गोष्ट माधुरीच्या ‘एक दो तीन…’ या गाण्याची!
माधुरी दिक्षीतला ज्या गाण्याने स्टार केले त्या ’तेजाब’च्या नृत्य गीताचा किस्सा मशहूर आहे. दिग्दर्शक एन चंद्रा यांना तरूणाईला अपील होईल असे गाणे हवे होते. गीतकार जावेद अख्तर आणि संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या सोबत गाण्याची सिच्युएशन सांगून दोन तीन मीटींग झाल्या पण हाती काही आलं नाही. एन चंद्रा यांच्या डोक्यात त्यांनी कधी काळी ऐकलेली एक कोळी गीताची धुन नेमकी त्याच वेळी त्यांना आठवली. त्यांनी ताबडतोब एल पीं ना गाठले व शब्द माहित नसलेले ते कोळी गीत डिंग डांग डिंग डिंग डांग डिंग डांग अशा ड च्या बाराखडीत म्हणून दाखवले.
लक्ष्मीकांत मराठी असल्याने त्यांना ही धुन अंधुकशी आठवली.त्यांचे डोळे चमकले.हार्मोनियम ओढून घेतला व या ट्यून वर डमी बोल टाकले. ’एक दो तीन चार पांच छे सात आठ नौ दस ग्यारा…..” या डमी बोलांची ट्यून गीतकार जावेद अख्तर यांच्या कडे पाठवली गेली. जावेदनी ती ऐकली व त्यांनी हाच मुखडा ठेवून हि अंकलिपी छब्बीस पर्यंत नेली. प्रेयसी आपल्या प्रियकराचा तारखा मोजत मोजत इंतजार करते व त्याच्या परतीची वाट बघते या सिच्युएशनला गाणं फिट्ट बसलं.
संगीतकार एल पी यांनी जबरदस्त ऑर्केस्ट्रेशन वापरून गाणं तरूणाईला खेचून घेईल असं “कॅची” बनवलं. अलका याज्ञिक च्या आवाजातील गाणं भन्नाट बनलं. माधुरीने प्रचंड मेहनत घेतली. सरोज खान महिना्भर रोज तीन-चार तिची रिहर्सल करून घेत असे. सरोज खान ला या गाण्याच्या कोरीयोग्राफीकरीता फिल्म फेअर अॅवार्ड मिळालं.
मुंबईच्या मेहबूब स्टुडिओत बिजॉन दासगुप्ता यांनी बनविलेल्या दिमाखदार सेटवर तब्बल आठ दिवस या गाण्याचे चित्रीकरण चालले. शेवटच्या दिवसी तर सकाळी ९ वाजता सुरू झालेलं शूटींग अथकपणे तब्बल २५ तास चालले व तीन शिफ्ट मध्ये दुसर्या दिवशी सकाळी साडे दहाला पॅक अप केले! त्या दिवसी माधुरीच्या अंगात ताप होता. पण काही तरी वेगळं करून दाखवायची जिद्द होती. काहीही तक्रार न करता तिनं शूट पूर्ण केलं. सिनेमॅटोग्राफर बाबा आजमी च्या कॅमेर्याने देखील कमाल केली. या गाण्याच्या रशेस बघितल्यावर अनिल कपू्र ने एन चंद्रा जवळ हट्ट धरला व हेच गाणे मेल व्हर्जन मध्ये बनवायला लावले.