दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
…आणि तलतच्या स्वरात रेकॉर्ड झालेली गाणी सिनेमातून काढून टाकण्यात आली!
आपल्या अनोख्या स्वरशैलीने भारतीय चित्रपट संगीतातील गोल्डन इरा आणखी समृद्ध करणारा गायक म्हणजे तलत महमूद (Talat Mahmood). तलतचा आवाज हा सर्वस्वी वेगळा होता. त्याच्या आवाजातील नैसर्गिक कंप स्वराची उंची वाढवणारा होता. मखमली स्वराचा गायक असा त्याचा लौकिक होता. आज साठ-सत्तर वर्षानंतर देखील तलतची गाणी रसिक आवर्जून ऐकतात यातच त्याच्या स्वराची महती समजते.
पन्नासचे दशक हे तलत करीता महत्त्वाचे दशक होते. या दशकात त्या काळातील सर्व आघाडीच्या कलाकारांनी त्याचा स्वर वापरला. अगदी दिलीप कुमारपासून मनोज कुमार पर्यंत! परंतु साठच्या दशकामध्ये मात्र तलतच्या स्वराची उतरण सुरू झाली. भावस्पर्शी स्वराच्या आणि संवेदनशील मनाच्या तलत मेहमूद (Talat Mahmood) यांना घेतल्या मायावी दुनियेतील हिशेब कधी कळालेच नाहीत. इथल्या कुटील राजकारणाचे ते बळी पडले आणि हा गुणी गायक साठच्या दशकात अक्षरशः सिनेमा इंडस्ट्रीतून बाहेर फेकला गेला! पण त्यापूर्वीचे त्याला बसलेले दोन-तीन चटके त्यांना आयुष्यभर त्रास देत राहिले.
या काळात तलत महमूद (Talat Mahmood) यांनी गाणी गायली पण ही गाणी चित्रपटात मात्र दिसलीच नाहीत. यात प्रामुख्याने दोन गाण्यांच्या कथा (खरं तर व्यथा!) तलतला कसे व्यवस्थित संपवले स्पष्ट करतात. दिग्दर्शक एस यु सनी यांचा ‘पालकी’ हा चित्रपट १९६७ साली आला होता. संगीत नौशाद यांचे होते. राजेंद्र कुमार या सिनेमाचा मुख्य नायक होता. या चित्रपटातील ‘कल रात जिंदगी से मुलाकात हो गई..’ हे रफीने गायलेलं गाणं आज देखील लोकप्रिय आहे. ‘पालकी’ हा चित्रपट हा पूर्णपणे विस्मृतीत गेला असला तरी हे गाणं हीच एकमेव आठवण या चित्रपटाची आहे.
पण तुम्हाला माहिती आहे का हे गाणं आधी तलत महमूदच्या आवाजात रेकॉर्ड झालं होतं. नौशाद यांनी स्वतः बऱ्याच वर्षानंतर याची कबुली दिली होती. हे गाणे तलतच्या स्वरात रेकॉर्ड झाले पण चित्रपटाचा नायक राजेंद्र कुमार यांना मात्र अजिबात आवडले नाही. त्या काळात राजेंद्र कुमार ज्युबिली कुमार होते. त्यामुळे त्यांच्या म्हणण्यानुसार तलतचे गाणे रद्द करून रफीच्या आवाजात पुन्हा रेकॉर्ड केले गेले! तलतसाठी हा मोठा आघात होता.
यानंतरचा दुसरा आघात १९६८ साली बसला. या वर्षी ए भीमसिंग यांचा ‘आदमी’ हा सिनेमा पडद्यावर झळकला होता. यामध्ये दिलीप कुमार, मनोज कुमार आणि वहिदा रहमान यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या सिनेमात चित्रपटातील महत्त्वाचे गाणे दिलीप आणि मनोजवर चित्रित होणार होते. गाण्याचे बोल होते ‘कैसी हसीन रात है….’ नौशाद यांनी हे गाणे म. रफी आणि तलत मेहमूद यांच्या आवाजात हे गाणे रेकॉर्ड केलं. चित्रपटाचे शूटिंग मद्रासला होणार होते तिकडे हे गाणे पाठवण्यात आले.
तिकडे जेव्हा मनोज कुमार हे गाणे ऐकले तेव्हा त्याला यातील तलत (Talat Mahmood)चा स्वर अजिबात आवडला नाही कारण या गाण्यातील रफीचा स्वर दिलीप कुमारसाठी तलतचा स्वर हा मनोज कुमारसाठी वापरला होता. मनोज कुमारला तलतचा या गाण्यातील स्वर खूपच पातळ वाटला आणि रफीच्या समोर खूपच कमजोर आणि फिका वाटला. त्यामुळे त्यांनी दिग्दर्शकाच्या मार्फत संगीतकार नौशाद यांच्यावर दबाव आणायला सुरुवात केली. ए. भीमसिंग यांनी मुंबईला नौशाद यांना फोन करून परिस्थिती सांगितली. नौशाद यांनी सुरुवातीला नकार दिला पण जेव्हा खूपच प्रेशर सगळीकडून आल्यानंतर त्यांनी हे गाणे महेंद्र कपूरच्या आवाजात रेकॉर्ड केले. आता मनोज कुमारचा पडद्यावरील आवाज महेंद्र कपूर ठरला.
===========
हे देखील वाचा : किस्सा हेमलताच्या एकमेव फिल्मफेअर विजेत्या गाण्याच्या रेकॉर्डींगचा!
===========
नौशाद यांनी मात्र एक केले. चित्रपटात हे गाणे जरी रफी महेंद्र कपूरच्या स्वरात आपला ऐकू येत असले तरी गाण्याच्या एलपीवर मात्र रफी आणि तलत यांचाच स्वर ऐकायला मिळतो. या सर्व प्रकारामुळे तलत खूपच नाराज झाले. नौशाद सारख्या दिग्गज संगीतकाराने हा प्रकार करावा याचा त्यांना खेद वाटला. त्यामुळे या दोघांमधील संवाद काही काळ थांबला होता.
म.रफी यांनी जेव्हा सिनेमा बघितला तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले कारण त्यांना हा प्रकार माहितीच नव्हता त्यांनी नौशाद यांना फोन करून विचारले तेव्हा हा सर्व प्रकार लक्षात आला. त्यांना देखील हा प्रकार तितकासा आवडला नाही. म्हणूनच कदाचित रफी आणि महेंद्र कपूर यांचे हे एकमेव द्वंद्व गीत असावे. काहीही असो पण तलत (Talat Mahmood)चे मात्र यामुळे दीर्घकालीन नुकसान झाले!