‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
देशभक्तीवर आधारित ५ सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट
यावर्षी आपला देश स्वातंत्र्याचं अमृत महोत्सवी वर्ष साजरं करतोय. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजनही केलं जातंय. देशभक्तीने भारावलेल्या या वातावरणात देशभक्तीपर चित्रपट बघायची तीव्र इच्छा निर्माण झाली असेल, तर अशाच काही चित्रपटांविषयी माहिती घेऊया (Top 5 Bollywood Patriotic Movies)
१. कर्मा
१९८६ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट नव्वदच्या दशकात प्रचंड लोकप्रिय झाला होता. त्यावेळी १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारीला हमखास हा चित्रपट टीव्हीवर दाखवला जात असे. राणा विश्व प्रताप सिंग हा एक उच्चपदस्थ पोलीस अधिकारी. तुरुंगामधील गुन्हेगारांना सुधारण्यामध्ये त्याचा हातखंडा. एके दिवशी एका दहशतवादी संघटनेमधील डॉ. डांग नावाच्या दहशतवाद्याला तुरुंगात ठेवले जाते. परंतु राणाच्या अनुपस्थित दहशतवादी तुरुंगावर हल्ला करून डॉ डांगची सुटका करतात. यामध्ये तुरुंगातले कैदी, पोलीस आणि राणाचे कुटुंबीयही मारले जातात.
व्यथित झालेला राणा आपल्या पदाचा राजीनामा देऊन डॉ डांगला पकडण्याची योजना आखतो. या मिशनसाठी तो फाशीची शिक्षा झालेल्या तीन कैद्यांची निवड करतो. पुढे राणा यशस्वी होतो का, त्या तीन कैद्यांचं काय होतं, या सगळ्या गोष्टी चित्रपटात पाहण्यासारख्या आहेत.
सुभाष घई दिग्दर्शित या चित्रपटात दिलीप कुमार, नूतन, अनुपम खेर, अनिल कपूर, जॅकी श्रॉफ, नसरुद्दीन शहा आदी कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. चित्रपटातील सर्वच गाणी प्रचंड लोकप्रिय झाली होती. (Top 5 Bollywood Patriotic Movies)
२. तिरंगा
साधारणतः नव्वदच्या दशकात जन्मलेल्या प्रत्येकालाच देशभक्तीवर आधारित चित्रपट म्हटल्यावर सर्वात आधी डोळ्यासमोर येत असेल तो ‘तिरंगा’ हा चित्रपट. दहशतवादी प्रलयनाथ गुंडास्वामीने भारताला त्याच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच १५ ऑगस्ट रोजी नष्ट करण्याची योजना आखलेली असते आणि यासाठी आवश्यक क्षेपणास्त्रे तयार करण्यासाठी तो देशभरातील प्रमुख शास्त्रज्ञांचे अपहरण करायची योजना आखातो. त्यांचे मनसुबे उधळून लावणारी एकमेव व्यक्ती असते, ती म्हणजे इन्स्पेक्टर रुद्रप्रताप चौहान. परंतु गुंडास्वामी रुद्रप्रतापची हत्या करतो.
शिवाजीराव वागळे आणि ब्रिगेडियर सूर्यदेव सिंग यानंतर रुद्रप्रतापच्या हत्येचा तपास करत असतात. परंतु यानंतर अनेक वेगवेगळ्या घटना घडत जातात. गुंडास्वामीला पकडण्यात या दोघांना यश येतं का, हे दोघे मिळून भारत देशाला कसं वाचवतात, हे पाहताना अंगावर अक्षरश: शहारे येतात.
मेहुल कुमार दिग्दर्शित या चित्रपटात राज कुमार, नाना पाटेकर, ममता कुलकर्णी, वर्षा उसगावकर, दीपक शिर्क महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. (Top 5 Bollywood Patriotic Movies)
३. बॉर्डर
हा चित्रपट १९७१ सालच्या भारत- पाकिस्तान युद्धावर आधारित होता. यामध्ये सैनिकांचं आयुष्य त्यांच्या समस्या, त्यांची देशभक्ती या साऱ्यांचं यथासांग चित्रण करण्यात आलं आहे. सैनिकांच्या कुटुंबीयांची आणि कुटुंबापासून दूर राहणाऱ्या सैनिकांची मानसिकताही यामध्ये अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात आली आहे. यामध्ये युद्धाच्या वेळची भारताच्या आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्स या तिन्ही दलांची कामगिरी दाखवण्यात आली आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शक जे पी दत्ता यांनी या चित्रपटाची पटकथाही लिहिली होती. तसंच भंवर सिंग यांच्यासह निर्मितीचीही जबाबदारी उचलली होती. हा चित्रपट त्यांच्या आयुष्यातल्या उत्तम चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटात सनी देओल, जॅकी श्रॉफ, सुनील शेट्टी, अक्षय खन्ना, राखी, तब्बू, सुदेश बेरी, पूजा भट्ट, कुलभूषण खरबंदा, पुनीत इस्सार आदी कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.
४. उरी – द सर्जिकल स्ट्राईक
उरीचा हल्ला अजून कोणीच विसरू शकलेलं नाही. पाकिस्तान सतत काही ना काही कुरापती करतच असतो, पण भारतीय सैन्य मात्र त्याला चोख प्रत्युत्तर देतं. असाच हा उरीचा भ्याड दहशदवादी हल्ला. भारतीय सैन्याने सर्जिकल स्ट्राईक करून कित्येक सैनिकांचा जीव घेणाऱ्या पाकिस्तानला त्याची जागा दाखवून दिली. याच उरी हल्ल्यावर आणि त्याला भारताने दिलेल्या प्रत्युत्तरावर आधारित चित्रपट म्हणजे ‘उरी – द सर्जिकल स्ट्राईक’. उरी म्हटल्यावर आपल्या मनात एकच वाक्य येतं “How’s the Josh…”
आदित्य धर लिखित, दिग्दर्शित या चित्रपटात विकी कौशल, यामी गौतम, मोहित रैना, कीर्ती कुल्हारी, परेश रावल आदी कलाकार प्रमुख भूमिकेत होते. हा चित्रपट २०१९ सालचा ब्लॉकबस्टर हिट चित्रपट होता. या चित्रपटाला त्या वर्षीचे एकूण ४ राष्टीय पुरस्कारही मिळाले होते. (उत्कृष्ट कथा, दिग्दर्शन, अभिनेता आणि संगीतकार). (Top 5 Bollywood Patriotic Movies)
५. द गाझी अटॅक
१९७१ साली झालेल्या भारत पाकिस्तान युद्धादरम्यान भारतीय नौदलाने केलेल्या पराक्रमावर आधारित हा चित्रपट आहे. हा चित्रपट हिंदी आणि तेलगू भाषेत चित्रित करण्यात आला व नंतर तमिळमध्ये डब करून सर्वत्र प्रदर्शित करण्यात आला. विशाखापट्टणमच्या किनार्यावर INS विक्रांतला नष्ट करण्याच्या पाकिस्तानच्या योजनेची कुणकुण भारतीय नौदलाला लागली होती. त्यामुळे नौदलाची पाणबुडी, एक कार्यकारी नौदल अधिकारी आणि त्यांची संपूर्ण टीम १८ दिवस पाण्याखाली राहिली आणि त्यांनी शत्रूचे मनसुबे उधळून लावले.
==========
हे देखील वाचा – या ‘टॉपच्या’ वेबसीरिज आहेत लोकप्रिय पुस्तकांवर आधारित
==========
आझाद आलम, गंगाराजू गुन्नम लिखित आणि संकल्प रेड्डी दिग्दर्शित या चित्रपटात राणा दग्गुबती, तापसी पन्नू, के के मेनन आणि अतुल कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.