
या आहेत भारतामधल्या आजवरच्या टॉप ५ हिंदी वेबसिरीज
२०२० साली कोरोनामुळे ओटीटी प्लॅटफॉर्म्सना सुगीचे दिवस आले. हा प्लॅटफॉर्म मनोरंजनाचा एक चांगला पर्याय आहे, हे अनेकजणांना नव्याने समजलं आणि वेबसिरीजकडे ढुंकूनही न बघणारा प्रेक्षकवर्ग वेबसीरिजच्या दुनियेत रमला. सध्या प्रेक्षकांची अभिरुची बदलली आहे. कलाकारांपेक्षा कंटेंटला आणि समीक्षकांच्या रिव्यूपेक्षा स्वानुभव किंवा सोशल मीडियावरच्या रिव्ह्यूजवर विश्वास ठेवू लागला आहे. आजच्या भागात आपण भारतामधील सर्वाधिक लोकप्रिय वेबसिरीजची माहिती घेणार आहोत ज्याला IMDB वर प्रेक्षकांनी भरभरून रेटिंग दिलं आहे. (Top 5 Indian Web Series)
१. स्कॅम ९२ – द हर्षद मेहता स्टोरी
भारतामधील हिंदी वेबसीरिजच्या दुनियेत टॉपला असणारी वेबसीरिज म्हणजे २०२० साली प्रदर्शित झालेली ‘स्कॅम ९२ – द हर्षद मेहता स्टोरी’ ही वेबसिरीज. सलग दुसऱ्या वर्षी ही वेबसिरीज टॉपला आहे. १९९२ साली झालेल्या शेअर बाजार घोटाळ्यावर आधारित असणाऱ्या या सिरीजमध्ये या घोटाळ्यामधील मुख्य आरोपी हर्षद मेहताचा जीवनप्रवास उलगडून दाखवण्यात आला आहे.
सशक्त पटकथा, उत्तम दिग्दर्शन, ८० आणि ९० च्या दशकातील काळाचं केलेलं परफेक्ट चित्रण आणि हर्षद मेहताची भूमिका करणाऱ्या प्रतीक गांधीचा अभिनय या गोष्टींमुळे सिरीज लोकप्रियतेच्या शिखरावर पोचली. IMDB वर या सीरिजला ९.३ रेटिंग देण्यात आलं आहे. अगदी सुरवातीच्या काळात तर सीरिजला १० पैकी १० रेटिंग होतं. ही वेबसिरीज सोनी LIV वर उपलब्ध आहे.
२. ॲस्पिरंट
यूपीएससीच्या परीक्षेचे क्लास घेणाऱ्या संस्थेमधले विद्यार्थी, त्यांची स्वप्न, विभिन्न आर्थिक आणि कौटुंबीक परिस्थिती आणि त्यांची मैत्री या संकल्पनेवर आधारित असणारी ॲस्पिरंट ही वेबसिरीज दुसऱ्या स्थानावर आहे. ही सिरीज २०२१ साली प्रदर्शित झाली होती.
वास्तववादी कथानक, त्याला साजेसं दिग्दर्शन आणि कलाकारांचे सहज सुंदर अभिनय यामुळे ही सिरीज प्रचंड लोकप्रिय झाली. IMDB वर या सीरिजला ९.२ रेटिंग मिळालं आहे. ही वेबसिरीज TVF या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. (Top 5 Indian Web Series)

३. कोटा फॅक्टरी
ही कथा आहे राजस्थानमधील कोटा शहरात ‘आयआयटी’च्या प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या JEE परीक्षेसाठी कोचिंग क्लास आणि त्यामध्ये दाखल झालेल्या मुलांची. कोचिंग क्लास म्हणजे एक प्रकारची फॅक्टरी जिथून विद्यार्थी तयार केले जातात. परीक्षेची चिंता, अभ्यासाचा ताण, जीवघेणी स्पर्धा, तारुण्यसुलभ वयातील इच्छा या साऱ्यासोबतच परिस्थिती नसताना मुलांच्या कोचिंग क्लाससाठी वारेमाप खर्च करणारे पालक व याचा मुलांवर येणारा दबाव या गोष्टींवरही ही वेबसिरीज भाष्य करते.
या सीरिजचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ही सिरीज संपूर्णतः ‘ब्लॅक अँड व्हाईट’ सिरीज आहे. सिरीज TVF या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे तसंच सध्या नेटफ्लिक्सवरही उपलब्ध आहे. IMDB वर सीरिजला ९.१ रेटिंग देण्यात आलं आहे.
४. पिचर्स
ही कहाणी आहे नोकरी सोडून स्टार्टअप सुरु करण्याच्या विचारात असणाऱ्या मंडल, नवीन बन्सल आणि जीतू या तीन मित्रांची. जेव्हा ते स्टार्टअप सुरु करतात तेव्हा मात्र त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं. विनोदी वळणावरची ही मालिका सहकुटुंब बघता येण्यासारखी आहे.
ही वेबसिरीज TVF वर अगदी मोफत पाहू शकता. IMDB वर या वेबसीरिजला ९.१ रेटिंग देण्यात आलं आहे. (Top 5 Indian Web Series)
===============
हे ही वाचा: चित्रीकरणादरम्यान आमिरने संपवली व्होडक्याची अख्खी बाटली कारण…
अर्चना जोगळेकरच्या बाबतीत घडला होता ‘हा’ दुर्दैवी प्रसंग
===============
५. पंचायत
एप्रिल २०२० मध्ये प्रदर्शित झालेली ही कॉमेडी- ड्रामा प्रकारातील वेबसिरीज अभिषेक नावाच्या इंजिनिअर मुलाभोवती फिरते. हा मुलगा मनासारखी नोकरी न मिळाल्यामुळे एका दुर्गम खेड्यामधील पंचायतीमध्ये नोकरी स्वीकारतो. या नोकरीदरम्यान त्याला आलेले अनुभव आणि समस्या सिरीजमध्ये अत्यंत गमतीशीर पद्धतीनं अधोरेखित करण्यात आल्या आहेत.
अत्यंत साधं सरळ कथानक असणारी ही सिरीज प्रेक्षकांना भावली ती सरस दिग्दर्शन आणि कलाकारांच्या नैसर्गिक अभिनयामुळे. ही सिरीज अमेझॉन प्राईम वर उपलब्ध असून IMDB वर या वेबसीरिजला ८.९ रेटिंग देण्यात आलं आहे
याव्यतिरिक्त रॉकेट बॉईज (सोनी LIV), फ्लेम्स (MX प्लेअर) या वेबसीरिजनाही IMDB वर ८.९ रेटिंग देण्यात आलं आहे.
टीप: सदर लेखामध्ये लिहिण्यात आलेलं IMDB रेटिंग हे लेख प्रसिद्ध झालेल्या दिवसापर्यंतचे आहे. यामध्ये बदल होऊ शकतो.
– भाग्यश्री बर्वे