
Third Eye Asian Film Festival ची सुरुवात ९ जानेवारीपासून होणार; प्रेक्षकांसाठी ५६ चित्रपटांची मेजवानी !
महाराष्ट्रातील चित्रपट रसिकांसाठी दरवर्षी उत्सुकतेचा विषय ठरणारा थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव (Third Eye Asian Film Festival) यंदा आपल्या २२व्या पर्वासह पुन्हा एकदा मुंबई आणि ठाण्यात होणार आहे. ९ जानेवारी ते १५ जानेवारी २०२६ या कालावधीत सात दिवस चालणाऱ्या या महोत्सवात आशियाई आणि भारतीय चित्रपटसृष्टीतील निवडक व दर्जेदार चित्रपटांचा अनुभव प्रेक्षकांना घेता येणार आहे. आशियाई फिल्म फाऊंडेशनतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या या महोत्सवासाठी यंदा एकूण ५६ चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. हे चित्रपट मुंबईतील प्रभादेवी येथील पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या मिनी थिएटरमध्ये तसेच ठाण्यातील लेक शोर मॉलमधील सिनेपोलीस चित्रपटगृहात प्रदर्शित केले जाणार आहेत. बूसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात FIPRESCI ज्युरी पुरस्कार मिळवलेल्या इंडोनेशियन चित्रपट ‘ऑन यूअर लॅप (पांगकू)’ यांच्या प्रदर्शनाने महोत्सवाची अधिकृत सुरुवात होणार आहे.(Third Eye Asian Film Festival)

गेल्या बावीस वर्षांपासून हा महोत्सव आशियाई आणि भारतीय चित्रपटांमधील उत्कृष्ट कलाकृती महाराष्ट्रातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यंदाचे पर्व विशेष ठरणार आहे कारण ज्येष्ठ चित्रपटकार डॉ. व्ही. शांताराम यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त त्यांच्या अजरामर चित्रपटांचे विशेष प्रदर्शन करण्यात येणार आहे. आशियाई फिल्म फाऊंडेशनचे अध्यक्ष किरण व्ही. शांताराम यांनी या महोत्सवाबद्दल बोलताना हा क्षण आपल्या कुटुंबासाठी आणि चित्रपटप्रेमींसाठी अभिमानाचा असल्याची भावना व्यक्त केली आहे.
==============================
हे देखील वाचा: Dashavatar World Television Premier: ‘या’ दिवशी टेलिव्हिजनवर ‘दशावतार’ पाहता येणार !
==============================
भारतीय चित्रपट स्पर्धा विभागात आसामी, कन्नड, मणिपुरी, मल्याळी, बंगाली आणि नेपाळी भाषांतील चित्रपट दाखवले जाणार आहेत. तर आशियाई स्पेक्ट्रम या विभागात चीन, जपान, हाँगकाँग, तुर्की, इराण, कझाकस्तान, व्हिएतनाम, फिलिपिन्स आणि थायलंडसारख्या देशांतील चित्रपटांचा समावेश आहे. यंदा कन्ट्री फोकस या विशेष विभागात किर्गिस्तान या देशातील समकालीन आणि पारंपरिक कथांवर आधारित चित्रपट सादर केले जाणार आहेत.

महोत्सवात विविध मान्यवरांना विशेष पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. पद्मभूषण सई परांजपे यांना ‘आशियाई चित्रपट संस्कृती पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार असून दिग्दर्शिका उमा दा कुन्हा यांना ‘सत्यजित रे स्मृती पुरस्कार’ देऊन गौरवण्यात येणार आहे. दिवंगत चित्रपट समीक्षक सुधीर नांदगांवकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ यंदाचा विशेष चित्रपट लेखन पुरस्कार चित्रपट अभ्यासक आणि क्युरेटर मिनाक्षी शेड्डे यांना देण्यात येणार आहे. (Third Eye Asian Film Festival)
============================
============================
डॉ. व्ही. शांताराम यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त ‘दो आँखे बारा हाथ’, ‘डॉ. कोटनीस की अमर कहानी’, ‘कुंकू’ आणि ‘नवरंग’ या त्यांच्या गाजलेल्या चित्रपटांचे विशेष प्रदर्शनही महोत्सवात पाहायला मिळणार आहे. चित्रपट प्रदर्शनांसोबतच दिग्दर्शक, तंत्रज्ञ आणि ज्युरी सदस्यांसोबत ओपन फोरम आणि मास्टर क्लासेसचे आयोजन करण्यात आले आहे. चित्रपटप्रेमींना दर्जेदार आशियाई आणि भारतीय सिनेमा एकाच व्यासपीठावर अनुभवता यावा, या उद्देशाने सुरू झालेला थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव यंदाही रसिकांसाठी एक मोठा सिनेमाई उत्सव ठरणार आहे. महोत्सवासाठी प्रतिनिधी नोंदणी अधिकृत संकेतस्थळावर सुरू करण्यात आली आहे.