मिलिंद गवळींनी ‘समृद्धी’ बंगल्यातून बाहेर पडताना आठवण म्हणून नेली ‘ही’
तोरबाज: अफगाणिस्तानच्या क्रिकेट टीमचं वास्तव…
अफगाणिस्तान या देशाचं नाव आल्यावर आतंकवादी हल्ल्यांनी उद्धस्त झालेली शहरं समोर येतात. पण याच अफगाणिस्तानची ओळख बदलू लागली आहे ती त्या देशातील खेळाडूंमुळे. देशात अराजकता असतांना आपल्या खेळाच्या माध्यमातून देशाची नव्यानं ओळख करुन देण्यात ही मंडळी यशस्वी ठरली आहेत.
क्रिकेट हा त्यातील एक प्रमुख खेळ म्हणायला हवा. कारण 20-20 च्या माध्यमातून अफगाणिस्तानच्या क्रिकेट वीरांचा जलवा आपण पाहिला आहे. पण यामागे त्यांची मेहनतही कौतुकास्पद आहे. ही मंडळी साधारण कोणत्या परिस्थितीतून जात असतील याची जाणीव तोरबाज या चित्रपटामधून बघायला मिळते.
नेटफ्लिक्सवर नुकताच रिलीज झालेला संजय दत्तचा तोरबाज हा चित्रपट अफगाणिस्तानमधील बच्चे कंपनीवर आधारित आहे. आतंकवाद्यांनी या मुलांचं भविष्य काय तर वर्तमानही पुसून टाकला आहे. त्यांच्या हातात खेळाऐवजी बॉम्ब आहेत. बहुतांशी मुलं आपल्या आई वडीलांना हरवून बसली आहेत.
रेफ्यूजी कॅम्पमधील त्यांचे आयुष्य हे कोणाच्या तरी मेहरबानीवर अवलंबून आहे. अशा मुलांच्या आयुष्यात एक क्रिकेट कोच येतो. त्यांच्या हातात बॅट-बॉल देतो. त्यांच्यात आत्मविश्वास जागा करतो. मुळात त्यांना तो मुलं म्हणून जगायला शिकवतो आणि जिंकायलाही शिकवतो. गिरीश मलिक यांच्या तोरबाजमध्ये अफगाणिस्तानमधील लहान मुलांच्या भावनिक अवस्थेला अचूक टिपण्यात आलं आहे. इमोशनल-थ्रिलर असलेला हा चित्रपट शुक्रवारी नेटफ्लिक्सवर रिलीज झाला.
हे देखील वाचा: मसाबा मसाबा … एक मुलगी, यशस्वी डिझायनर आणि सेलेब्रिटी
यात संजय दत्त प्रमुख भूमिकेत आहे. नासिर हा माजी आर्मी ऑफीसर, डॉक्टर आहे. काबूलमध्ये असतांना या नासिरची पत्नी आणि मुलगा एका आतंकवादी हल्ल्यात मारले गेले. याच शहरात एका एनजीओमध्ये आएशा (नर्गिस फाखरी) लहान मुलांसाठी काम करते. ती नासीरला या कॅम्पमध्ये काम करायला बोलवते.
तिथे गेल्यावर आपल्या कुटुंबाला आठवत दुःखी होणा-या नासीरला बेघर झालेल्या मुलांचे दुःख समजतं. तो या मुलांना क्रिकेट शिकवण्याचं ठरवतो. त्यांची क्रिकेट टीम तयार करतो. या मुलांना काबूल क्रिकेट क्लबमधून ट्रेनिंग मिळवण्यासाठी नासिर प्रयत्न करतो. मात्र तिथले कोच नकार देतात. कारण रेफ्युजी कॅम्पमधील मुलं कधी ना कधी आतंकवादींच्या संपर्कात आलेली असतात. त्यामुळे ती धोकादायक असल्याचं या कोचचं म्हणणं असतं.
नासिर या मुलांना एकत्र करुन त्यांच्या टीम विरुद्ध काबूल क्रिकेट क्लबची टीम यांची मॅच खेळवण्याची ऑफर देतो. याच दरम्यान नासिरच्या टीममधील बाज या मुलाचे अपहरण होते. हा बाज पाकिस्तानमधून आलेला असतो आणि त्याचे तालिबान कॅम्पमध्ये प्रशिक्षणही झालेलं असतं.
आता तालिबानी प्रमुख कजार (राहूल देव) याला काही आत्मघातकी हल्ले करायचे असतात. त्यासाठी बाजची गरज असते. नासिर या कजारबरोबर बोलणी करुन एका मॅचसाठी बाजली सोडवतो. ही मॅच होते. त्यात नासिरची टीम जिंकते. मात्र त्याचवेळी तालिबानी आत्मघातकी हल्लाही होतो. यात कोण कोण मारलं जातं.हे सर्व तोरबाजमध्ये बघण्यासारखं आहे.
हे देखील वाचा: नर्गीसची रेडिओवर मुलाखत घेताना सुनीलदत्त घाबरला होता!
गिरिश मलिक यांचं दिग्दर्शन आणि राहुल मित्रा, गिरीश मलिक निर्माते असलेल्या या चित्रपटाची सुरुवात थोडी रेंगाळल्यासारखी वाटते. पण नंतर बालकलाकारांमुळे चित्रपटाला सूर मिळतो. संजय दत्त, नासिरच्या भूमिकेत ठिक आहे. यासोबतच राहूल देव, नर्गिस फाखरी यांनीही चांगली साथ दिली आहे.