‘या’ गाण्याचे हटके अंदाजात बोल जिवंत करणारा अभिनेता
‘ये शाम मस्तानी मदहोश किये जाये’ हे गाणं जेवढं आपल्या परिचयाचं आहे; मान वाकडी करत आपल्या हटके अंदाजात पडद्यावर या गाण्याचे बोल जिवंत करणारा अभिनेता त्यापेक्षा जास्त आपल्या स्मरणात आहे. भारतीय चित्रपटांच्या इतिहासावर ज्या काही मोजक्या लोकांचं गारुड जाणवत त्या लोकांच्या यादीत या अभिनेत्याचा फार वरचा नंबर आहे. त्यांच्या अगोदर आणि त्यांच्यानंतर देखील कोणत्याही बॉलीवूड सिताऱ्याला त्यांच्याएवढे प्रसिद्धीचे शिखर गाठता आले नाही. प्रसिद्धी काय असते हेच जणू त्यांनी जगाला दाखवून दिले. आपण कुणाबद्दल बोलतोय हे एव्हाना तुमच्या लक्षात आले असेलच. आपल्या अदाकारीची भुरळ सिनेप्रेक्षकांना घालून, सबंध काळ गाजवणारे किंबहुना काळाच्या त्या पानांवर स्वतःच्या अस्तित्वाचा दबदबा कोरणारे, बॉलीवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना! (Rajesh Khanna)
राजेश खन्ना (Rajesh Khanna) यांचा जन्म पंजाबचा. घरात नाटक, सिनेमाची कुठलीही पार्श्वभूमी नसतांना त्यांना नाटकामध्ये रस निर्माण झाला. कॉलेज वयात त्यांनी भरपूर नाटके केली परंतु सिनेमाची दारे त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने खुलली ते १९६५ साली. झालं असं की, जी.पी. सिप्पी, बी.आर. चोप्रा, शक्ती सामंत यांच्यासारखी दिग्गज मंडळी नवीन कलाकरांच्या, प्रामुख्याने अभिनेत्यांच्या शोधात होती. United producers and film fare association च्या वतीने या कलाकरांचा शोध घेण्याचे काम सुरु होते; याच मोहिमेच्या दरम्यान राजेश खन्ना (Rajesh Khanna) त्यांच्या हाती लागले आणि राजेश खन्नाची रुपेरी पडद्यावर एन्ट्री झाली.
राष्ट्रीय पातळीवर त्यांना खरी ओळख मिळाली ती १९६९ साली आलेल्या ‘आराधना’ या चित्रपटामुळे. खरतर हा चित्रपट शर्मिला टागोर यांच्यासाठी बनवण्यात आला होता, परंतु तो राजेश खन्नाना ओळख देवून गेला. मग काय, राजेश खन्नाने (Rajesh Khanna) त्यानंतर मागे वळून बघितलं नाही. एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे देत त्यांनी बॉलीवूडमध्ये आपलं एकहाती वर्चस्व निर्माण केलं. सिनेमागृहात सहा सहा महिने फक्त त्यांचेच चित्रपट चालवले जायचे.
राजेश खन्नाच्या (Rajesh Khanna) करियरच्या सुरुवातीचा एक किस्सा त्यांच्या एकंदरीत स्वभावाचा अंदाज देवून जातो. राजेश खन्ना यांना त्यांचा पहिला चित्रपट मिळाला. शूटिंगच्या पहिल्या दिवशी कॉलटाईमापेक्षा ते दोन-अडीच तास उशिरा पोहोचले. नवीन मुलगा आहे, पहिला पिक्चर आहे आणि तरीपण हा पहिल्याच दिवशी एवढ्या उशिरा येतो? असा सवाल करत तांत्रिक मंडळी त्यांच्यावर भडकली. असाच उशिरा आलास तर तुझ्या करियरचं काही खरं नाही वगैरेचे सल्लेदेखील काहीजणांनी दिले. राजेश खन्ना (Rajesh Khanna) यावर उत्तर देतांना ठामपणे म्हणाले, हे बघा करीयर वगैरेची ऐसी कि तैसी. करियर एका जागी आणि माझी लाइफस्टाइल एका जागी. कुठल्याही गोष्टींसाठी मी माझी लाइफस्टाइल बदलणार नाही. त्यांचा हा स्वभाव बघून त्या दिवशी सगळेच अचंबित होऊन गेले. अशा लोकांसोबत केवळ दोनच गोष्टी होऊ शकतात, एकतर अशी लोकं आयुष्यात खूप पुढे जातील, नाहीतर त्याचं काहीच होणार नाही. राजेश खन्नाच्या (Rajesh Khanna) बाबतीत दोन्ही गोष्टी घडल्या. ते जेवढ्या वेगाने वर गेले, त्यापेक्षा दुप्पट वेगाने खाली आले.
यासिर उस्मान, ज्यांनी राजेश खन्नाचे (Rajesh Khanna) चरित्र लिहिले ते सांगतात, मी एका महिलेला विचारलं, की राजेश खन्ना तुमच्यासाठी काय होते? ती बोलली, तुम्हाला नाही कळणार. आम्ही जणूकाही प्रियकराला भेटायला चाललोय असे सजून धजून त्यांचे चित्रपट बघायला जायचो. त्यांच्या चित्रपटाला जाणं म्हणजे त्यांच्यासोबत डेटवर जाण्यासारखा प्रकार होता. पडद्यावर ते जे काही करायचे ते फक्त आपल्यासाठीच करत आहेत, अशीच भावना चित्रपटगृहातील प्रत्येक मुलीची असायची.
ज्येष्ठ चित्रपट लेखक सलीम खान सांगतात, त्यांच्यासाठी लोकांमध्ये ज्या प्रमाणात वेडेपणा होता. तो मी ना त्या अगोदर बघितला ना त्यानंतर मला बघायला मिळाला. आशीर्वाद बंगल्याचे फाटक खुलेपर्यंत घरासमोर थांबलेली त्यांची पांढऱ्या रंगाची गाडी त्या थोड्या थोडक्या वेळात मुलींच्या लिपस्टिकने लाल होऊन जायची. जिथून त्यांची गाडी जायची त्या जागची माती उचलून मुली आपल्या भांगात भरायच्या. मुली स्वतःच्या रक्ताने पत्रे लिहून त्यांना पाठवायच्या. ते जिथे जायचे तिथल्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरायचे. लोकांमध्ये त्यांच्याबद्दल एवढ्या भयंकर पातळीचा वेडेपणा होता.
======
हे देखील वाचा : Zara Hatke Zara Bachke: विकी-सारा च्या धमाकेदार सिनेमाचा ट्रेलर पाहिलात का?
======
राजेश खन्नानी (Rajesh Khanna) आपल्या तारुण्यात जेवढी भरभराट अनुभवली तेवढेच आपल्या उतारवयात ते एकटे पडले. त्यांच्या त्या अवस्थेला स्वतः तेच जबाबदार होते असं म्हटलं तर वावग ठरू नये. आयुष्याच्या शेवटच्या दिवसात टक्सच्या कारणांमुळे त्यांचा बंगला ‘आशीर्वाद’ सील केल्यामुळे ते त्यांच्या ऑफिसमध्ये एकटेच राहायचे. ऑफिस बाजूच्या mcdonalds मध्ये जाऊन मला कुणीतरी ओळखेल या आशेने ते तिथे तासनतास बसून राहायचे. कधीतरी कुणीतरी येऊन त्यांना ओळखायचं तेव्हा त्यांना बरं वाटायचं. एकेकाळी प्रसिद्धी काय असते, हे दाखवून देणारा सुपरस्टार आयुष्याच्या शेवटच्या दिवसात एवढा एकटा पडला होता. ते कुठल्याही कार्यक्रमात जायचे तेव्हा त्यांचा साहिरने लिहिलेला एका डायलॉग म्हणून दाखवायचे आणि कदाचित त्यांच्या आयुष्याचा सार, त्याचं दुखण त्यामधून मांडण्याचा प्रयत्न करायचे. तो डायलॉग होता…
इज्ज़ते, शोहरते, चाहतें, उल्फतें ,
कोई भी चीज़ दुनिया में रहती नही
आज मै हूँ जहाँ, कल कोई और था
ये भी एक दौर है, वो भी एक दौर था