टॉम अँड जेरीबद्दल या गोष्टी तुम्हाला माहिती नसतील
लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या मनात एक विशेष जागा असणारा शो म्हणजे टॉम अँड जेरी. त्यांची धम्माल, मस्ती, जेरीचे उद्योग, टॉमचा जेरीला पकडण्याचा व्यर्थ प्रयत्न आपण लहानपणापासून अनेकदा अनुभवला असेल. या शो च्या दिग्दर्शकांपैकी एक दिग्दर्शक आणि ऑस्कर अवोर्ड विजेते संकलक जीन डायच यांचे नुकतेच निधन झाले आहे. या निमित्ताने टॉम अँड जेरी शो च्या या काही इंटरेस्टिंग गोष्टी तुमच्यासमोर मांडण्याचा एक प्रयत्न
आजही इंटरनेटवर आणि चॅनल्सवर आनंदाने फॉलो केल्या जाणाऱ्या टॉम अँड जेरी शोची निर्मिती १९४० मध्ये विलियम हॅना आणि जोसेफ बार्बेरा यांनी केली होती. आजही ८० वर्षांनंतरही या शो ची लोकप्रियता कायम आहे, यामध्येच या निर्मितीचे यश दडलेले आहे. गंमतीचा भाग म्हणजे या शो ची निर्मिती करणाऱ्या एमजीएम स्टुडिओने पहिल्या एपिसोडनंतर या शो ची निर्मिती न करण्याचा निर्णय घेतला होता. मांजर आणि उंदरांवर अनेक वेगवेगळ्या सिरीज असल्याने त्याच विषयावर आधारित सिरीजची पुनर्निर्मिती टाळण्याचा त्यांचा विचार होता. असं झालं असतं तर आपण मोठ्या मनोरंजनाला मुकलो असतो. मात्र पहिला एपिसोड अत्यंत लोकप्रिय ठरल्यानंतर विलियम आणि जोसेफ यांना या संकल्पनेतले यश लक्षात आले आणि त्यांनी पुढे जाऊन या शो ची निर्मिती केली. तेव्हापासुन पुढे जाऊन मुळ शो चे १६३ वेगवेगळे एपिसोडस तयार झाले. याचबरोबर या संकल्पनेवर आधारित टॉम अँड जेरी शो च्या विविध सिरीजसुद्धा आजपर्यंत लोकांसमोर आल्या आहेत.
या शोच्या नावाबद्दलसुद्धा असाच एक किस्सा प्रचलित आहे. टॉम अँड जेरी ही नाव आणि या शोचं नाव ठरण्याआधी जेस्पर अँड जिंक्स हे नाव या सिरीजला देण्यात आलं होतं. त्यानंतर निर्मात्यांनी नाव बदलण्याचा निर्णय घेतला. या शो चे नाव ठरवण्यासाठी खास स्पर्धा आयोजित करण्यात आली होती आणि विजेत्यांना ५० डॉलरचे बक्षिससुद्धा देण्यात आले होते. विशेष म्हणजे सर्व नावांमधून चिठ्ठीच्या माध्यमातून शो चे नाव ठरवण्यात आले. आणि त्यातून टॉम अँड जेरी या नावाची निवड झाली. त्या काळामध्ये ख्रिसमस स्पेशल मिक्स ड्रिंकचे नाव टॉम अँड जेरी असे होते त्यावरून हे नाव डोक्यात आलं होतं. त्यानंतर हीच नाव मुख्य पात्रांना देण्याचा निर्णय झाला.
या मालिकेतील प्रत्येक पात्राचा लुक आणि त्याचे बारकावेही आपल्याला चांगलेच लक्षात आहेत. मात्र १९५० च्या दरम्यान सुरुवातीला एपिसोडसमध्ये टॉम मात्र ४ पायांवर चालणारा बोका दाखवण्यात आला होता. पुढे जाऊन त्यामध्ये बदल करण्यात आला आणि दोन पायांवर माणसांप्रमाणे चालणारा लुक टॉमला मिळाला. तर जेरीचा लुक मात्र आहे तसाच कायम ठेवण्यात आला होता.
टॉम आणि जेरी मधली भांडणं आणि मिश्किलपणा जसा लोकांना भावला तशीच त्यांची मैत्रीही लोकांनी अनुभवली आहे. सुरुवातीच्या मूळ सिरीजच्या एपिसोडसमध्ये टॉम आणि जेरीची मैत्रीसुद्धा दाखवण्यात आली आहे. मात्र आजही लोकांना टॉम आणि जेरीमधील भांडणं आणि त्यांची मस्ती अधिक लक्षात राहते.
आज घराघरात पोचलेल्या या शो साठी निर्माते आणि दिग्दर्शकांना ७ ऑस्कर पुरस्कार प्राप्त आहेत. त्याचबरोबर इतर ६ ऑस्कर पुरस्कारांसाठी नामांकनसुद्धा प्राप्त आहेत. एकंदरच कोणत्याही वयोगटातील लोकांनी बघावा असा हा शो आजही आपल्या सगळ्यांना मनापासून आवडतो. या मालिकेच्या मूळ टीमला आणि त्याच्या निर्मात्यांना याचे श्रेय नक्कीच दिले पाहिजे.
आदित्य बिवलकर