‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
‘उमराव जान’चे शूटिंग पाहण्यासाठी झाली होती दंगल!
चित्रपट रसिक आपल्या आवडत्या स्टार्सला पाहण्यासाठी खूप उत्सुक असतात. पूर्वीच्या काळी हे तर प्रमाण खूप जास्त होते कारण मिडिया मर्यादित होता. त्या कलाकाराची एकदा तरी झलक दिसावी यासाठी ते जीवाचं रान करत असंत. कधी कधी प्रसंग तर खूप बाका होऊन जायचा. निर्माता दिग्दर्शकांना चित्रपटाचे शूटिंग करण्यात कठीण होऊन जायचे. गर्दीवर नियंत्रण करायला कधी कधी पोलिसांना प्राचारण करावे लागे. त्यातून अनेकदा दंगल सदृश्य परिस्थिती देखील निर्माण होत असे. असाच काहीसा प्रकार १९८१ साली प्रदर्शित झालेल्या मुजफ्फर अली यांच्या ‘उमराव जान’ (Umrao jaan) या चित्रपटाच्या एका शूटिंगच्या वेळी झाला होता.
मिर्झा हादी रुसवा यांनी १९०५ साली लिहिलेल्या ‘उमराव जान अदा’ (Umrao jaan) या पुस्तकावर चित्रपटाचे कथानक बेतले होते. पटकथा संवाद मुजफ्फर अली, शमा जैदी आणि जावेद सिद्दिकी यांनी लिहिले होते. ही पिरेड मूवी भारतीय चित्रपटातील एक क्लासिक मूव्ही म्हणून ओळखली जाते जी आज देखील लोकप्रिय आहे. या चित्रपटाला खय्याम यांनी दिलेलं संगीत, शहरीयार यांची गाणी आणि आशा भोसले यांचा स्वर आणि सोबतीला रेखाची अदा आज देखील रसिकांच्या काळजात घर करून आहेत.
या चित्रपटातील एका प्रसंगाच्या चित्रीकरणाच्या वेळी तिथे जमा झालेल्या गर्दीने प्रचंड गोंधळ केला इतका की त्यांनी आपापसात आपल्या बंदुकीतून गोळ्या देखील झाडल्या होत्या. प्रसंग मोठा कठीण होता. शेवटी पोलिसांना पाचारण करावे लागले. आणि प्रेक्षकांना टप्प्याटप्प्याने शूटिंग पाहायला बोलवण्यात आलं. तेव्हा कुठे तो प्रक्षुब्ध जमाव शांत झाला होता. ‘उमराव जान’ (Umrao jaan) या चित्रपटात नवाब सुलतानची भूमिका फारुख शेख यांनी केली होती. टीव्हीवरील एका कार्यक्रमात त्यांनी हा किस्सा सांगितला होता.
चित्रपटात नवाब सुलतान आणि उमराव जानला एका निर्जन स्थळी भेटतात असा प्रसंग होता. मुजफ्फर अली यांनी लखनऊ जवळच्या मलीहापूर येथे एका हवेलीमध्ये या चित्रपटाची शूट करायचे ठरवले. गाव तसे छोटेच होते. हवेली जरी मोठी असली तरी आतील रूम्स खूप छोट्या-छोट्या होत्या. त्यामुळे शूटिंगच्या वेळेला फारुख शेख, रेखा आणि कॅमेरामन एवढेच तिथे जाऊ शकत होते. पण बाहेर आपल्या गावात शूटिंग होते आहे आणि रेखा आलेले आहे ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि प्रचंड मोठ्या संख्येने लोकांनी गर्दी केली. सिक्युरिटीने लोकानां आत जायला प्रतिबंध केला. लोकांच्या सहन शक्ती चा अंत होवू लागला. आमच्या गावात शूट आणि आम्हालाच परवानगी नाही? अपमान. तो जमाव हळूहळू प्रक्षुब्ध होऊ लागला. त्यांना रेखाला पाहायचे होते.
पण हवेलीतील जागा इतकी छोटी होती की शूटिंगला तिथे कुणाला बोलवणे अवघड होते. आता गोंधळ वाढत गेला. त्यातच त्या गर्दीमध्ये दोन-तीन गट पडले आणि त्यांच्यात परस्पर तुंबळ हाणामारी सुरू झाली. इतकी की लोकांनी आपल्या सोबत आलेल्या बंदुकी काढल्या आणि त्यातून हवेत फैरी झाडल्या. वातावरणात कमालीचा तणाव निर्माण झाला. दंगल होते की काय असे वाटू लागले. शेवटी पोलिसांना पाचारण करावे लागले. पोलिसांसमोर देखील ही गर्दी मागे हटायला तयार नव्हती. शेवटी सर्वांनी मिळून एक तोडगा काढला आणि पाच पाच लोकांच्या ग्रुपला शूटिंग पाहायला पाच मिनिटाची वेळ देण्यात आली आणि अशा पद्धतीने हा प्रसंग शूट करण्यात आला. (Umrao jaan)
=======
हे देखील वाचा : जतीन खन्नाचा राजेश खन्ना कसा झाला?
=======
फारूख शेख हा प्रसंग सांगतात म्हणाले, ”खरंतर हा एक रोमँटिक सीन होता. पण आमच्या मनात प्रचंड भीती निर्माण झाली होती. कारण या गर्दीच्या तडाख्यात जर आम्ही सापडलो असतो तर कदाचित जिवंत बाहेर पडू शकलो नसतो! पण दिग्दर्शक आणि पोलिसांनी तो प्रसंग खूप कौशल्याने हाताळला आणि आम्ही सुखरूप त्यातून बाहेर पडू शकलो. शूटिंगच्या वेळी आमच्या मनामध्ये प्रचंड भीती होती पण चेहऱ्यावर मात्र रोमँटिक भाव आणायचे होते अशा कठीण प्रसंगातून आम्ही तो सीन शूट केला!”