Jaran Marathi Movie Motion Picture: विवाहिता आणि बाहुली, काय आहे

Timepass 3 Movie Review: दोन घडीचा विरंगुळा; थोडा संथ, थोडा हटके
“बघता बघता व्यापुनी जातो देहभान अमुचे सगळा… रडणाऱ्याचे अश्रू पुसतो लकेर देतो हास्याची…” हे ‘मास्टर कृष्णराव’ यांचे शब्द आज पुन्हा आठवतात. रवी जाधव दिग्दर्शित ‘टाइमपास ३’ हा सिनेमा देखील ‘हास्याची लकेर देतो…’ प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य खुलवतो. त्यांचा विरंगुळा करतो. निखळ करमणूकीसाठी जे आवश्यक आहे; ते हा सिनेमा देण्याचा प्रयत्न करतो. मध्यंतरीच्या वर्षात मराठी सिनेमाच्या पडद्यावर काही अपवाद वगळता तितकेच ठेवणीतील विनोदी चित्रपट आठवत नाहीत. (Timepass 3 Movie Review)
चिक्कार विनोदी सिनेमांची निर्मिती या मध्यंतरीच्या वर्षांत मराठी सिनेविश्वाच्या चौकटीत झाली. पण, हे सिनेमे शब्दबंबाळ आणि स्लॅपस्टिकमध्येच अडकलेले दिसले. या अशा सिनेमांचा देखील एक खास प्रेक्षकवर्ग जरूर आहे. पण, निखळ मनोरंजन करणाऱ्या विनोदी सिनेमांची संख्या या सगळ्यात तुलनेनं कमी होती. त्यातच आता ‘टाइमपास ३’ हा सिनेमा निखळ करमणूक करण्यात ग्रेट म्हणता येणार नाही.. पण, तुलनेनं उजवा आहे. टीपी ३ ‘सिनेमा’ म्हणून कदाचित अव्वल नसेल तर पैसावसूल जरुर आहे.
श्रवणीय गाणी, देखणा नाच आणि कलंदर कलाकारांचा अभिनय; असा मिलाप यावेळी टीपी ३ मध्ये. थोडक्यात सांगायचं तर, ‘टाइमपास’ पेक्षा दहा पैसे आणि ‘टाइमपास २’ पेक्षा दहा पैसे जास्त; असा हा ‘टाइमपास ३’ आहे. सुरुवातीचे हे दोन सिनेमे पाहिले नसतील, तरी काही हरकत नाही. थेट टीपी ३ तुम्ही पाहू शकता. आणि कथेतील संदर्भ देखील तुम्हाला लागतील.

पहिल्या ‘टाइमपास’ सिनेमाचा सिक्वल आणि ‘टाइमपास २’चा प्रीक्वल असलेला असा हा मधला ‘टाइमपास ३’. पहिलं न मिळालेलं प्रेम विसरण्यासाठी दुसरं प्रेम करावं आणि पुन्हा ‘प्रेमाच्या चक्रव्युहात’ अडकावं; अशीच काहीशी यंदाची कहाणी आहे. प्राजूचं प्रेम विसरण्यासाठी दगडूच्या (प्रथमेश परब) आयुष्यात नवीन प्राजू यायला हवी, असं दगडू गँगला वाटतंय आणि नेमक याच वेळी दगडूच्या आयुष्यात प्रेमाची नवी ‘पालवी’ फुटते.
प्रेमभंग झालेला दगडू तीन वर्ष अभ्यासात ‘गळपटला’ आहे. आता तो कसाबसा बारावी ३६ टक्के मिळवत पास झालाय. कॉलेजमध्ये त्याच्या आयुष्यात एक मुलगी येते. दगडूच्याच कॉलेजात, त्याच्याच वर्गात शिकणारी बिनधास्त, डॅशिंग पालवी (ऋता दुर्गुळे). तिचे वडील दिनकर पाटील (संजय नार्वेकर) हे एरियाचे भाई आहेत. परिणामी त्यांची मुलगीही तशीच भाईगिरी करणारी आहे. ती ‘टाइमपास १’ मधील दगडू सारखी बेधडक आणि बिनधास्त आहे. (Timepass 3 Movie Review)
एकीकडे दगडूच्या आयुष्यात आलेली पालवी ही भाईगिरी करणारी.. आणि दुसरीकडे स्वतः दगडू आता सभ्य झाला आहे. त्याला आता अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. इंग्रजी शिकायचं आहे. भाईगिरी पासून तो दोन हात लांबच राहतोय. असंच सर्व आलबेल आहे आणि पालवीला देखील तिचा प्रियकर असाच ‘सभ्य’ हवा असतो. ती आता दगडूच्या प्रेमात पडते आणि दगडूचं ग्रह फिरतात.

दगडू तिला चटकन प्रेमाची कबुली देऊन टाकतो. पण, दगडूच्या याही प्रेमात ‘शाकाल’ (वैभव मांगले) नामक मिठाचा खडा पुन्हा पडतो. आता त्यामुळे नेमकं पुढे काय होतं? सुधारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दगडूच्या आयुष्यात नेमकी त्याच्याच स्वभावाची मुलगी आल्याने त्याचा नेमका काय गोंधळ उडतो? त्याला प्राजूची लागलेली ओढ कमी होते की, आपल्यासारखीच असलेल्या पालवीची गोडी लागते? या दोघांमध्ये नेमकं मैत्रीचं नातं बनतं की, प्रेमाचं नातं फुलतं? यात दगडूला खरंच प्रेम होणार की, त्याच्या प्रेमाचा गेम होणार? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला सिनेमा पाहायला हवा.
दगडूच्या भूमिकेतील प्रथमेश परब आणि पालवी ऋता दुर्गुळेसोबतच, माधव लेले उर्फ शाकाल म्हणजेच वैभव मांगले, शांताराम परब म्हणजे भाऊ कदम, आरती वडगबाळकर, दगडू गँग मधील ओंकार राऊत, मनमित पेम, जयेश चव्हाण आणि भाईच्या जबरदस्त भूमिकेतील संजय नार्वेकर यांनी दमदार काम केलंय. सर्वच कलाकारांनी आपापली भूमिका लीलया साकारली आहे.
अभिनेत्री ऋता दुर्गुळे हिचे दोन सिनेमे सलग प्रदर्शित झाले आहेत. एकीकडे ‘अनन्या’ आणि आता ‘टाइमपास ३’. कौतुकाची बाब म्हणजे दोन्ही सिनेमातील ऋता विभिन्न आहेत. एक अभिनेत्री म्हणून तिनं या निमित्तानं स्वतःचं अभिनय कौशल्य सिद्ध केलं आहे. सिनेसृष्टीच्या पडद्यावर ती नक्कीच ‘लंबी रेस का घोडा’ ठरणार आहे. तिच्या अभिनयातील सहजता आणि कन्व्हिन्सिंगनेस विशेष कौतुकास्पद आहे. (Timepass 3 Movie Review)

दिग्दर्शकीय पातळीवर सिनेमा आखीव रेखीव आहे. रवी जाधव यांनी व्यावसायिक सिनेमासाठी आवश्यक असलेला फंडा सिनेमात पुरेपूर वापरला आहे. पण, सिनेमात पटकथेत डगमगणारा आहे. अनेक प्रसंगांमध्ये तो रटाळ होतो. काही प्रसंग ताणल्याने प्रेक्षकांचं सिनेमावरील लक्ष विचलित होतं. पण, पुन्हा अचूक ठिकाणी येणाऱ्या सिनेमातील गाण्यांनी प्रेक्षक पुन्हा सिनेमाशी जोडला जातो.
सिनेमातील ‘साई तुझं लेकरू’, ‘लव्हेबल’, ‘कॉल्डड्रिंक’, ‘वाघाची डरकाळी’, ‘नजर काढ देवा’ ही पाचही गाणी उत्तम झाली आहेत. या गाण्यांमधील कलाकारांचं सादरीकरण देखील सरस आहे. अमितराजचं संगीत आणि क्षितिज पटवर्धनच्या शब्दांनी सिनेमाला नवी रंगत आणली आहे. ‘रिक्षाच्या हॉर्न मधनं निघाली वाघाची टरकळी..’ हे गाण्याचे शब्द आजच्या राजकीय परिस्थितीकडे नक्कीच इशारा करणारे आहेत. (Timepass 3 Movie Review)
=================
हे देखील वाचा – Ananya Movie Review: जगण्याकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघणाऱ्या माणसांची गोष्ट म्हणजे ‘अनन्या’
=================
सिनेमातील संवादही ‘हसा चकटफू’ शब्दांची बेअरिंग संवाद लेखक प्रियदर्शन जाधव यानं उत्तम पकडली आहे. सोबतच प्रत्येक पात्राला स्वतःची संवाद शैली आणि शब्दभंडार त्यानं देऊ केला आहे. एकदंरच यावेळचा ‘टाइमपास ३’ पाहून तुम्ही मस्त टाइमपास करु शकता.
सिनेमा : टाइमपास ३
निर्मिती : मेघना जाधव, झी स्टुडिओज
कथा, दिग्दर्शक : रवी जाधव
पटकथा : प्रियदर्शन जाधव, रवी जाधव
कलाकार : प्रथमेश परब, ऋता दुर्गुळे, संजय नार्वेकर, भाऊ कदम, ओंकार राऊत, मनमित पेम
संगीत : अमितराज
गीत : क्षितिज पटवर्धन
दर्जा : तीन स्टार