दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
रात्रीस खेळ चाले…
आपल्याला रहस्यमय मालिका पाहायला खूप आवडत असतं आणि रहस्यमय मालिकांचं संगीत ही सुद्धा वातावरण निर्माण करणारी एक जमेची बाजू असते. ‘रात्रीस खेळ चाले’चे पहिले पर्व जेव्हा सुरु होणार होते, तेव्हा संगीतकार पंकज पडघण यांच्याकडे शीर्षकगीताला संगीत देण्याची जबाबदारी आली होती. एक संगीतकार म्हणून काहीतरी वेगळं करावं, असं त्याच्या मनात होतं. शीर्षकगीताचे शब्द मिळाल्यावर सायली पंकज हिच्या स्वरात स्क्रॅच रेकॉर्डिंग करण्यात आले आणि ते चॅनलकडे पाठवण्यात आले. या शीर्षकगीतासाठी काही गायिकांच्या नावाचा विचार झाला होता, पण सायलीच्या स्वरातील ‘रात्रीस खेळ चाले’ चे स्क्रॅच रेकॉर्डिंग निर्मात्यांना आणि चॅनल मधील टीमला खूप आवडले. झी मराठीचे निलेश मयेकर यांनी पंकजला सांगितले की आम्हाला सायलीच्याच स्वरात हे शीर्षकगीत रेकॉर्ड करायचे आहे.
सायलीने या गाण्यात एक गायिका म्हणून ‘फेड इन फेड आउट’ चा आणि ‘हॉलो’ पद्धतीचा उपयोग करून गाण्यात तो रहस्याचा भाव उत्तमपणे आणला आहे. या गीताची लोकप्रियता खूप आहे. पर्व पहिले जेव्हा शंभर भाग पूर्ण करणारे ठरले, त्या पार्टीत सुद्धा सायलीने हे शीर्षकगीत सादर केले. संतोष अयाचित यांना देखील हे गीत खूप आवडले आणि त्यांनतर १०० डेज मालिकेच्या वेळी त्यांनी आलाप सुद्धा सायलीच्या स्वरात रेकॉर्ड केला.’रात्रीस खेळ चाले’ चे दुसरे पर्व करायचे ठरले, तेव्हा सुद्धा सायलीच्या स्वरात या मालिकेचे देखील शीर्षकगीत रेकॉर्ड झाले.
गाण्याची चाल तीच, संगीतकार देखील पंकजच आणि गायिका देखील सायलीच! पुन्हा शीर्षकगीताची हीच टीम आपल्यासमोर रात्रीस खेळ चाले पर्व दोन चे शीर्षकगीत घेऊन आली. सायली म्हणते, “रहस्यमय मालिकांचे शीर्षकगीत गाणे हे खरे आव्हान आहे.
यातील प्रत्येक ओळीच्या कॉर्ड्स वेगळ्या आहेत आणि त्यामुळे ते आव्हानात्मक आहे.”
या गीताचे शब्द
“पाचोळा सैरा वैरा, वारा पिसाट वाहे
भयभीत उभे हे झाड, पान पान शांत आहे
सावल्या मुक्याने हलती, भवताली विणती माया
डोहाच्या खोल तळाशी, अतृप्त पसरली छाया
निःशब्द तरंग उठती, अंधार चांदणे हाले
आकार गूढ धुक्याला आले, विरून गेले
रात्रीस खेळ चाले, रात्रीस खेळ चाले
या गाण्याचा अजून एक किस्सा आहे. ‘रात का हैं खेल सारा’ या हिंदी मालिकेचे शीर्षकगीत देखील सायलीने गायले आहे, हे आणखी एक वैशिष्ट्य आहे.