‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
‘दो घडी वो जो पास आ बैठे…’ गाण्याची भावस्पर्शी जन्मकथा…
सिनेमाच्या सुवर्णकाळातील गाणी आज साठ-सत्तर वर्षाचा कालावधी उलटून गेला तरी अजूनही तितकीच कर्ण मधुर आणि लोकप्रिय आहेत. या गाण्यांच्या मेकिंगच्या गोष्टी देखील खूप मनोरंजक असतात. आज अशीच एका लोकप्रिय गाण्याच्या मेकिंगची कथा. हे गाणे १९५७ साली प्रदर्शित झालेल्या ‘गेट वे ऑफ इंडिया’ या चित्रपटातील होते. मधुबाला आणि प्रदीप कुमार या चित्रपटातील प्रमुख कलाकार होते. या चित्रपटाची गाणी राजेंद्र कृष्ण यांनी लिहिली होती. तर संगीतकार होते मदन मोहन यांचे होते. लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेला हे अप्रतिम युगलगीत होतं ‘दो घडी वो जो पास आ बैठे हम जमाने से दूर जा बैठे…’ मधुबालाचं आरस्पानी अप्रतिम सौंदर्य आणि लताचा अद्वितीय स्वर जर ऐकायचं असेल तर या गाण्याला पर्याय नाही. पण इतकं सुंदर गाणं जन्माला कसं आलं? त्याला काय काय यातना सहन कराव्या लागल्या? ते पाहा. (Making Song)
या ‘गेट वे ऑफ इंडिया’ चित्रपटाचा निर्माता आणि दिग्दर्शक होता हास्य अभिनेता ओमप्रकाश. अभिनेता ओम प्रकाश, संगीतकार सी रामचंद्र आणि गीतकार राजेंद्र कृष्ण हे परस्परांचे चांगले मित्र होते. त्यामुळेच त्यांच्यातील थट्टा मस्करी, राग लोभ, रुसवे फुगवे अगदी टोकाचे होते. त्यातल्या त्यात राजेंद्र कृष्ण आणि ओमप्रकाश यांच्यात तर अगदी क्षुल्लक गोष्टीवरून सुद्धा भांडण व्हायचं मग अबोला निर्माण व्हायचा. कित्येक दिवस कित्येक महिने हे एकमेकांशी बोलायचं नाही मग सी रामचंद्र किंवा अन्य कोणी मित्र या दोघांमध्ये पुन्हा समझोता निर्माण करायचे आणि पुन्हा ते मित्र बनायचे! एकदा या तिघांना मद्रासला एका चित्रपटाच्या निमित्ताने जायचं होतं. गीतकार राजेंद्र कृष्ण आणि संगीतकार सी रामचंद्र विमानाने मद्रासला गेले अभिनेता ओमप्रकाश यांना मात्र विमान प्रवासाची ऍलर्जी होती. तो विमान प्रवासाला खूप घाबरत असे. त्यामुळे ते म्हणाले ,”तुम्ही विमानाने जा मी आपला रेल्वेने येतो!” राजेंद्र कृष्ण आणि सी रामचंद्र आदल्या दिवशीच मद्रासला पोहोचले. दुसऱ्या दिवशी सकाळी ओमप्रकाश मद्रासला येणार होते. ओमप्रकाशची थोडीशी गंमत करावी असे राजेंद्र कृष्ण यांना वाटले. त्याने एक गमतीशीर प्लान केला. (Making Song)
राजेंद्र कृष्ण यांनी मद्रास रेल्वे स्टेशनवर तिथले सर्व तृतीयपंथी हिजडे गोळा केले आणि त्यांच्या हातात चपलांचा हार देऊन ओमप्रकाश आला की, त्याचे स्वागत या हिजड्यांच्या मार्फत करायचे ठरवले! मद्रासला रेल्वे स्टेशन वर उतरल्यावर ओमप्रकाश यांना हिजड्यांनी पकडले. त्याच्या गळ्यात चपलांचा हार घातला आणि वेलकम टू मद्रास बाय ट्रेन असा बोर्ड त्याच्या गळ्यात घातला. ओमप्रकाश प्रचंड वैतागला आणि ह्या कृत्यामागे राजेंद्र कृष्णच आहे हे त्याच्या लक्षात आलं आणि या दोघांचा अबोला सुरू झाला. हा अबोला साताठ महिने चालला. (Making Song)
नंतर याच काळात ओमप्रकाश एका चित्रपटाची निर्मिती करू लागला. चित्रपटाचे नाव होतं ‘गेट वे ऑफ इंडिया’ या सिनेमाला संगीत मदन मोहन यांचे होते. संगीतकार मदन मोहन यांनी गीत लेखनासाठी राजेंद्र कृष्ण यांचीच मागणी केली. ओमप्रकाश आणि राजेंद्र कृष्ण यांच्यात अबोला होता. आता काय करायचे? मदन मोहन यांना तर राजेंद्र कृष्ण यांचीच गाणी हवी होती. मग ओम प्रकाश यांनी एक आयडिया केली. त्यावेळी राजेंद्र कृष्ण मद्रासला होते. ते मद्रासहून कुठल्या फ्लाईटने मुंबईला येणार आहेत हे त्याने शोधून काढले आणि मुंबई विमानतळावर आपला ड्रायव्हर आणि गाडी पाठवली. मुंबई विमानतळावर ड्रायव्हर हरबन्सला पाहून राजेंद्र कृष्ण यांना समजले पण ते काही बोलले नाही. चुपचाप गाडीत येऊन बसले. गाडी ओमप्रकाश यांच्या बंगल्यात आली. ओमप्रकाश यांनी तरीही राजेंद्र कृष्ण यांचे स्वागत केले नाही. नोकराकरवी कागद आणि पेन राजेंद्र कृष्ण यांच्याकडे पाठवला आणि सिच्युएशन सांगितली. राजेंद्र कृष्ण यांनी देखील तिथल्या तिथे बसून काही वेळातच गाणे लिहून काढले आणि पुन्हा तो कागद राजेंद्र कृष्ण यांच्या नोकराच्या हाती दिला आणि सांगितले की,” आता मी घरी जातो आहे माझे पेमेंट तुझ्या मालकाने (ओम प्रकाशने) माझ्या घरी येऊन करायचे आहे हे लक्षात ठेव.” आणि ते घरी निघून गेले.
======
हे देखील वाचा : आर के बाहेरचा राजकपूर
======
ओम प्रकाशने जेव्हा तो गाणे लिहिलेला कागद पाहिला त्यावेळी त्यांच्या डोळ्यात पाणी आलं कारण राजेंद्र कृष्ण यांनी अतिशय अप्रतिम शब्दांमध्ये ते गाणे लिहिले होते. दो घडी वो जो पास आ बैठे हम जमाने से दूर जा बैठे…’ त्यांनी लगेच राजेंद्र कृष्ण यांना फोन केला आणि म्हणाले,” मित्रा तू जिंकलास…” लगेच आपली गाडी काढून त्यांच्या घरी गेले. दोघे एकमेकांच्या गळ्यात पडून खूप वेळ निशब्दपणे अश्रू गाळत बसले! दोन मित्रांच्या मैत्रीला पुन्हा एकदा पाझर फुटला. ही भावस्पर्शी आठवण इसाक मुजावर यांनी त्यांच्या एका पुस्तकात लिहिली आहे.