शम्मी कपूरसाठी पहिल्यांदा किशोर कुमारांनी गायलं हे गाणं
काही गाणी इतिहास निर्माण करणारी असतात. असेच हे एक गाणे ऐंशीच्या दशकामध्ये आले होते. या गाण्याचं खूप वैशिष्ट्यपूर्ण असं महत्त्व होतं कारण शम्मी कपूर यांच्यासाठी पहिल्यांदा या गाण्यांमध्ये किशोर कुमार गात होते. खरंतर शम्मी कपूर आणि किशोर कुमार दोघेही समकालीन परंतु एकमेकांना सोबत काम करण्याची किंवा शम्मी कपूर साठी गाण्याची संधी कधी किशोर कुमारला मिळालीच नाही. शम्मी कपूर साठी कायम मोहम्मद रफी यांचा स्वर असायचा.
अर्थात मन्ना डे, मुकेश तलत यांनी देखील शम्मी कपूरसाठी आपला स्वर दिला आहे. पण किशोर कुमार आणि शम्मी कपूर हे समीकरण काही केल्या जमत नव्हतं. १९८२ साली दिग्दर्शक सुभाष घई यांचा ‘विधाता’ हा चित्रपट आला होता. या चित्रपटात दिलीप कुमार, शम्मी कपूर, संजीव कुमार, संजय दत्त, पद्मिनी कोल्हापुरे यांच्या प्रमुख भूमिका होत्या. चित्रपटाची गाणी आनंद बक्षी यांनी लिहिली होती. तर संगीत कल्याणजी आनंदजी यांचे होते. या सिनेमात शम्मी कपूरवर चित्रीत एक गाणे होणार होते हे गाणे गाण्यासाठी जेव्हा किशोर कुमारला बोलावण्यात आले तेव्हा तो जाम खुश होता. (Shammi Kapoor)
कारण आयुष्यात पहिल्यांदा त्याला शम्मी कपूरसाठी गायचे होते. तो मोठ्या खुशी खुशी मध्ये ताडदेवच्या फेमस रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये आला. पण आल्या आल्या चपापला. कारण तिथे तब्बल सात गायिका बसलेल्या होत्या. या गायिका होत्या अलका याज्ञिक, अनुराधा पौडवाल, साधना सरगम, पद्मिनी कोल्हापुरे, शिवानी कोल्हापुरे, कांचन आणि हेमलता !
या सर्व गायिका पाहून किशोर कुमार म्हणाला,” मैने तो सुना यहा मेरे गाने की रेकॉर्डिंग है…” तेव्हा संगीतकार कल्याणजी आणि म्हणाले,” हा दादा आपके ही गाने कि रेकॉर्डिंग है.” त्यावर किशोर कुमार म्हणाले ,” तो फिर इतनी सारी ये सारी देवीयां यहां क्या कर रही है?” त्यावर संगीतकारांचे उत्तर होते ,” दादा, आपके साथ ये सात गायिका गाने वाली है!” (Shammi Kapoor)
त्यावर किशोर कुमार म्हणाले ,” ना बाबा ना मरवाना चाहते हो क्या इस गरीब को ? इन सात देवीयों के साथ मै अकेला कैसे गा सकता हू? “ त्यावर सुभाष घाई म्हणाले,” दादा सिनेमा मे सिच्युएशन ऐसा है की आपको इनके के साथ गाना पडेगा!” त्यावर किशोर कुमार म्हणाले,” इन सभी के साथ गाते गाते मेरी तो छुट्टी हो जायेगी…” असे म्हणून तो रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये पळू लागले. त्याच्या मागे कल्याणजी ! हा सगळा गमती जमती मध्ये प्रकार चालला होता. (Shammi Kapoor)
============
हे देखील वाचा : अमिताभचा राजकारणात गेल्यानंतरचा ‘हा’ पहिला सिनेमा
============
शेवटी कल्याणजी ने त्यांना पकडून आणले आणि गाण्याची रिहर्सल सुरू झाली आणि गाणे एकदाचे रेकॉर्ड झाले. किशोर कुमारने आधी केलेल्या धमाल मजेमुळे सर्वांचा मूड बदलला. गाणे भन्नाट बनले. शम्मी कपूर साठी हे किशोरचे पहिलेच गाणे होते ! गाण्याचे बोल होते ‘सात सहेलिया खडी खडी फरियाद सुनाई घडी घडी’… एक गायक आणि सात गायिका हे कॉम्बिनेशन बॉलीवूड मध्ये कदाचित एकमेव असावे. परंतु गाणे रेकॉर्ड झाल्यानंतर एक मोठे वादळ निर्माण झाले. हे गाणे अश्लील आहे असे म्हणून या गाण्यावर आकाशवाणी आणि दूरदर्शन वर बंदी घालण्यात आली पुढे अनेक वर्ष हे गाणे या माध्यमांमधून वाजत नव्हते. चित्रपटातून मात्र हे गाणे प्रचंड गाजले पुढे कॅसेट मधून घरोघरी पोहोचले.