विराजसचं स्वप्नही ‘गोड’
तरूण मुलाच्या स्वप्नात कुणी यावं बर… तर त्याला आवडणाऱ्या मुलीनं. पण मराठी टीव्ही इंडस्ट्रीतील चॉकलेट बॉय असलेल्या विराजस कुलकर्णीसारख्या (Virajas Kulkarni) तरूण मुलाच्या स्वप्नात कोण येतं हे जर तुम्ही ऐकलं तर थक्कं व्हाल. माझा होशील ना या मालिकेतील सईचा ड्रीम बॉय असलेल्या विराजसच्या स्वप्नात मात्र येतं ते कंडेन्स मिल्क. आता हे काय नवीन असं प्रश्न नक्कीच तुमच्या ओठावर आला असेल. पण हे अगदी खरं आहे. खाण्याच्या आवडीनिवडीबाबत तो भरूभरून बोलतो. विराजसला लहानपणी कंडेन्स मिल्कचा फडशा पाडायला खूप आवडायचं.
हे देखील वाचा: मुक्ता बर्वे च्या घराचे नाव मधुकृपा का आहे? मुक्तानेच सांगितला याचा किस्सा
पण कंडेन्स मिल्कमध्ये वजन वाढणाऱ्या गोष्टीही भरपूर असल्याचे कळल्यानंतर आणि सध्या तरी तो मालिकेचा हिरो असल्याने फिटनेसला महत्व द्यायला लागत असल्याने त्याला आवडणाऱ्या अनेक पदार्थांवर फुली आली आहे. कंडेन्स मिल्क खाणंही आता बंद झालं असलं तरी लहानपणी ताव मारलेल्या कंडेन्समिल्कची विराजसला आजही आठवण येते. इतकच नाही तर आपण मनसोक्त कंडेन्स मिल्क वरपत असल्याचे स्वप्नही त्याला पडते.
अभिनेत्री मृणाल कुलकर्णी (Mrinal Kulkarni) यांचा मुलगा अशी ओळख मागे टाकत आता विराजस माझा होशील ना या मालिकेच्या निमित्ताने नायक बनला आहे. त्याची ही मालिका सध्या खूपच गाजतेय. यापूर्वी विराजस नाटक, एकांकिका यावर सक्रिय होताच, शिवाय मालिका, सिनेमा यासाठी पडद्यामागे त्याचा खूपच सहभाग असायचा. माझा होशील ना या मालिकेतून त्याला नायक साकारण्याची पहिल्यांदाच संधी मिळाली. सरळमार्गी आदित्य ही भूमिका त्याने अगदी नेटाने केली आहे.
विराजसला एका खास मुलाखतीत खाण्यापिण्याच्या आवडीबाबत विचारलं तेव्हा त्याने त्याच्या खाद्यप्रेमाचे अनेक किस्से सांगितले. विराजस सांगतो, एक तर मी एकुलता एक. मी खूप लहान असल्यापासूनच आई अभिनय क्षेत्रात काम करत असल्याने ती बहुतांशी वेळ घराबाहेर असायची. मग त्यावेळी मी घरात केक, बर्फी बनवण्यासाठी आणून ठेवलेले कंडेन्स मिल्क फस्त करायचो. त्याची टेस्ट मला खूप आवडायची. आईने ज्यासाठी ते आणलेलं असायचं त्यासाठी वापरण्यापूर्वी मी खाऊनच ते अर्ध केलेलं असायचं.
हे वाचलंत का: चौकटीबाहरेचा दिग्दर्शक रवी जाधव
अर्थात डाएटवगैरेचं फॅड नसलेलं ते वय होतं त्यामुळे मला फार फिकीर नव्हती. पण पुढे मी नाटक, एकांकिका करायला लागलो, जाहिरातींच्या ऑफर आल्या किंवा मी स्वत: फिटनेसकडे लक्ष द्यायचं ठरवलं तेव्हा मात्र एक चमचा कंडेन्समिल्कमधून कितीतरी कॅलरींचे सेवन होते आणि ते वजनवाढीला कारणीभूत असते हे कळल्यावर मात्र कंडेन्स मिल्क आणि मी दुरावलो. गेल्या कित्येक वर्षात मी ते खाल्लेलं नाही.
विराजस फार फूडी नाही. तो गमतीने म्हणतो की, जशी अवकाशात जाताना शास्त्रज्ञांना जशी विटॅमिन्सची गोळी दिली जाते जेणेकरून ते स्पेसमध्ये बरेस दिवस काहीही न खाता राहू शकतील. त्यांना भूक लागणार नाही. अशी एखादी गोळी जर भविष्यात सर्वसामान्यांसाठी उपलब्ध झाली तर त्याचा पहिला आणि कायमस्वरूपी ग्राहक मीच असेन. विराजसला जेवायचा कंटाळा येतो हे त्याच्या या उत्तरावरून दिसलं असेलच. पण हेल्दी खाणं आवडत नसलं तरी खायला लागतं हे त्यानं मान्य केलं आहे.
आजही मालिकेच्या शूटसाठी सेटवर जाण्यापूर्वी एक ग्लास दूध आणि चार बदाम खाणे हा त्याची आई मृणालचा नियम तो काटेकोरपणे पाळतो. दुपारच्या जेवणात तो भात खात नाही. विराजसला रात्रीचं जेवण मात्र निवांत, गप्पा मारत करायला खूप आवडतं. एकतर कामाचं टेन्शन संपलेलं असतं आणि रोज रात्री त्याला प्रोटीनसाठी आवडतं चिकन खायला मिळत असल्याने तो खुश असतो.
सेलिब्रिटी असल्याने आता विराजसच्या खाण्याच्या सवयी बदलाव्या लागल्या असल्या तरी लहानपणी खालेल्या कंडेन्स मिल्कला तोड नाही असं तो आवर्जून सांगतो. सध्या तरी त्याला कंडेन्स मिल्क खाण्याची इच्छा स्वप्नातच पूर्ण करावी लागते.