अमिताभचा राजकारणात गेल्यानंतरचा ‘हा’ पहिला सिनेमा
बॉलीवूड मधील सिनेमाच्या मेकिंगच्या स्टोरी खूप भन्नाट असतात ; पण दुर्दैवाने आपल्याकडे तसा त्या पद्धतीने कोणी इतिहास लिहून ठेवला नसल्यामुळे आज या मेकिंगच्या गोष्टींचा शोध घेण्यासाठी खूप संदर्भ शोधावे लागतात. अमिताभ बच्चन यांचा गाजलेला चित्रपट ‘शहेनशहा’(१९८८) हा सिनेमा अमिताभचा राजकारणात गेल्यानंतरचा कमबॅक केलेला हा पहिला सिनेमा होता. (Amitabh)
या सिनेमाच्या दरम्यान अमिताभ बच्चन एका गंभीर आजाराचा धनी झाला होता. हा आजार होता मायस्थेनिया ग्रेवीस. त्यामुळे या चित्रपटाचे चित्रीकरण लांबत गेले आणि तब्बल पाच-सहा वर्षानंतर हा सिनेमा रिलीज झाला आणि सुपरहिट झाला. या सिनेमाच्या मेकिंगची कहाणी दिग्दर्शक टिनू आनंद यांनी एका मुलाखतीत सांगितली होती. ती खूपच भन्नाट होती. १९८१ साली अमिताभ बच्चन यांनी टिनू आनंद यांच्या दिग्दर्शनात पहिल्यांदा ‘कालिया’ या चित्रपटात काम केले. सिनेमा प्रचंड गाजला. टिनू आनंद यांनी लगेच अमिताभला घेऊन नवीन चित्रपटाची घोषणा केली हा चित्रपट होता ‘शहेनशाह’. (Amitabh)
‘कालिया’ या चित्रपटातील बरीचशी स्टार कास्ट पुन्हा या सिनेमात रिपीट करायचे ठरले. पण या सिनेमाला सुरुवातीपासूनच कुणाची तरी नजर लागली आणि एका मागोमाग विघ्न यायला सुरुवात झाली. १९८३ साली अमिताभ बच्चन यांचा बंगलोर ला ‘कुली’ या चित्रपटाच्या सेटवर मोठा एक्सीडेंट झाला. अमिताभ बच्चन त्यातून अक्षरशः मृत्यूच्या दाढेतून परत आले. त्यानंतर १९८४ साली भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर अमिताभ बच्चन राजकारणात गेले आणि अलाहाबाद इथले खासदार झाले. त्यामुळे त्यांचे नवे चित्रपट साइन करणे टोटली बंद झाले. जे चित्रपट साइन केले होते त्यावरच ते काम करत होते. टिनू आनंद आपल्या ‘शहेनशहा’ या चित्रपटासाठी कायम अमिताभ बच्चन यांना आठवण करून देत होते. पण याच काळात अमिताभ बच्चन मायस्थेनिया ग्रेवीस या दुर्धर आजाराने शिकार झाले आणि त्यांनी चित्रपटात काम करणे टोटली थांबवले.
या दरम्यान दोन वर्षाचा काळ गेला. प्रकृती स्वास्थ्यात फरक जाणवल्यामुळे अमिताभ आपले पुन्हा काम करायला सुरुवात केले . हा सिनेमा ऑक्टोबर १९८७ मध्ये हा चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले. सिनेमा रिलीज साठी तयार झाला. पण त्याच वेळी अमिताभ बच्चन यांच्या आयुष्यात एक मोठे राजकीय वादळ आले. बोफोर्स प्रकरण त्यावेळेला खूप जोरदार चर्चिले जात होते. देशभर अमिताभ बच्चन यांच्याविरुद्ध हवा निर्माण झाली होती. मुंबईमध्ये अमिताभचे चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही असा विरोधकांनी निर्णय घेतला. पण अमिताभ बच्चन यांनी मुंबईत शिवसेनाप्रमुखांची भेट घेतली. यातून तोडगा निघाला आणि १२ फेब्रुवारी १९८८ या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि सुपर डुपर हिट झाला. आता या सिनेमाच्या मेकिंगच्या दरम्यान झालेल्या काही मनोरंजक गोष्टी.(Amitabh)
जेव्हा टीनू आनंद यांनी ‘शहेनशहा’ या चित्रपटाची घोषणा केली. त्यावेळी या चित्रपटाची नायिका म्हणून श्रीदेवीची निवड केली. परंतु श्रीदेवी आणि अमिताभचा ‘इन्कलाब’ हा चित्रपट फ्लॉप झाल्यामुळे श्रीदेवीने या चित्रपटातून काढता पाय घेतला. त्यानंतर या सिनेमा डिंपल कपाडिया ची एन्ट्री झाली. पण तिनं टिनू आनंद यांच्यासोबत मतभेद झाल्यामुळे ती देखील या चित्रपटातून बाहेर पडली. आणि त्या नंतर या सिनेमात मीनाक्षी शेषाद्री चा प्रवेश झाला. हा सिनेमा अमिताभ बच्चन यांच्यासाठी खूप महत्त्वाचा होता. या सिनेमाची कथा जया भादुरी ने लिहिली होती आणि या सिनेमाच्या संवाद टिनू आनंद यांचे वडील इंद्र राज आनंद यांनी लिहिले होते. ‘रिश्ते मे तो हम तुम्हारे बाप लगते है. नाम है शहेनशहा.’ हा अमिताभचा आयकॉनिक डायलॉग इंद्र राज आनंद यांनी लिहिला होता.
या सिनेमात अमिताभ बच्चन याचा अटायर जबरदस्त होता विशेषत: ‘शहेनशहा’ च्या वेषातील लोखंडी कपडे खूप चर्चिले गेले. वस्तुतः हा पोशाख अमिताभचा आधी नव्हताच. टिनू आनंद यांनी त्यांना एक ब्लॅक लेदर जॅकेट घालायचे ठरवले होते. तसे कचींस या फॅशन डिझायनर कडून बनवून देखील घेतले होते. पण या न त्या कारणाने चित्रपटाचे शूटिंग थांबल्यामुळे त्या फॅशन डिझायनर ने ते जॅकेट जितेंद्रला विकून टाकले. जे पुढे त्यांनी ‘आग और शोला’ या चित्रपटात वापरले. नंतर टिनू आनंद यांनी एका दुसऱ्या डिझाईनला घेऊन हॉलीवुड मधील कलाकारांचे कॉस्ट्यूम डिझाईन कसे असतात याचा अभ्यास केला. आणि त्यातूनच शहेनशहाचे कॉस्च्युम ठरले.(Amitabh)
या सिनेमात शेवटी अमरीश पुरीला अमिताभ बच्चन खेचत खेचत कोर्टात आणतो; त्यावेळी जे डायलॉग अमिताभला बोलायचे होते ते तब्बल २३ पानांचे होते. हे सर्व डायलॉग इंद्र राज आनंद जेव्हा लिहिले होते तेंव्हा ते अक्षरशः हॉस्पिटलच्या बेडवर होते. त्यांनी शेवटचा डायलॉग लिहिला आणि काही तासातच प्राण सोडून दिले!(६ मार्च १९८७) जणू हे डायलॉग लिहिण्यासाठीच ते काही काळ जिवंत होते. कारण हॉस्पिटलमध्ये जेव्हा त्यांना ऍडमिट केले होते तेव्हा ते सिरीयस होते. अमिताभ बच्चन यांचा खऱ्या अर्थाने कमबॅक या चित्रपटापासून झाला आणि त्यांना ‘शहेनशहा’ ही उपाधी याच चित्रपटापासूनच मिळू लागली. ‘शहेनशहा’ या चित्रपटापूर्वी आलेल्या ‘कालिया’ या चित्रपटातील डायलॉग देखील इंद्र राज आनंद यांनीच लिहिले होते. त्यातील अमिताभ वर चित्रीत असलेला एक डायलॉग ‘हम भी वो है जहां खडे होते है लाईन वही से शुरू होती है…’ हा आयकॉनीक डायलॉग आज देखील लोकप्रिय आहे. (Amitabh)
या सिनेमासाठी अमिताभ बच्चन यांना फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे नामांकन मिळाले होते. पण पुरस्कार मात्र अनिल कपूर यांना ‘तेजाब’ या चित्रपटासाठी मिळाला. तर अशी होती अमिताभ बच्चन यांच्या सुपरहिट शहंशाह या चित्रपटाची कहाणी!