प्रबोधन करणारे चित्रपट हवे आहेत की, राजकारण्यांनी स्पॉन्सर केलेले प्रचारात्मक चित्रपट, याचा विचार सुजाण जनतेने करायचा आहे.
कोणत्याही कलाकाराकडे अथवा कलाकृतीकडे बघण्याचा दृष्टिकोन जातीयवादी किंवा राजकीय न ठेवता फक्त आणि फक्त रसिक प्रेक्षक म्हणून त्या कलाकृतीचा आनंद घेता यायला हवा. मग ती कलाकृती हिंदी असो किंवा मराठी. अर्थात याचवेळी ‘मेकर्स’नीही हाच दृष्टिकोन बाळगणे आवश्यक आहे.
====
हे ही वाचा: इकडे ‘खिंड’ तिकडे ‘झुंड’… नेमकी लढत कोणाची कोणाशी?
====
महाराष्ट्राला कलेची चांगली संसकृती लाभली आहे. चित्रपटसृष्टीचा पाय रचणारे दादासाहेब फाळके हे आपल्या मराठमोळ्या मातीतलेच आहेत. कोण चूक, कोण बरोबर असा वाद घालण्यापेक्षा जे घडतंय ते का घडतंय आणि ते खरंच योग्य आहे का, हा विचार शांत डोक्याने करायला हवा. कारण मनोरंजनाची दुनिया आता केवळ मनोरंजन म्हणून न राहता ती राजकारणाचं एक प्रभावी माध्यम बनू पाहतेय आणि हे जास्त धोकादायक आहे.