गोष्ट लक्ष्याच्या पहिल्या बायकोची- रुही बेर्डेची !
तुम्ही वाचताय ते अगदी बरोबर वाचत आहात, आपल्या मराठमोळ्या लाडक्या सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डेंची दोन लग्न झाली होती. प्रिया बेर्डे या त्यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत. त्यांच्या पहिल्या पत्नीबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. रुही बेर्डे यांना तुम्ही अनेक हिट चित्रपटात पाहिले असेल पण त्या लक्ष्मीकांत यांच्या पहिल्या पत्नी असतील याची आपल्याला कल्पना नव्हती. रुही बेर्डे यांचे मूळ नाव पद्मा होते. त्यांचे पडद्यावरील नाव रुही असे होते. त्या मूळच्या मुंबईच्या होत्या. (Laxmikant Berde Wife)
त्यांच्या कारकिर्दीची सुरवात नाटकांपासून झाली होती. “डार्लिंग डार्लिंग” हे त्यांचे पहिलं यशस्वी व्यावसायिक नाटक ज्याने त्यांना सिनेमा विश्वाची दारे उघडून दिली. १९७३ मध्ये राजा ठाकूर यांनी त्यांचे या नाटकातील काम बघून त्यांना ‘जावई विकत घेणे आहे’ आणि १९७५ मध्ये दादा कोंडके यांनी ‘पांडू हवालदार’ या चित्रपटात काम करण्याची संधी दिली. दोन्ही चित्रपट हिट झाले आणि मग त्यांना मागे वळून पाहण्याची गरज पडली नाही. (Laxmikant Berde Wife)
पुढे हिंदी चित्रपट सृष्टीत त्यांनी ‘आ गले लग जा’ या चित्रपटात शत्रुघ्न सिन्हा यांच्या बहिणीचा रोल करून पदार्पण केले. प्रसिद्ध हिंदी दिग्दर्शक ऋषिकेश मुखर्जी यांनी ‘गुड्डी’ या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी त्यांना निवडले होते पण दुर्दैवाने हा चित्रपट त्या करू शकल्या नाही. पुढे जया भादुरी यांना तो रोल मिळाला. इकडे मराठी चित्रपट सृष्टीतील त्यांची घोडदौड चालूच होती. त्यांनी सतीची पुण्याई, दोस्त असावा तर असा, मुंबईचा फौजदार यासारख्या अनेक चित्रपटात महत्वाच्या भूमिका केल्या. (Laxmikant Berde Wife)
‘वेडी माणसं’ या नाटकाच्या दरम्यान त्यांची ओळख लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याशी झाली. ते या नाटकात वेडसर म्हाताऱ्याचा रोल करत होते. लक्ष्मीकांत यांचा त्यावेळी स्ट्रगल चालू होता आणि त्यांना जास्त कोणी ओळखत नव्हते. आपल्या खेळकर आणि विनोदी स्वभावाने ते सर्वाना आपलेसे करत. नंतर ‘कशात काय आणि लफड्यात पाय’ या नाटकाच्या निमित्ताने रुही आणि लक्ष्मीकांत पुन्हा एकत्र आले आणि कायमचे एकत्र झाले.
त्या नाटकापासून त्यांच्या प्रेमाला सुरुवात झाली. रुही त्यावेळीची प्रसिद्ध अभिनेत्री आणि लक्ष्मीकांत हे एक स्ट्रगलिंग ॲक्टर होते पण दोघांनी याची कधीच पर्वा केली नाही. लक्ष्मीकांत हा एक दिवस नक्की स्टार बनेल यावर रुहीचा पक्का विश्वास होता. ती त्यांना त्यांच्या स्ट्रगलिंगच्या काळात नेहमी मदत करायची आणि मानसिक आधार देत असे. ज्या ज्यावेळी रुहीचा कोणी इंटरव्यू घ्यायला आले तर ती लक्ष्मीकांतचा देखील इंटरविव्हू घ्यायला सांगत असे आणि म्हणत असे की, याचा इंटरविव्हू नक्की घ्या हा येत्या काळातील स्टार आहे. ‘मैने प्यार किया’ आणि ‘हम आपके है कौन’ या सुपरहिट चित्रपटातील भूमिका मिळण्याचे श्रेय लक्ष्मीकांत यांनी रुहीलाच दिले होते. (Laxmikant Berde Wife)
पुढे १९८३ साली रुही आणि लक्ष्मीकांत लग्न बेडीत अडकले. रुही लक्ष्मीकांत (Laxmikant Berde Wife) यांच्या आयुष्यातील खरी लक्ष्मी ठरली. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी लक्ष्मीकांत यांच्या ‘धुमधडाका’ या फिल्मचे चित्रीकरण सुरु झाले. त्यांचा संसार १५ वर्षे टिकला. या दरम्यान लक्ष्मीकांत यांच्या आई वडिलांचे निधन झाले त्यावेळी रूहीने आपल्याला खूप मानसिक दिला आणि खूप सावरले होते असे लक्ष्मीकांत यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. धुमधडका नंतर जेव्हा लक्ष्मीकांत यांचे करियर शिखरावर गेले तेव्हा त्यांनी चित्रपटातून काही काळ ब्रेक घेतला होता. पुढे त्यांनी चरित्र भूमिकांवर लक्ष केंद्रित केले. ‘खट्याळ सासू नाठाळ सून’, ‘लेक चालली सासरला’, ‘माझे घर तुझा संसार’ या चित्रपटात त्यांनी महत्वाच्या चरित्र भूमिका केल्या. त्यांनी लक्ष्मीकांत सोबतदेखील ‘मामला पोरींचा’, ‘बाळाचे बाप ब्रह्मचारी’, ‘एक फुल चार हाफ’ अशा काही चित्रपटात भूमिका केल्या.
==========
हे देखील वाचा : जिला सिनेमात करीयर करायचे होते तिला मोठी इनिंग खेळता आली नाही, तर…
==========
मात्र नियतीच्या मनात वेगळेच काहीतरी होते आणि या सुखी संसाराला कुणाचीतरी नजर लागली. एके दिवशी अंधेरीला आपल्या गाडीतून जात असताना त्यांना ब्रेन हॅमरेज झाला आणि हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. लक्ष्मीकांत या धक्क्याने खचले होते. पुढे आजार बळावत गेला आणि त्यांनी उपचारांना रिस्पॉन्स देणे बंद केले. ५ एप्रिल १९९५ रोजी त्यांचे निधन झाले. लक्ष्मीकांत खूप वेळ त्यांच्या पार्थिवाशेजारी मूकपणे बसून होते, ते पुरते ढासळले होते. लक्ष्मीकांत यांनी रुहीच्या पार्थिवावरील एकही दागिना काढून दिला नाही सर्व दागिने तसेच ठेवले. या धक्क्यातून सावरायला त्यांना खूप काळ लागला. त्यांनी ३ महिने कुठेही मुलाखत दिली नव्हती, ना कोणत्याही मित्राशी बोलले नव्हते. पूर्णपणे एकटे पडल्याची भावना त्यांना अनुभवायला आली होती. पुढे एका मुलाखतीमध्ये त्यांनी रुहीच्या मृत्यूविषयी त्यांच्या भावना सांगितल्या होत्या ते बोलले होते की, ‘रुही गेली आणि मला वाटलं की, माझ जहाजच बुडाले.’ मराठीच्या या सुपरस्टारने आपल्या मनावर इतकी वर्षे राज्य केले आणि अजूनही करतच आहे पण त्याच्या मनावर जिने १५ वर्षे राज्य केले अशा रुहीची कहाणी आपल्या समोर यावी यासाठी हा लेखन प्रपंच !