टॉम अल्टर: प्रेक्षकांचा आवडता निळ्या डोळ्यांचा गोरा साहेब!
‘आराधना’ हा राजेश खन्नाचा चित्रपट पाहून मसुरीचा एक तरुण या सिनेमाच्या इतका प्रेमात पडला त्याने त्याची शिक्षकी पेशाची चांगली नोकरी सोडून दिली आणि सिनेमात आला! कोण होता तो तरुण ? आणि काय आहे नेमका किस्सा ?
सत्तर आणि ऐंशीच्या दशकामध्ये हिंदी सिनेमात एक इंग्रजी चेहरा कायम पडद्यावर दिसायचा हा चेहरा होता टॉम अल्टर (Tom Alter) यांचा. त्यांनी २०० हून अधिक चित्रपटात भूमिका केल्या. ख्रिश्चन कुटुंबात जन्मलेले टॉम अल्टर हे शंभर टक्के भारतीय होते. त्यांना इथली संस्कृती खूप आवडायची. धर्मनिरपेक्षता हा या देशाचा प्राण आहे असे ते नेहमी म्हणायचे. शिक्षक म्हणून त्यांनी त्यांचं करिअर सुरू केलं होतं. पण सुपरस्टार राजेश खन्ना यांचा ‘आराधना’ हा चित्रपट त्यांनी पाहिला आणि ते या चित्रपटाच्या आणि राजेश खन्नाच्या प्रेमात पडले!
त्यांचं राजेश खन्ना प्रेम इतकं प्रचंड होतं की त्यांनी एक आठवड्यात तब्बल सात वेळेला ‘आराधना’ हा सिनेमा बघितला आणि पुढची दोन वर्ष राजेश खन्नाचा एकही सिनेमा त्यांनी सोडला नाही. त्यांचे चित्रपट प्रेम एवढे वाढले की त्यांनी एक दिवस चक्क शिक्षकी पेशाला राम राम ठोकून अभिनयाच्या दुनियेत यायचं ठरवलं. १९७२ साली ते पुण्याच्या एफ टी आय आयमध्ये दाखल झाले आणि दोन वर्षाचा अभिनयाचा कोर्स त्यांनी तिथे पूर्ण केला. त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं, “मी ‘राजेश खन्ना’ बनण्यासाठी हिंदी सिनेमात आलो होतो!”
एफ टी आय आयला तिथे त्यांचे (Tom Alter) क्लासमेट होते बेंजामिन गिलानी आणि नसिरुद्दीन शहा. या तिघांनी मिळून नंतर एक नाटक कंपनी देखील ‘मोटली’. या त्यांच्या संस्थेच्या वतीने त्यांनी अनेक नाटकं केली. त्यात प्रामुख्याने मिर्झा गालिब आणि मौलाना अबुल कलाम आझाद यांच्यावरील नाटके लोकप्रिय आहे. ‘मोटली’ या त्यांच्या थियेटर ग्रुपच्या वतीने त्यांनी सॅम्युअल बेकेट यांचे ‘वेटिंग फॉर द गोदो’ हे नाटक पृथ्वी थियेटरवर सादर केले होते. प्रेक्षकांनी या नाटकाला उदंड प्रतिसाद दिला.
टॉम अल्टर (Tom Alter) उर्दू अतिशय सफाईने बोलंत. त्यांचं उर्दू बोलणं अक्षरशः ऐकत रहावेसे वाटायचं. खरंतर त्यांच्या या उर्दू बोलीभाषेचा आपल्या हिंदी सिनेमात फारसा उपयोग कधी कोणी करून घेतला नाही पण नाटकांमधून त्यांनी त्यांचं उर्दू शब्दोच्चार , बोलणं खूप चांगल्या पद्धतीने दाखवलं होतं. नाटकातून कामे ते करत होतेच पण त्यांना सिनेमात यायचं होतं. त्यांचे देखणे रूप, इंग्रजी बोलणं यामुळे त्यांच्याकडे तशाच भूमिका चालून आल्या.
त्यांचा हिंदी चित्रपटात प्रवेश रामानंद सागर यांच्या १९७५ सालच्या ‘चरस’ या चित्रपटापासून झाला. त्यानंतर ‘शतरंज के खिलाडी’, गांधी, जुनून, कुदरत, क्रांती, राम तेरी गंगा मैली अशा अनेक चित्रपटातून ते दिसत राहिले. त्यांच्या लुकवरून त्यांना ब्रिटिश अधिकाऱ्याच्या भूमिका ऑफर होत असायच्या. प्रेक्षकांना देखील हा निळ्या डोळ्याचा गोरा साहेब खूप आवडायचा!
“तुम्ही माझ्या रूपापेक्षा माझ्या अभिनयाकडे पहा आणि तशा भूमिका मला ऑफर करा!” असं तो कायम म्हणायचा. पण दुर्दैवाने टॉम अल्टर (Tom Alter) यांना त्यांच्या अभिनयासाठी फारसे आठवले जात नाही. पण रंगभूमीवर त्यांनी खूप चांगले काम केले आहे. रंगभूमीवर त्यांनी साहीर लुधियानवी यांची भूमिका साकारली. त्यांनी काही हॉलीवूड सिनेमातून आपल्या अभिनयाचे रंग दाखवले.
==========
हे देखील वाचा : पन्नासच्या दशकात दिलीप कुमारवर होणार होता ॲसिड अटॅक!
==========
अभिनयासोबतच ते क्रीडा पत्रकार म्हणून देखील कार्यरत होते. सचिन तेंडुलकर यांचा पहिला व्हिडीओ इंटरव्यू घेण्याचे भाग्य त्यांना लाभले होते. त्यावेळी सचिनचे वय अवघे पंधरा वर्षे होते. सचिन तेंडुलकर याचा उल्लेख कायम आपल्या मुलाखतीत करत असतात. स्टार स्पोर्ट्सवर त्यांनी क्रीडा समालोचन केले. बऱ्याच नियतकालिकातून त्यानी स्पोर्ट्सवर लिखाण केले. एकून सर्व गुण संपन्न असे ते व्यक्तीमत्व होते.
टॉम अल्टर (Tom Alter) यांना पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हिंदी सोबतच त्यांनी अनेक प्रादेशिक चित्रपटातून देखील काम केले. शांताराम बापू यांच्या ‘चानी’ या चित्रपटात देखील त्यांची भूमिका होती. २९ सप्टेंबर २०१७ रोजी त्यांचे निधन झाले. राज्यसभा टीव्हीवरील गुफ्तगू या कार्यक्रमात त्यांनी प्रदीर्घ मुलाखत दिली होती त्यात त्यांनी आपली मते परखडपणे मंडळी होती.